Homeकल्चर +शिवराज्याभिषेक दिनासाठी रायगडावर...

शिवराज्याभिषेक दिनासाठी रायगडावर दिमाखदार पालखी!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे यावर्षी दोन जून या दिवशी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला ३५०वे वर्ष असून ते दिमाखाने साजरे करण्यात येत आहे. यासाठी श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीच्यावतीने दुर्गराज रायगड ही संस्थाही तेथे गेल्या अनेक वर्षांपासून हा सोहळा साजरा करीत आहे. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्याभिषेक सोहळ्यासाठी खास पालखीची मागणी केली आणि ती पालखी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी त्यांना दिली. चांदीच्या पत्र्याने सुशोभित केलेल्या या पालखीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्याभिषेकदिनी किल्ले रायगडावर नेले जाणार आहे.

त्यापूर्वी मंगळवारी ३० मे २०२३ या दिवशी ही पालखी मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यासमोर सादर करून शिवरायांचा, संभाजी महाराजांचा, सावरकरांचा जयजयकार केला गेला. त्याठिकाणी पालखीमध्ये छत्रपती शिवरायांची प्रतिमा ठेवून यथासांग पूजा करून छत्रपतींचा जयजयकार करण्यात आला. समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी यावेळी माहिती देताना सांगितले की, आम्ही राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडे या पालखीची मागणी केली. गेली अनेक वर्षे संस्थेच्या पुढाकाराने रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला जातो. यावेळी या दिवसाचे ३५०वे वर्ष असून त्यानिमित्ताने केलेल्या मागणीला मुनगुंटीवार यांनी मान्य करून ही पालखी तयार करून दिली.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारे भक्तच होते. अशा या स्वातंत्र्यवीरांच्या स्मारकापुढे आम्ही अभिमानाने ही पालखी सादर केली आहे. छत्रपती शिवरायांसाठी असे काम केलेले महाराष्ट्रातील हे पहिलेच सरकार असेल असेही त्यांनी सांगितले. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी पालखी आणि त्यातील शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्निल सावरकर यांनी पालखी वाहून नेण्याचा प्रातिनिधीक अभिमानास्पद असा मानही भक्तिभावाने स्वीकारला. स्मारकाचे कर्मचारी, सदस्यही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालखीवर छत्र धरून भगवा झेंडा फडकावत अतिशय भक्तिभावाने पालखीचे स्वागत केले गेले. महाराष्ट्र सरकारनेही यासाठी खास पुढाकार घेतला असून त्यासाठी सर्व प्रशासनही तेथे येणाऱ्या शिवाजी महाराजांच्या लाखो मावळ्यांचे स्वागत करण्यास सज्ज झाले आहे. लाखो मावळे यावेळी रायगडावर येतील. मात्र एक लाख लोक येऊ शकतील अशी जागा तेथे नाही. कडाक्याचे उनही आहे तेव्हा राज्यातील विविध गावांमध्ये गुढीपाडव्याप्रमाणे लोकांनी गुढ्या, ध्वज उभारून शिवपाडवाच साजरा करावा असेही आवाहन यावेळी सुनील पवार यांनी केले.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content