Homeटॉप स्टोरीशरद पवारांबरोबरच्या चर्चेला...

शरद पवारांबरोबरच्या चर्चेला नाना पटोलेंची दांडी!

राज्यातल्या सत्ताधारी महाविकास आघाडीतल्या कुरबुरी मिटविण्याचे काँग्रेसचे प्रयत्न आजही अपुरे पडले. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. परंतु, या बैठकीला दोन्ही पक्षातल्या नव्या वादाला तोंड फोडणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीच दांडी मारली. दरम्यान, राज्य सरकारकडून आपल्यावर पाळत ठेवत असल्याच्या पटोले यांच्या आरोपाला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्ष दुजोरा दिला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसचे प्रभारी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी पक्षाच्या टिळक भवन येथील पक्षाच्या मुख्यालयात पक्षाच्या विविध नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावरही बरीच चर्चा झाल्याचे कळते. दोन दिवसांपूर्वी लोणावळ्याच्या एका पक्ष कार्यकर्त्यांच्या शिबिरात पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला होता. त्यावरून सत्ताधारी महाविकास आघाडीतला पेच वाढला होता.

पटोले यांच्या आरोपाबद्दल शरद पवार यांना विचारले असता त्यांनी लहान माणसांच्या वक्तव्यावर आपण भाष्य करत नाही, असे सांगत पटोले यांना उडवून लावले. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही यावर भाष्य करताना प्रत्येक सरकार आपल्याला असलेले धोके जाणून घेण्यासाठी यंत्रणा निर्माण करते, असे सांगत पटोले यांच्या आरोपाला अप्रत्यक्ष दुजोराच दिला होता.

आज पाटील यांच्या उपस्थितीत या विषयावर चर्चा झाल्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना पाटील यांनी पटोले यांच्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचे नमूद केले. पटोले यांना केंद्र सरकार आपल्यावर पालत ठेवत असल्याचे सांगायचे होते. परंतु त्यांनी केंद्र असा शब्द वापरला नसल्याने सर्वांनी असा अर्थ काढला, असे पाटील म्हणाले.

आज संध्याकाळी पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंळाने शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक, या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे मंत्रीही यात सहभागी होते. मात्र, पटोले त्यांच्याबरोबर गेले नाहीत. या नेत्यांनी जवळजवळ पाऊण तास पवार यांच्याबरोबर चर्चा केली.

चर्चेनंतर थोरात यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी भाष्य केले. सध्याची राजकीय स्थिती, विधानसभा अध्यक्षांची निवडणूक, केंद्र सरकारने स्थापन केलेले सहकार मंत्रालय, अशा विविध विषयांवर आम्ही चर्चा केली. महाविकास आघाडीत कोणत्याही कुरबुरी नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Continue reading

सरकारने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी!

ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या हातात भरीव मदत देण्याऐवजी अवघ्या पाच हजार रुपयांची घोषणा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झालेली पिके, कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या पाच हजार...

रजेवर भिमनवार; एमपीएससीच्या हंगामी अध्यक्षपदी वाघोले स्वार!

राज्याच्या विधि न्याय विभाग आणि संसदीय कार्य विभागाचे निवृत्त सचिव सतीश वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) हंगामी (प्रभारी) अध्यक्षपदी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी नियुक्ती केली आहे. एम.पी.एस.सी.च्या प्रश्नपत्रिका फुटत असल्याच्या प्रकरणावरून एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी...

राष्ट्रीय स्लिंगशॉट स्पर्धेत गौरव मोकाशींना सुवर्णपदक

१४वी राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४० ते ४५ वर्षे वयाच्या गटात दहिसर, मुंबईचे गौरव मोकाशी यांनी सुवर्णपदक पटकावले. या आधीच्या राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिपमध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले होते....
Skip to content