Homeमाय व्हॉईसदरबारी राजकारणामुळेच शिवसेनेच्या...

दरबारी राजकारणामुळेच शिवसेनेच्या नेत्यांचा ठाकरेंना जय महाराष्ट्र!

अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे दरबारी राजकारण संपेल असे वाटत होते. परंतु लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा दरबारी राजकारण सुरू झाले. विधानसभेच्या जागावाटपापूर्वीच उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचे बाशिंग गुडघ्याला बांधून तयार होते. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. या निवडणुकीत महाविकास आघाडीला जोरदार फटका बसला. अर्थात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाही त्याचा प्रसाद मिळाला. या पराभवाची कारणमीमांसा करण्याऐवजी उद्धव ठाकरे आता याही परिस्थितीत आपला हट्टाग्रह सोडण्यास तयार नाहीत. लांजा राजापूर मतदारसंघाचे तत्कालीन आमदार राजन साळवी निष्ठेने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत राहिले. परंतु विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ते मातोश्रीवर ठाकरे यांना भेटण्यास गेले तेव्हा त्यांचेही म्हणणे त्यांनी ऐकून घेतले नाही. उलट माजी खासदार विनायक राऊत हेच कसे निष्ठावान आहेत याचे दाखले त्यांनी साळवी यांना दिले. साळवी आणि कोकणातील आमदारांच्या विनायक राऊत यांच्या कार्यपद्धतीविषयी तक्रारी होत्या. परंतु मातोश्रीचे सेवक असलेल्या राऊत यांच्या निष्ठेवर कोणालाही आक्षेप घेता येत नाहीत. कोकणातील शिवसेना संपली तरी चालेल परंतु राऊत काही मातोश्रीमधून हलणार नाहीत किंवा राऊत यांना आम्ही बाजूला करणार नाही असा उद्धव ठाकरे यांचा हट्टाग्रह आहे.

उत्तर-पश्चिम मुंबईतील शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या राजुल पटेल यांनीही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. मुस्लिमबहुल बेहराम बाग भागात राजुल पटेल यांनी शिवसेना रुजवली. त्याला खतपाणी घातले आणि शिवसेनेचा वृक्ष मोठा केला. शिवसेना फुटत असताना त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या अनेक ऑफर्स नाकारल्या. विधानसभा निवडणुकीत तर भाजपची राजुल पटेल यांना खुली ऑफर होती. त्यांच्यासाठी वर्सोवा मतदारसंघाच्या तत्कालीन आमदार भारती लवेकर यांचे तिकीटही भाजपने होल्डवर ठेवले होते. परंतु निष्ठावान राजुल पटेल यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतच राहण्याचा निर्णय घेतला. वर्सोवा मतदारसंघात राजुल पटेल या आमदारकीच्या दावेदार असताना हारून खान, या शाखाप्रमुखाला आमदारकीचे तिकीट देण्यात आले. तरीसुद्धा राजुल पटेल यांनी संयम राखला. परंतु कार्यकर्त्याला वैधानिक पद नसले तरी सन्मान लागतोच. वारंवार नेत्यांमार्फत एखाद्या कार्यकर्त्याचा अपमान झाला तर तो त्याला सहन होत नाही. त्यामुळेच राजुल पटेल यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला.

ठाकरे

मुंबई महानगरपालिका निवडणुका जिंकण्यासाठी ज्यांनी आपले रक्त आटवले असे अनेक नेते आता उद्धव ठाकरे यांनी अडगळीत टाकले आहेत. शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनासुद्धा सध्या अडगळीत टाकले आहे. एक काळ असा होता की पूर्ण पश्चिम उपनगरात शिवसेनेची संघटना एकसंघ ठेवण्यात घोसाळकर यांचा सिंहाचा वाटा होता. त्याचबरोबर अमराठीबहुल पश्चिम उपनगरात शिवसेनेचे नगरसेवक मोठ्या संख्येने कसे निवडून येतील याची रणनीती घोसाळकर करत असत. परंतु आता विनोद घोसाळकर यांना ज्युनियर असलेल्या मंडळींना शिवसेनेचे नेतेपद देऊन उद्धव ठाकरे यांनी फक्त कोंडाळी जमवली आहे. काही नेते आपल्या विधानसभा मतदारसंघापुरता मर्यादित असूनसुद्धा त्यांना नेतेपद बहाल केले गेले आहे. यापूर्वी शिवसेना नेतेपद देताना त्यांच्याकडे जिल्ह्याचे संपर्कनेतेपद असे. त्या जिल्ह्यात संघटनाबांधणी आणि शिवसेनेची पाळेमुळे रुजवण्याचे काम हे नेते करत. परंतु आता शिवसेनेत नेतेपद मातोश्रीत रुंजी घालणाऱ्यांसाठी राखीव आहे.

राजन साळवी, राजुल पटेल आणि विनोद घोसाळकर ही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. परंतु राज्यभर हीच परिस्थिती आहे. नाराज शिवसेना कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याऐवजी ‘ज्यांना राहायचे त्यांनी राहवे’ ही ठेवणीतली धमकी देऊन उद्धव ठाकरे यांना शिवसेना कोणत्या दिशेने न्यायची आहे हे काही उमगत नाही. यापूर्वी शिवसेना सोडताना शिवसैनिक लाखवेळा विचार करत असत. परंतु आता शिवसैनिकांसाठी पर्याय खुले आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने तर अशा शिवसैनिकांसाठी लाल गालीचा अंथरला आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकही हतबल आहेत. मुंबईत पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. पश्चिम उपनगर पूर्ण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या हातातून निघून गेले आहे. पूर्व उपनगरात मराठीबहुल भागात उद्धव यांच्या शिवसेनेला थोडीफार आशा आहे. मुंबई शहरात वरळी-लालबाग सोडता कोठेही त्यांचा प्रभाव नाही. अशा परिस्थितीत आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजुल पटेल यांच्यासारख्या निष्ठावान महिला सोडून गेल्या तर मुंबईत वेगळाच संदेश जाईल. उद्धव ठाकरेंनी हे ध्यानात घेतलेले असेलच!

Continue reading

देवाभाऊ को गुस्सा क्यों आया?

मुंबई महानगर क्षेत्र आणि पुण्यात पहिल्याच पावसाने बोजवारा उडवून दिला. या पावसाने मुंबईतील यंत्रणा कोसळल्या. त्याचबरोबर सहा हजार सातशे कोटी रुपये खर्च करून उभारलेला मुंबई-पुणे मिसिंग लिंक रोड रोडवर दरडी कोसळल्याने सरकारची लक्तरे वेशीवर टांगली गली. वसई, नालासोपारा, विरार...

ठाकरेंच्या ‘किचन कॅबिनेट’मध्येच होता अस्तनीतला निखारा!

सचिन अहिर ठाकरे कुटुंबियांना धडा शिकवून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत निघून गेले. खरे म्हणजे सचिन अहिर यांचे राजकारण बारा वर्षांपूर्वी सुनील शिंदे या निष्ठावान शिवसैनिकाने संपवले होते. सचिन अहिर राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री असताना सुनील शिंदे यांनी वरळी मतदारसंघात...

विधानपरिषदेच्या निवडणुकीत कोणाची सरशी?

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेवर जाणाऱ्या 16 जागांची निवडणूक जाहीर झाली आहे. 18 जूनला ही निवडणूक होत असून या निवडणुकांचा निकाल 22 जूनला लागेल. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्यामुळे या निवडणुकाही लांबल्या आहेत. यापैकी नऊ आमदारांची मुदत 2022...
Skip to content