आज जरा वेगळ्या विषयावर लिहिणार आहे. आता निवडणुकीचा मौसम तोंडावर असल्याने सध्या राजकारण नाही. मुंबई, ठाणे महापालिकेतही काही घडत नाही. आचारसंहितेला गुंड टोळ्याही घाबरल्या असल्याने त्यांचे सर्व कामकाजच अंडरग्राउंड झाले आहे. साध्या वेशातील पोलीस ‘झारी’ मारत असल्याने जणू सर्वजण दुर्बिणीच्या टप्प्याबाहेरच गेल्यात जमा आहे. अशातच ‘महाराष्ट्राचा मानबिंदू’ असलेल्या एका प्रतिष्ठित वर्तमानपत्रात संपादकीय पानावर ‘महाराष्ट्राच्या पुरोगामी’पणाबद्दल शंका घेणारे स्फूट लिहून आले आहे. स्फूट लिहिणारे माझे सहकारी राहिलेले असून माझे चांगले मित्र आहेत.
गेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर ‘कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र’ हा तसेच सुसंस्कृतपणा, पुरोगामीत्व अशासारखे शब्द ऐरणीवर आले आहेत. अनेक राजकीय पक्षनेते तसेच समाजधुरीण असे शब्द चघळत असतात. या लेखकानेही ठाणे जिल्ह्यातील दोन अघोरी घटना देऊन याचे विश्लेषण करून काही प्रश्न विचारले आहेत. त्यात तथ्य नाही असे कोण म्हणेल?
“… मग बेकार देवलोक माझ्या अंगात यायचे..
उगाच तिकडे, दिसत नसेल पलीकडे
तरी एकटक शून्यात बघायचे.
परमार्थाचे विंडोशॉपिंग करायचे” (शांताराम)
असे प्रकार आजचे नसून गेल्या कित्येक वर्षांपासूनचे आहेत.. इतकी वर्षे गेली त्याविरुद्ध काम करणाऱ्यांचे खून पाडण्यात आले तरी समाज व सर्व सरकारे ‘ढिम्मच..’
संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व लोकमान्य टिळक ही आमची प्रातिनिधिक प्रतिके आहेत. त्यांनीच महाराष्ट्राच्या संस्कृतीची जोपासना केली व तिचा वारसा आपल्या हाती दिला, हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या पहिल्याच भाषणात स्पष्ट केलेले होते. परंतु नंतरच्या काळात विशेषतः गेल्या चाळीस वर्षांत हा वारसा हळूहळू उद्ध्वस्थ होत गेल्याचे आपण मुकाट्याने पाहात आहोत. या केवळ पाहण्यातच संस्कृती, पुरोगामीपणा वगैरे आपली गुणवैशिष्ट्ये पाण्यात वाहत असताना उघड्या डोळ्यांनी पाहिल्यावर पुरोगामीपणाबाबतचा प्रश्न विचारण्याचा अधिकार आपण केव्हाच गमावला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्रातील शिक्षण, मराठी माणसांचा समजूतदारपणा, सौजन्य, सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती आदी अनेक गुणवैशिष्ट्ये अभिमान बाळगण्यासारखीच आहेत यात शंका नाही. परंतु केवळ या गुणांवर पोट भरले जात नाही हेही तितकेच खरे आहे. शिक्षण नसले तरी चालेल, कुठल्यातरी राजकीय नेत्यांची ओळख वा एखाद्या भाईचा संपर्क असला तरी बास्स.. लक्ष्मी नळाने घागरी भरेल असे दिसतातच शिक्षणाच्या वाटेला कुणी जाईल का? विनाअनुदानित महाविद्यालयांनी तर गुणांची चक्क वजाबाकीच केलेली आहे आणि याच विनाअनुदानित महाविद्यालयात पैशांच्या जोरावर प्रवेश मिळवून बस्तान बसल्यावर माफियागिरी करून त्या परिसरात वर्चस्व निर्माण करणारे कमी आहेत काय?
सुमारे 60 / 65 वर्षांपूर्वी सरकारी नोकऱ्यात शिपाई कामासाठी ही बॉस मंडळी ‘यंडू गुंडू’ आणायचे हीच वेळ आता आलेली आहे. फक्त फरक इतकाच की यंडूगुंडूऐवजी भैय्या मंडळी आली आहेत. या परप्रांतीयांनी अशिक्षित मराठी तरुणांच्या नोकऱ्या लाटल्या आहेत. बरे ही मंडळी आली तर आली. एकटीदुकटी आली नाहीत, तर ती हजारोच्या लोंढ्यानी आली. झाले सर्व राष्ट्रीय राजकीय पक्षांना मतांचा एकगठ्ठा सापडला आणि नंतर सुरु झाले दृष्टचक्र! यांची संख्या चक्रवाढ व्याजासारखी वाढून आता महाराष्ट्रातील अनेक भागात त्यांची लोकसंख्या बेफाट वाढलेली आहे. उत्तर भारतातून आलेल्या या लोंढ्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कुठल्याच गोष्टीचे बंधन नाही. भीती नाही. त्यांनी काहीही करावे. उत्तर भारतीयांचे संघ त्यांना सांभाळण्यास तत्पर असतात.
आपल्या देशाच्या राजकारणातही उत्तर भारताचे प्राबल्य आहे. कुठल्याही राजकीय पक्षाचे राज्य असो त्यांच्या पाशवी बहुमतापुढे कुणाचे काहीही चालत नाही. या सर्वांचा परिपाक म्हणजे ‘आपुणासारखी करती तत्काळ’ या न्यायाने आपल्या समाजाने नाईलाजाने का होईना त्यांचे दुर्गुण आपलेसे केलेले आहेत. (आपल्या समाजात दुर्गुण नव्हते असा भाबडा समज आमचा नाही.) उत्तर भारतात शिक्षण कमी, समाजसुधारक आहेत. परंतु त्यांचे कुणीही ऐकत नाही. माफिया टोळ्यांचा हैदोस आहे. काही माफिया टोळ्यांचे खासदार समूहपण आहेत. सर्व इतके उघडेबोके आहे की कुणी कुणाला बोलावे असा प्रश्न आहे. तरीसुद्धा समाजसुधारणेच्या वाटेला न गेलेला तेथील सत्तारूढ पक्षाचा नेता महाराष्ट्रात आला की आपल्याला सुधारणेचे ‘वळसे’ देतो.
दूषित राजकारणाचा इतका परिणाम झाला आहे की हल्ली उत्तरेतून आलेली ही मंडळी टोळ्या-टोळ्यांनी येऊन शहराचा एकेक भाग कब्जात घेत आहेत. महात्मा गांधींच्या भाषेत त्यांना समजावताच येणार नाही. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील ‘मुळशी पॅटर्न’वर सिनेमा निघतो तसाच एखादा ‘मुंबई-ठाणे पॅटर्न’ही काढावा म्हणजे ही उत्तरेतील मंडळी सरकारी आणि महापालिकेच्या जमीनी कशा बाळकवतात तेही सर्वाना समजेल. तसेच मुळशी पॅटर्नला खतपाणी घालणाऱ्या पोलिसाधिकाऱ्यांचे काय? त्यांच्याही पँटी जरा सैल करा ना? युवकांना काय दोष देता? सर्वांनाच तत्काळ रिझल्ट हवे असतात. हातात नोटांची बंडले हवी असतात. त्यांचाही रंग जरा खरडवा ना? पुरोगामीपणा आणि संस्कृतीच्या नावाखाली आमचा तरुण ‘गोमू’ बनत आहे. त्याला त्यातून बाहेर काढून ठोसास ठोसा पद्धतीने जगा, असे सांगण्याची गरज आहे.