Homeडेली पल्सचित्रपट संस्कृतीने झपाटलेले...

चित्रपट संस्कृतीने झपाटलेले सुधीर नांदगावकर!

…. अखेर ती दु:खद बातमी आलीच आणि मी फ्लॅशबॅकमध्ये गेलो. सुधीर नांदगावकर हे नाव मी सत्तरच्या दशकात सर्वप्रथम रसरंग साप्ताहिकात वाचले. काही मनोरंजन चित्रपटांची त्यांची परीक्षणे वाचतानाच ते त्या काळात रुजत असलेल्या समांतर चित्रपट अर्थात न्यू वेव्ह/ कलात्मक/नवप्रवाहातील चित्रपटावर अतिशय अभ्यासपूर्ण आणि मनापासून लिहिताहेत हे लक्षात आले. त्यांच्या लेखनाने प्रभावित झाल्यानेच त्या काळात अंकूर, निशांत, अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यू आता है, भूमिका, चक्र असे काही चित्रपट आमच्या गिरगावातील काही सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये फर्स्ट रनला मॅटीनी शोला पाहिले.

असे चित्रपट प्रामुख्याने मॅटीनी शोलाच रिलीज होतात हे माझ्या लक्षात आले. पण त्यामागचे कारण मला सुधीर नांदगावकर यांच्या लेखनात मिळाले. हिंदीतील समांतर चित्रपटातील पहिला चित्रपट म्हणून ओळखला जात असलेला मृणाल सेन दिग्दर्शित ‘भुवन शोम’ (१९७०) ड्रीमलॅन्ड थिएटरला मॅटीनी शोला रौप्यमहोत्सवी यशस्वी ठरल्यावर या नवप्रवाहातील चित्रपट प्रदर्शनातील आत्मविश्वास वाढला होता, हे त्यांच्याच लेखात वाचले. सुधीर नांदगावकर यांच्या लेखामुळेच बासू भट्टाचार्य दिग्दर्शित ‘आविष्कार’ (राजेश खन्ना व शर्मिला टागोर) हा चित्रपट दूरदर्शनवर आवर्जून पाहिला.

सुधीर नांदगावकर यांच्यामुळे त्या काळातील मुंबई व देशातील आंतरराष्ट्रीय तसेच अन्य चित्रपट महोत्सवाबाबत बरेच वाचायला मिळे. खरं तर मी सत्तरच्या दशकात ‘मसाला मिक्स’ मनोरंजक चित्रपटाचा ‘स्टॉलचा पब्लिक’ होतो. मॅटीनी शो संस्कृतीत रमलो होतो. पण सुधीर नांदगावकर यांच्या लेखामुळेच मला सत्यजित राय, मृणाल सेन, ऋत्विक घटक, श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, रवींद्र धर्मराज ही नावे आणि त्यांचा चित्रपट याची ओळख होत होती. त्यातील काही चित्रपट अवघड वाटले.

ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीलाच मी मिडियात आल्यावर ज्यांचे मी शाळा कॉलेजपासून वाचत होतो अशा वसंत साठे, शुध्दनिषाद (श्रीकांतजी ठाकरे), शिरीष कणेकर, शरद गुर्जर, इसाक मुजावर, वसंत भालेकर, सुभाष समेळ, अरुण ताह्मणकर, अशोक राणे, रेखा देशपांडे, सुधीर गाडगीळ, विजय नाफडे यांच्याशी ओळख होत गेली त्यात सुधीर नांदगावकरांशी ओळख होताना ‘त्यांचा चित्रपट वेगळा’ असे माझ्या मनात होते. आणि अशातच १९८४च्या जानेवारीत मुंबईत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मी सुधीर नांदगावकरांची धावपळ पाहिली. मीडिया डेस्क मेट्रो थिएटरमध्ये होता. तेथेच मृणाल सेन दिग्दर्शित ‘खंडहर’ या चित्रपटाने इफ्फीचे उदघाटन झाले. समोरच्या कावसजी हॉलमध्ये फिल्म मार्केट होते आणि आकाशवाणी थिएटर, न्यू एक्सलसियर, स्ट्रॅन्ड येथे महोत्सवातील विविध विभाग होते. सुधीर नांदगावकर यांचा यात चौफेर वावर दिसला. मला हा चित्रपट महोत्सव नवीनच असल्याने मी अडखळत होतो. पण तरीदेखील एकप्रकारे मी हळूहळू त्यांच्या जवळ जात होतो, तरी आपण मनमोहन देसाईंचे पिक्चर एन्जॉय करीत वाढलोय याचे मला असलेले भान मला मागे खेचत होते.

सुधीर नांदगावकर मराठी व हिंदी चित्रपटाच्या प्रेस शोजना येत. अधूनमधून एखाद्या पार्टीत असत आणि अर्थातच आमच्या छोट्या भेटीतील गप्पांत इतरही काही विषय येत. मी गिरगावातील खोताची वाडीत राहतो हे समजताच ते खुलले आणि म्हणाले मीही पूर्वी गिरगावातच ठाकूरव्दारला राहयचो. जगभरातील मूळचे अथवा आताचे दोन गिरगावकर भेटले की चित्रपटगृह संस्कृतीपासून हॉटेल संस्कृतीपर्यंत जुन्या आठवणी काढत गप्पा रंगणारच. असे आमचेही झाले. त्यांचा चित्रपट वेगळा असल्याने आणि मी क्रिझबाहेर येऊ शकत नसलो तरी आता मात्र गिरगाव हा मला त्यांच्याशी बोलण्यास हुकमी फंडा सापडला आणि त्यातून मी राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटावर बोलू लागलो तेव्हा ते त्यावर चौकटीबाहेर बोलताहेत, काही वेगळे सांगताहेत हे माझ्या लक्षात आले आणि तेच त्यांचे वैशिष्ट्य वाटले.

त्यांनीच मला फिल्म जर्नालिस्ट असोसिएशनचा सभासद करुन घेतले. प्रभात चित्र मंडळाचा अर्ज दिला आणि मासिक वास्तव रुपवाणीचा अंकही पोस्टाने घरपोच सुरू केला. अशातच १९८५ला हैदराबादला इफ्फीत मी त्यांची धावपळ पाहिली. त्यानंतर १९८७ व १९८९ साली नवी दिल्ली आणि १९९० साली कोलकाता (तेव्हाचे कलकत्ता) येथील इफ्फीच्या वेळी मुंबईपासून ते पुन्हा मुंबईत पोहोचेपर्यंत आम्ही ट्रेनचे सहप्रवासी होतो. यात अशोक राणे, रेखा देशपांडेही सोबत होते. यांनी जागतिक चित्रपटाचा विषय काढला की मी औपचारिकपणे ऐकायचो इतकेच. नांदगावकरांच्या ते लक्षात येई. दोनदा नवी दिल्लीत अशोक यात्री निवास हॉटेलमध्ये तर कलकत्त्यात महाराष्ट्र सदनमध्ये वसंत साठे, सुधीर नांदगावकर, विजय जानोरकर आणि मी असे चौघे रुम पार्टनर असताना वसंत साठे यांच्याकडून चित्रपती व्ही. शांताराम आणि राज कपूर यांच्याबद्दल किती ऐकू आणि काय ऐकू असे होई.

कोलकात्यात कमलाकर नाडकर्णीही सोबत होते. ते दिवसच वेगळे होते. माणसेही वेगळी होती आणि वातावरण मोकळेढाकळे… एकमेकांवर विश्वास ठेवणारे होते. त्या काळात पंधरा दिवसांचा इफ्फी असे आणि आम्ही इतके दिवस एकत्र असू. सुधीर नांदगावकर यांच्या ‘सिनेमा संस्कृती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात आवर्जून हे पुस्तक त्यांनी मला भेट दिले. ‘गुरुदत्त’ त्यांचा अतिशय आवडता, दिग्दर्शक व अभिनेता. त्यावरील त्यांच्या पुस्तकात त्यांच्यासह अनेकांचे गुरुदत्तचे विविध पैलू उलगडून दाखवणारे लेख आहेत. याशिवाय त्यांची सत्यजित राय यांच्या चित्रपटासंदर्भात लेख असलेले ‘अभिजात’ हे अनुवादित पुस्तक आहे. तसेच ‘अटलजींचे आवाहन’ हे त्यांच्या भाषणाचे पुस्तक अनुवादित केले आहे. या सगळ्यात ५ जुलै १९६८ रोजी त्यांनी वसंत साठेसाहेबांसह पुढाकार घेत प्रभात चित्र मंडळाची स्थापना करण्यामागील हेतू समजत गेला. वेगळ्या चित्रपटांना प्लॅटफॉर्म आणि रसिकांना कलात्मक आनंद असा त्यामागे हेतू होता.

अशातच सुनील शेट्टीचा पहिला चित्रपट ‘बलवान’पासून (१९९२) सुधीर नांदगावकर यांनी चित्रपट समीक्षा थांबवली आणि चित्रपट महोत्सव, प्रभात चित्र मंडळ, फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन, फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडिया, चित्रपट समीक्षकांची आंतरराष्ट्रीय संघटना ‘फिप्रेस्की’ यातील त्यांचा महत्त्वपूर्ण वावर, चित्रपट संस्कृती यात स्वतःला अक्षरश: झोकून दिले. तेच आपले विश्व मानले. आज प्रयत्न केले तर पंचवीस वर्षांनी का होईना पण चित्रपट संस्कृती रुजेल यावर त्यांचा विश्वास होता. जगभरातील उत्तमोत्तम चित्रपट प्रभातच्या सभासदांसाठी आयोजित करावेत यासाठीचा त्यांचा ध्यास कमालीचा होता. त्यांनी साहित्य, संगीत व नाटक या क्षेत्रातील अनेकांना प्रभातही जोडले. त्यांनी वेगळ्या प्रवाहातील चित्रपट पाहवा असे नांदगावकरांना वाटत होते.

आता आमच्या प्रत्यक्षात भेटी कमी होत गेल्या. अधूनमधून फोनवर बोलणे होई तेव्हा मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील घडामोडी हाच आमचा फोकस असे. ते फार पूर्वी ‘मराठा’ दैनिकात चित्रपट समीक्षा करीत आणि आचार्य अत्रे यांचे मराठा दैनिक बंद झाल्यावर त्यातील पत्रकारांना इतरांनी कशी मदत केली, तसेच सुरुवातीच्या काळातील शिवसेना अशा अनेक आठवणी ते सांगत. ते संघनिष्ठ. भारतीय जनता पक्षाचे खंदे समर्थक. अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी ही त्यांची राजकारणातील दैवतं. पण पक्षाकडून त्यांनी कधीच काही न घेतल्याचे त्यांना अजिबात गैर वाटत नसे. चित्रपट असो अथवा राजकारण काही मिळवण्यासाठी त्यांच्या निष्ठा नव्हत्या असे माझे निरीक्षण आहे.

त्यांनी फार पूर्वी वसंत सोपारकर यांच्या सहकार्यातून ‘रंजना’ हे साप्ताहिक सुरू केले. मग तिकोने यांच्या सहकार्यातून मुद्रण व्यवसाय सुरू केला. सत्यजित राय त्यांचे चित्रपटातील दैवत. रसास्वाद शिबिराचे आयोजन हे त्यांचे एक वैशिष्ट्य. कॉलेज विद्यार्थ्यांसाठी त्यांनी कॅम्पस फिल्म सोसायटी हा उपक्रम सुरू केला. चांगला प्रेक्षक घडावा अशीच त्यामागची त्यांची तळमळ असे. हे लगोलग घडणार नाही, ही अनेक वर्षांसाठीची तपश्चर्या आहे याचे त्यांना भान असे आणि निराश न होता, न कंटाळता त्यांचे हे कार्य सुरू असे. चित्रपट हे लोकशिक्षणाचे आणि समुपदेशनाचे माध्यम आहे असे ते मानत. हे त्यांचे वेगळेपण होते. ते स्वत:पलिकडे पाहत हेच यातून अधोरेखित होते. मला वाटते, साठच्या दशकातील सामाजिक सांस्कृतिक वातावरणाचा फार मोठा प्रभाव त्यांच्यावर कायमच राहिला.

मुंबई विद्यापीठातून साहित्य शास्त्रात एम. ए.ची पदवी संपादन केल्यावर ते पोद्दार कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. माणसाची जडणघडण अशीच बहुस्तरीय असते. पूर्वी चित्रा थिएटरमधील मिनी थिएटरमध्ये (ते नंतर बंद झाले). प्रभातच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्यजित राय यांचा ‘पथेर पांचोली’ त्यांच्यामुळेच मला पाहता आला. कालांतराने त्यांनी आपण कोकणातील एका आश्रमशाळेला पुस्तके भेट देत असतो असे एका औपचारिक गप्पांत मला म्हणताच, मी माझ्या सर्वच पुस्तकांची एक प्रत त्यांना दिली. मी प्रत्येक पुस्तक वाचूनच तिकडे पाठवतो असे म्हणत. तसेच त्यांनी केले. विशेष म्हणजे, एकदा सकाळीच रत्नागिरीतील आश्रमातून जोशी नावाच्या व्यक्तीचा माझी पुस्तके वाचल्याचा तपशीलवार फोन आला. अशा अनेक वाचकांपर्यंत मी नांदगावकरमुळे पोहोचलो. दोनदा त्यांच्यामुळे मला ‘कालनिर्णय’ दिवाळी अंकात लिहिण्याची संधी मिळाली. एकदा त्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाची निवडणूकही लढवली. त्यामागे त्यांचा हेतू चांगला असूनही त्याना यश प्राप्त झाले नाही.

१९९७ साली त्यांनी मुंबईचा आपला चित्रपट महोत्सव आयोजित करण्याचे पाऊल टाकून मामी महोत्सव सुरू केला. काही वर्षे त्यांच्याच अधिपत्याखाली तो होई. नंतर मामी महोत्सवाचा प्रवास बदलला. सुधीर नांदगावकर स्वस्थ बसणाऱ्यांतील कधीच नव्हते. त्यांनी थर्ड आय आशियाई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन सुरू केले आणि परळ येथील राजकमल कलामंदिर स्टुडिओतून या महोत्सवाचे कामकाज सुरू केले. सुधीर नांदगावकर म्हणजे चित्रपट महोत्सव आणि संस्कृती हे नाते घट्ट झाले. फिल्म जर्नालिस्ट सोसायटीचे पुनरुज्जीवन करावे आणि मी त्याचा सेक्रेटरी असावे अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार प्रभात चित्र मंडळाच्या दादर कार्यालयात त्यांनी आम्हा काही सिनेपत्रकारांची बैठक आयोजित केली. पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. चित्रपट ही विज्ञाननिष्ठ कला आहे यावरचा त्यांचा फोकस या सगळ्या प्रवासात कायम होता.

एकीकडे हे सुरू असतानाच २००९ साली मी नवशक्ती सोडून मुक्त पत्रकारीता करण्याचा अतिशय धाडसी आणि सहज अंगलट येऊ शकेल असा निर्णय घेतला तेव्हा सुधीर नांदगावकर यांनी सर्वप्रथम मदतीचा हात पुढे केला. त्यांनी प्रभात चित्र मंडळाच्या वास्तव रुपवाणी या मासिकात चित्रपट परीक्षणाची संधी दिली… तू कुठे गेलास की तुला एखाद्या बॅनरचे नाव विचारतील तेव्हा रुपवाणीचा उल्लेख कर असे ते म्हणाले. मी ते टाळले. पण काही वर्षं रुपवाणीत चित्रपट समीक्षा लिहीली. तरी कायमच माझ्या मनात श्याम बेनेगल यांच्या चित्रपटात जितेंद्र भूमिका साकारतोय असं काहीसं चित्र होतं. पण त्या अवघड दिवसात मला मीडियात टिकून राहण्यात हा मोठा आधार होता.

आता सुधीर नांदगावकरांशी वरच्या वर मोबाईलवर बोलणे होई. कधी अर्धा तास आम्ही बोलत असू. अशातच त्यांनी चित्रपती व्ही. शांताराम फाऊंडेशनच्या वतीने ‘शतक महोत्सवी मराठी चित्रसंपदा’ या सूचीचे काम सुरू असून तू त्यात सहभागी होतोस का असे विचारले. या कामाचा आनंद आणि आर्थिक आधार यासाठी हे काम मी स्वीकारायचे ठरवले आणि फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण शांताराम यांना भेटून मी आता जवळपास रोज राजकमल कलामंदिरमध्ये जाऊ लागलो. सुधीर नांदगावकर एशियन चित्रपट महोत्सवाच्या कामासाठी तेथेच नियमित येत असल्याने आमच्या आता भेटीगाठी वाढल्या. आमच्या गप्पांत सध्या मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत काय चाललंय हाच विषय असे. अधूनमधून जुने चित्रपट, पूर्वीची चित्रपटसृष्टी हे विषय असत. मराठी चित्रपट सूचीचे काम टीमवर्क होते. सूचीत संपादन प्रमुख म्हणून माझे नाव दिले हे सगळेच श्रेय किरण शांताराम, विनय नेवाळकर आणि सुधीर नांदगावकर यांचे आहे. त्यानंतर दोनेक वर्षांत सुधीर नांदगावकर यांनीच फाऊंडेशनच्या मराठी फिल्म ऑनलाईन या वेबसाईटच्या कामाची संधी दिली. कोरोनाच्या अवघड काळातही ते काम व्यवस्थित सुरू आहे ना असे ते आवर्जून विचारत.

सुधीर नांदगावकर यांचा मला सर्वाधिक आवडलेला गुण म्हणजे, समोरच्या व्यक्तीला जसा आहे तसा स्वीकारणे. त्या व्यक्तीच्या वैशिष्ट्यानुसार त्याच्याशी मनापासून गप्पा करणे. मी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत फिल्डवर्कवर दीर्घकाळ वावरल्याने माझ्या आठवणी, माहिती, संदर्भ, तपशील त्यानुसार असतात. हे त्यांनी कायमच लक्षात ठेवून संवाद ठेवला. आणि मग आपलीही एकादी जुनी आठवण ते सांगत. दिग्दर्शक बासू भट्टाचार्य, शशिकला यांच्यासोबतचे त्यांचे अनुभव बरेच काही वेगळं सांगत. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीवर गप्पा करताना त्यांचा फोकस स्पष्ट असे. उगाच ते मूळ विषयाला बगल देत युरोपियन चित्रपट, इराणी चित्रपट यावर बोलायला लागत नसत. आपण जगभरातील चित्रपटाचा आस्वाद घेत असलो तरी समोरच्या व्यक्तीला त्यात फारसा रस नसेल तर नांदगावकर त्यासाठी कधीच ग्राहक धरत नसत. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना कन्फर्ट झोन मिळे. आपल्या गप्पांत आपल्यावर फक्त ऐकण्याची भूमिका घ्यावी लागेल असे होत नसे.

नांदगावकर माझे रविवार नवशक्तीतील लेख आवर्जून वाचत आणि आपली प्रतिक्रियाही देत. एखादी चूक लक्षात आणून देताना ती का झाली असावी हेदेखील सांगत. कालांतराने अनेक उपग्रह वाहिन्यांवरील बातम्यांत अथवा चर्चेत मी सहभाग घ्यायचो ते त्यांच्या पाहण्यात आल्यावर त्यावरही अधूनमधून मत व्यक्त करीत. एखादी समज देत. हे एकप्रकारचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन असे. अशा छोट्या छोट्या भेटीतून आणि गोष्टीतून मी त्यांच्याशी जोडला गेलो. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, राज्य चित्रपट महोत्सव, दादासाहेब फाळके पुरस्कार, भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, भारतीय पॅनोरमा, ऑस्करसाठीचा भारताचा चित्रपट, कान्स मार्केट विभागासाठीचे मराठी चित्रपट याबाबत आमच्यात अनेकदा मागील दशकभरात संवाद होई.

अशातच त्यांनी थर्ड आय आशियाई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी काही वर्षे महोत्सवयोग्य मराठी चित्रपटांची नावे सुचव म्हटलं. ही माझ्यासाठी खूपच मोठी आनंदाची गोष्ट होती. अर्थात मी सुचवलेले चित्रपट त्यांनी निवडावेत अशी अपेक्षाच नव्हती आणि त्यांनी चित्रपट न निवडल्याबाबत मी कधी विचारलेही नाही. फार पूर्वी बासू भट्टाचार्य दिग्दर्शित ‘आस्था’ या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या शूटिंगला मी नांदगावकरांसोबतच होतो. वांद्र्याच्या कार्टर रोडवरील बासूदांच्या बंगल्यावरील शूटिंगमध्ये रेखा आणि ओम पुरी होते. नांदगावकरांसोबतच्या यावेळच्या अनुभवातून मी माझ्या लेखाला सुरुवात केली होती. अशा ‘सिनेमामय नांदगावकरां’शिवाय चित्रपट महोत्सव ही कल्पनाच करवत नाही. पण यावर्षी रवींद्र नाट्य मंदिरमधील थर्ड आय आशियाई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तेही घडले. त्यांचा सत्यजित राय पुरस्काराने त्यांच्या ठाणे येथील घरी जाऊन सत्कार करण्यात आला त्या वृत्तातील तेव्हाची त्यांची तब्येत पाहून मनात धस्स झाले. सुधीर नांदगावकर मला दिसले/भेटले/जाणवले/कळले ते असे. आम्ही फार जवळ नव्हतो आणि फार लांबही नव्हतो. चित्रपट ही एकच गोष्ट आमच्या नात्याची वीण ठरली. त्यातही त्यांचा चित्रपट वेगळा आणि माझा वेगळा. पण त्यामुळे आमच्या नात्यात अंतर नव्हते, हे श्रेय सुधीर नांदगावकर यांचेच!

Continue reading

भारत-ऑस्ट्रेलियात व्यापारवृद्धीसाठी झाली बैठक

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेंद्रिय उत्पादनांवरील एमआरए, भेंडी, डाळिंब, द्राक्षे, कॉटेज चीज, मॅकॅडॅमिया नट्स, मसूर आणि एवोकॅडो यासारख्या उत्पादनांशी संबंधित बाजारपेठ प्रवेशसमस्या, प्रशुल्क दर कोटाव्यवस्था, ऑस्ट्रेलियातील औषधविषयक विशेषतः जेनेरिक औषधांचे किंमत नियंत्रण, व्हिस्की आणि वाईनच्या व्यापाराला चालना देण्याकरीता दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये नुकतीच बैठक झाली. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या...

सलमान शूटआऊट प्रकरणात छोटा शकीलचे पंटर्स?

सुमारे 15 दिवसांपूर्वी सलमान खान शूटआऊटप्रकरणी व्यक्त केलेली भीती आता हळूहळू खरी ठरत असल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिष्णोई याच्या पंटर्सनी हल्ला केल्याची जबाबदारी घेतली असल्याचे जाहीर झाले असले तरी लॉरेन्सचा मुंबईत बेस नाही. मुंबईत बेस नसल्याने तो अन्य टोळ्यांचे...

येत्या बुधवारी ‘सीहॉक्स’ हेलिकॉप्टर्स, भारतीय नौदलात!

भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस गरुड, कोची येथे येत्या बुधवारी, 6 मार्चला एमएच 60 आर सीहॉक (ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची सागरी आवृत्ती) हे नवीन बहुउद्देशीय हेलिकॉप्टर दाखल होणार आहे. भारताच्या संरक्षणविषयक आधुनिकीकरणाच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. भारतीय नौदलात या हेलिकॉप्टर्सचे पथक, 'आयएनएएस 334' या नावाने कार्यरत होणार...
Skip to content