Homeमाय व्हॉईसआता फक्त सप्ततारांकित...

आता फक्त सप्ततारांकित ‘झुंबर’ कोसळले!

मुंबईतले सह्याद्री अतिथीगृह हे महाराष्ट्र सरकारचे प्रतिष्ठेचे सप्ततारांकित विश्रामधाम असून तेथील आदरातिथ्याने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पाहुणे भारावून गेल्याचे मी अनेकदा पाहिलेले आहे. त्याला कुठलाही दर्जा नव्हता तेव्हापासून त्याच्याशी संबंध आलेला आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे ते शासकीय निवासस्थान होते, इतके सांगितले तरी त्याचे पावित्र्य लक्षात येते. यशवंतरावांनतर जे जे मुख्यमंत्री झाले त्या सर्वांनी आपल्या निवासस्थानासाठी वर्षा बंगल्याला प्राधान्य दिल्याने वर्षा हे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान म्हणून रूढ झाले.

कालांतराने या सह्याद्री विश्रामगृहाचा कायापालट करून त्याचे रूपांतर सप्ततारांकित असे केले गेले. सप्ततारांकित हॉटेल्समध्ये ज्या सोयीसुविधा उपलब्ध असतात त्या सर्वाची येथे तजवीज करण्यात आलेली आहे. त्यामुळे या अतिथीगृहाची शान अधिकच वाढलेली आहे. या सप्ततारांकित अतिथीगृहाची सर्व जबाबदारी सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे. साहजिकच देखभालही त्याच खात्याकडे आहे.

आज या सप्ततारांकित अतिथीगृहाची आठवण होण्याचे कारणही तसेच विशेष आहे. रविवार असतानाही राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी एक बैठक या अतिथीगृहात आयोजित केली होती. या बैठकीच्या खोलीबाहेर फॉल्स सिलिंग कोसळल्याने एक झुंबर खाली कोसळले. अचानक हे सर्व घडल्याने सर्व अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली व त्वरेने त्यांनी बैठकीची खोली बदलली आणि नियोजित बैठक पार पडली.

झुंबर कोसळल्याने झालेल्या या छोट्या अपघातात कोणीही जखमी झाले नाही, ही खरोखरच समाधानाची बाब आहे. काहीही वावगे घडले नाही ही समाधानाची गोष्ट असली तरी सरकारच्या, विशेषतः सार्वजनिक बांधकाम खात्याबद्दल असमाधान व्यक्त करणारी नक्कीच आहे. खरेतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी एकत्रपणे बसून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचा ‘वर्ग’ घेण्याची गरज आहे.

तसं, वर्ग घ्यायला अजितदादा एकटेच पुरे आहेत. पण, मग अजितदादांनी त्यांच्या नेहमीच्या दादागिरीने काही केले की अशोकजी नाराज होणार. मग, उद्धवजींना त्यांची समजूत काढण्यासाठी चाय पे चर्चा करावी लागणार. हे सर्व करण्यात सध्याच्या कोरोना काळात बराच वेळ जाणार, म्हणूनच असा कालापव्यय होऊ नये म्हणून एकत्रित बैठक व्हावी असे सुचविले. शिवाय या एकत्रित बैठकीने आम्ही एकच आहोत हेही जनमतावर ठसवले जाईल. परंतु बारा गावचे पाणी प्यायलेले बांधकाम खात्यातील ‘बनेल’ अधिकारी काहीतरी अफलातून कारण पुढे करून यातून नेहमीप्रमाणेच सहीसलामत सुटतील, असा विश्वास आहे. म्हणूनच कुठल्याही कठीण प्रसंगातून सुटका करून घेण्यास समर्थ असल्यानेच याआधी जो अवतरणात बनेल हा शब्द वापरला आहे तो अधिक्षेपसाठी नसून कौतुकासाठीच आहे असे अधिकारीवर्गाने समजावे अशी कळकळीची विनंती आहे.

खरे तर सार्वजनिक बांधकाम खात्याला स्लॅब कोसळणे, भिंत खचली, कलथून खांब पडला, तसेच भिंतीचे वा छताचे पोपडे पडणे, लॉबीत खड्डे पडणे हे काही नवीन नाही. नवीन हे आहे की हे छत सह्याद्री अतिथीगृहाचे आहे आणि हे छत युवराजांच्या खास बैठकीच्या वेळी पडणे हे मात्र निश्चित नवीन आहे. शिवाय या अतिथीगृहापासून मुख्यमंत्र्यांचे वर्षा निवासस्थान अवघ्या हाकेच्या अंतरावर आहे. त्या माऊलीच्या काळजाचा ठोकाच चुकला असेल. या चुकलेल्या ठोक्याला जबर शिक्षा हाच एकमेव पर्याय!

या झुंबर कोसळण्याची तातडीने चौकशी केली जाईल. प्रसंगी बांधकामाचे ऑडिटही केले जाईल. विरोधी पक्षनेते फडणवीस आणि दरेकर याची सीबीआयने चौकशी करावी अशी मागणी करण्याच्या बेतात आहे असे सूत्रांनी सूचित केले आहे. किती मजा आहे बघा. सह्याद्री अतिथीगृहाचे झुंबर कोसळले तर सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली. खडबडून जागी झाल्याबद्दल दुःख नाही. पण हीच तत्परता जरा सामान्यांच्या नशिबीही येऊ दे ना! अनेक बीडीडी चाळी, आमच्या वांद्रे येथील सरकारी वसाहत जरा बघा.

इतकेच काय आज कोरोना काळात रुग्णालयांचा सर्वानाच पुळका आला आहे. तो योग्यही आहे. पण फार नाही. दक्षिण मुंबईतील जीटी, जेजे, कामा आणि सेंट जॉर्ज रुग्णालयातील अनेक कक्षांत जाऊन पाहा. त्यांच्या भिंती उडालेल्या आहेत. स्लॅब केव्हा रुग्णांच्या अंगावर कोसळतील याचा नेम नाही. काही महिन्यांपूर्वी लहान मुलांच्या कक्षातील छताचे तुकडे हळूहळू खाली पडत होते. एक बऱ्यापैकी मोठा तुकडा पडल्यानंतर बेड्स हलवण्यात आले. अधीक्षकांकडे रीतसर तक्रार केल्यावर तो अधीक्षक त्या साध्या परिचरिकेवरच डाफरला. यावर तुम्ही काय केलंत? ती परिचारिका म्हणाली- आम्ही बेड्स हलवले आणि तुमच्याकडे तक्रार केली. आम्ही आणखी काय करणार?

ते उत्तरले- आमच्या हातात काही नाही. शेवटपर्यंत याबाबत काहीही झाले नाही. कोरोना काळात सेंट जॉर्जच्या काही कक्षांत मोठे बदल झाले. परंतु बाकी अनेक कक्षात जुनेच रडगाणे सुरू आहे. फार काय, तेथील सर्व प्रकारचा कचरा नियमितपणे उचललाच जात नाही. असा बराच कचरा जमला की नाईलाजाने गच्चीवर रचून ठेवला जातो. एकदा मंत्रीमहोदयांनी गच्चीवर जाऊन पाहवेच. त्यांना कदाचित कचरा दिसणार नाही. पण ओंगळवाणी गच्ची नक्की दिसेल. तीच गत कामा रुग्णालय व जीटीची आहे. आमचे लई मागणे नाही. सह्याद्रीत काही घडले की जी तातडी दाखवता, त्याच्या निम्म्याने तरी रुग्णालयांना तातडी दाखवा. केवळ वातानुकूलित कक्ष निर्माण केले की रुग्णालय चकाचक होत नाही. त्यासाठी इमारतही भक्कम असावी लागते. नाहीतर झुंबराप्रमाणे एकेदिवशी तीही कोसळेल..

Continue reading

पोलीस आयुक्त देवेन भारती.. एक नजर इधर भी…

मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन यंदाच्या जानेवारी ते ऑगस्टमधील शहरातील गुन्हेगारीचा आलेख व पोलिसांची कामगिरी विषद केली. खरंतर अशा पत्रकार परिषदा घेऊन पोलीस, जनता व पत्रकारांध्ये माहितीचे आदानप्रदान होणे महत्त्वाचे असते. पूर्वी अनेक...

गणरायही गुदमरले रेल्वेस्थानक परिसरातल्या या प्रचंड गर्दीने!

सरकारी व रेल्वे खात्याच्या आकडेवारीच्या आधारे विचार केला तर ठाणे रेल्वेस्थानकातून दररोज सुमारे पाच ते सहा लाख प्रवासी ये-जा करीत असतात. प्रवासी नागरिकांबरोबरच स्थानक परिसरात असलेल्या लाखो फेरीवाल्यांमुळे आधीच हैराण झालेल्या प्रवाशांच्या हालात परिसरातच मोठा मंडप घालून सार्वजनिक गणपती...

मुंढेंच्या कारवाईविरूद्ध न्यायालयाचे अर्थशून्य ताशेरे! बहोत नाइंसाफी है यह…

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध विभागाचे आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून संपूर्ण राज्यभर एकच हलकल्लोळ माजला आहे. भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. औषध नियंत्रण नियमावलीचे पालन न करणाऱ्यांचे तर आता पितळ उघडे पडत आहे. अधूनमधून कारवाईचा दणका बसलेली...
Skip to content