अमेठी हे राहुल गांधी यांचं घर आहे. अमेठी आणि गांधी घराणं यांचं नातं खूप जुनं आहे. हे नातं राजकारणापलीकडचं आहे. त्यामुळे राहुल गांधी अमेठीतूनच यंदा लोकसभा निवडणूक लढवतील. स्मृती इराणी यांनी अमेठीकरांना दिलेली वचनं फसवी ठरली. विजयानंतर त्यांनी लोकांची फसवणूक केली. त्यामुळे लोक यंदा नक्कीच राहुल यांना निवडून देतील, असा विश्वास उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी आज व्यक्त केला.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांच्या निमंत्रणानुसार एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर आलेल्या अजय राय यांनी या दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राम मंदिरासोबतच हलाल धोरण, उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यवस्था या विषयांवर भाष्य केलं.
राम मंदिर हा देशातील कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे. पण भाजपाने आणि खास करून मोदी-शाह या दोघांनी या विषयाचा इव्हेंट करून ठेवला आहे. देवाबद्दल मनात श्रद्धा असेल, तर आपण एक दिवा लावला, तरी खूप असतं. आम्ही आज सिद्धिविनायक मंदिरात श्रीगणेशाचं दर्शन घेतलं. आम्ही गणपतीला फक्त एक फुल वाहिलं, पण ते खूप मनापासून वाहिलं. पण याउलट भाजपने लोकांच्या श्रद्धेचा इव्हेंट करून ठेवला आहे. राम मंदिराचं उद्घाटन भपकेबाज पद्धतीने करून त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी भाजपा सज्ज झाला आहे. पण झगमगाट करूनच फक्त देवापर्यंत भावना पोहोचत नाही, हे भाजप विसरला आहे, अशी टीका राय यांनी केली.
उत्तर प्रदेशात जंगलराज
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये जाऊन उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यवस्थेचे गुणगान गातात. पण प्रत्यक्षात उत्तर प्रदेशात भयानक परिस्थिती आहे. कौशंबीत एका मुलीवर बलात्कार झाला. तो अपराधी तुरुंगातून सुटला आणि त्याने त्या मुलीचे तुकडे तुकडे केले. भाजपचे खासदार कौशल किशोर यांच्या घरात एका कार्यकर्त्याची हत्त्या झाली. सुलतानपूर येथे एका डॉक्टरच्या गुडघ्यात ड्रील करून त्याला मारून टाकण्यात आलं, असे ते म्हणाले.
हलालपेक्षा हलाखीबद्दल बोला!
भाजपा सातत्याने अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठीच हलाल धोरण, मदरशांवर कारवाई आदी गोष्टी केल्या जात आहेत. हलालबद्दल ठोस धोरण आणण्यामागे भाजपाचा हेतू वेगळाच आहे. हलालबद्दल बोलण्याऐवजी बेरोजगारी, महागाई यामुळे लोकांमध्ये सुरू असलेल्या हलाखीबद्दल भाजपा बोलायला तयार नाही, असंही त्यांनी सांगितले.
घराणेशाही भाजपमध्येही!
भाजपाने घराणेशाहीचा मुद्दा आता बासनात गुंडाळून ठेवायला हवा. वर्ल्डकपदरम्यान सगळ्यांनी अमित शाह आणि त्यांच्या बाजूला बसलेला त्यांचा मुलगा व बीसीसीआयचे पदाधिकारी जय शाह यांना बघितलं. आमच्या उत्तर प्रदेशातही भाजपा घराणेशाहीने बरबटला आहे. महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी नाही. प्रमोद महाजन यांची मुलगी पूनम महाजन, गोपीनाथ मुंडेंच्या कन्या प्रीतम व पंकजा मुंडे, स्वत: देवेंद्र फडणवीस ही घराणेशाहीचीच अपत्यं आहेत, असं राय म्हणाले.
भाजपामुळे राज्याच्या राजकारणाचा स्तर खालावला!
महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी खूप उच्च होती. राजकीय विरोधक असलेल्या लोकांमध्ये राजकारण वगळता मित्रत्वाचे संबंध होते. पण भाजपच्या काही लोकांनी वाट्टेल ती वक्तव्यं करत राजकारणाची पातळी खाली आणली. ही पातळी एवढी खाली आणली की, महिला पत्रकारांशीही वाट्टेल त्या भाषेत बोलायला लागले. पण भाजपाला हे कळत नाही की, त्यांनी पेरलं तेच आता उगवत आहे. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची परंपरा आहे. त्यामुळे महाराष्ट्र भाजपाची ही हीन पातळी फार काळ सहन करणार नाही, असे प्रा. वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितले.