Homeचिट चॅटएकाचवेळी २५ हजारांहून...

एकाचवेळी २५ हजारांहून अधिक नामधारकांनी म्हटली विश्वप्रार्थना!

जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जीवनविद्या मिशनच्या सुमारे २५ हजारांहून अधिक नामधारकांनी एकाचवेळी विश्वशांतीसाठी ‘हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव; सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे’  ही सद्गुरु वामनराव पै रचित विश्वप्रार्थना म्हटली आणि सद्गुरु श्री वामनराव पै यांना अनोखी मानवंदना दिली.

यंदा जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरु श्री वामनराव पै यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. यानिमित्त महाराष्ट्रात विविध ठिकाणी विश्वशांतीसाठी ‘हे ईश्वरा..’  ही सद्गुरु वामनराव पै रचित विश्वप्रार्थना एका सुरात म्हणण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याचा एक भाग म्हणून सद्गुरु वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कराड येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य विश्वप्रार्थना यज्ञ आणि ‘आनंदाचे देणे’ या विषयावर  सद्गुरु वामनराव पै यांचे चिरंजीव आणि जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त प्रल्हाद पै यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी स्टेडियमवर उपस्थित सुमारे 25000हून अधिक लोकांनी विश्वाच्या कल्याणासाठी आणि विश्वशांतीसाठी ही विश्वप्रार्थना म्हटली.

यावेळी दिव्य संदेश देताना प्रल्हाद पै म्हणाले की, आयुष्य जगत असताना आपण आपल्याकडे आनंद आहे हेच विसरून जातो. जीवन जगण्याची कला आपण शिकत नाही, गरज वाटत नाही. दुःखाचं वाटप क्षणाक्षणाला सुरू असते. दुसऱ्याचे पाय मागे ओढण्यातच आपण वेळ व्यतीत करतो. आनंदाचे वाटप करणे हा आनंदी होण्याचा एकच मार्ग आहे. कराड, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील आणि मुंबईतील नामधारक यांच्यासहित अनेक मान्यवरांची या कार्यक्रमात उपस्थिती होती.

विश्वप्रार्थना

प्रल्हाद पै यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ‘आनंदाने कसे जगावे आणि आनंद कसा वाटावा आणि सुखी कसे व्हावे, यावर सुमारे एक तास विस्तृत विवेचन केले. प्रल्हाद पै म्हणाले की, आपल्याला जगण्यासाठी कुटूंब, समाज, राष्ट्र आणि जगाची गरज असते. मध्यंतरी कोरोनाचे संकट आले तेव्हा जीव पणाला लावून लस तयार करण्यासाठी वैज्ञानिकांनी प्रयत्न केले.‌ जीवन जगण्यासाठी आपणास सर्वाची किती गरज होती यावरून जगाला कळले. आपल्या प्रत्येकावर समाजाचे ऋण आहे. हे ऋण आपण कसं फेडणार? त्यासाठी आपण सुखी होऊन समाजालाही सुखी का केले पाहिजे. सुख कसे मिळवायचे ते सद्गुरू शिकवितात. जे आहे ते द्यायचे आहे. तुम्ही आनंदस्वरुप आहात. तुम्ही आनंदीच आहात. पैशाने सुख मिळणार या गैरसमजात पैशाच्या मागे लागलो आहे आणि त्यामुळेच आपण दुःखी आहोत. पैशाने सुखसोयी, वस्तू मिळतील पण आनंद नाही. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य यासाठी पैसा हवाच. हा पैसा कसा मिळवावा आणि खर्च कसा करावा हे जीवनविद्या शिकविते. मात्र केवळ पैशाच्या मागे लागलो तर सर्व काही मिळूनही शेवटी कळते ‘हे ते नव्हेच’ आणि पश्चात्ताप करण्याची वेळ येते.

सुख तुझ्याजवळ आहे. प्रत्येकात जी चैतन्य शक्ती नांदते हा आनंदच आहे. आनंद आपल्याकडे जाणीव रुपाने नांदतो. जे काही करतो, त्यातून आनंदाचेच वाटप करतो. दुःखाचे नव्हे आनंदाचे वाटप करा. आपण समोरच्या व्यक्तीचा मान राखला, कौतुक केले, भान राखलं, लक्ष दिले किंवा कृतज्ञतापूर्वक राहिलो तरी आनंद देता. बोलण्यातून, चिंतनातून, कर्मातून, वागण्यातूनही आपण आनंद देऊ शकतो. आनंद दिला की जाणवायला लागेल. आनंद वाटप बुमरॅंग होऊन तुझ्याकडे येईल आणि तू आनंद लुटशील. दिल्याने मिळत आहे दिलाच पाहिजे. प्रेम द्या. दिलात की ऐश्वर्य वाढेल. देण्याची क्षमता देण्याने वाढते. देण्यामध्ये येण्याची ताकद आहे. देताना हात सैल सोडा. आहे त्यातला थोडा भाग द्या, असा दिव्य संदेश प्रल्हाद पै यांनी दिला.

विश्व प्रार्थना सुंदर विचारांची खाण आहे. आज सर्वत्र विचार प्रदूषण आहे. प्रार्थनेने विचार प्रदूषण कमी केलं आहे. सद्गुरु वामनराव पै यांना वैचारिक क्रांती अपेक्षित आहे. जगात विश्रशाती नांदेल. आनंद देत देत जीवन बहरत जाईल, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

कार्यक्रमास जीवन विद्या मिशन व जीवनविद्या फाउंडेशनचे सर्व विश्वस्त उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी जीवन विद्या मिशन कराड, सातारा, सांगली, बेळगाव, जांभळी, वाई, कोरेगाव, मिरज, कोल्हापूर, गडहिंग्लज आणि पुणे शाखांचे सहकार्य लाभले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content