Homeमाय व्हॉईसपोलीस महासंचालकांच्या खुर्चीखाली...

पोलीस महासंचालकांच्या खुर्चीखाली ‘सुरुंग’?

सध्या पोलिसांच्या काळ्याकुट्ट कारभारात रुपेरी कडा असलेले पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी महासंचालक पदाची सूत्रे हाती घेऊन जेमतेम चार महिने होत नाहीत तोवरच काही ‘प्रभावशाली’ असंतुष्ट अधिकाऱ्यांनी पांडे यांच्या खुर्चीखाली सुरुंग लावण्याचे कारस्थान सुरू केल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे. संतापजनक बाब म्हणजे या असंतुष्ट अधिकाऱ्यांना महासंचालकांविरुद्ध काहीही सापडत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी एका माजी सहाय्यक आयुक्तावर आरोप करून महासंचालकांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न चालविला आहे.

संजय पांडे हे महाराष्ट्र पोलीस दलातील स्वच्छ प्रतिमेचे निडर अधिकारी म्हणून ओळखले जातात. नियमावर बोट ठेवून कायद्याप्रमाणे वागणारा हा अधिकारी असल्याने त्यांच्या विरोधात या असंतुष्ट अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराचे एकही प्रकरण वा अनियमितता मिळत नसल्याने त्यांची फारच गोची झाली होती. परंतु या चांडाळ चौकडीने हार मानली नाही. एका माजी अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने या चौकडीने नेहमीप्रमाणे एक ‘लेटरबॉम्ब’ तयार केला. मात्र, हा बॉम्ब न्यायालयाकडे न पाठवता लाचलुचपत विरोधी विभागाच्या महासंचालकांना पाठवला.

हा फुस्स झालेला बॉम्ब पाठवताना मंडळींनी गमतीजमती केल्या. प्रथम या बॉम्बवर कोणाचे नाव नाही. सात पानी बॉम्बच्या शेवटी स्वाक्षरी वा नाव न लिहिता केवळ पोलीस निरीक्षक इतकेच शब्द बापुडे उमटले आहेत. तरीही हे बापुडे शब्द देशाच्या माननीय राष्ट्रपतींपासून तो राज्याच्या गृह मंत्र्यांपर्यंत पाठवल्याचे नमूद केले आहे.

पोलीस

खरी गंमत पुढेच आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यालयात तीन व्यक्तींनी याचे वाचन केले व साफसूफ करून त्या अधिकाऱ्यांना हिरवा कंदील दाखवला. परंतु हा बॉम्ब जवळ कसा बाळगणार? हातातच फुटला तर? कुरियरही करता येत नव्हता. कारण कुरियरवाल्याला पाठवणाऱ्याचे नाव/पत्ता द्यावा लागतो. मग त्यांनी व्हॉट्स एप विद्यापीठाची मदत घ्यायची ठरविले. या विद्यापीठातून काहीही कोठेही क्षणभरात पाठवता येते. इतकेच नव्हे तर क्षणभरात ते कित्येक योजने जाते. आणि झाले! क्षणभरात पोलिसांच्या अनेक व्हॉट्स एप समूहांमध्ये ते अवतरलेसुद्धा!!

या सात पानी फुसक्या बॉम्बमध्ये माजी सहाय्यक आयुक्त राजेंद्र त्रिवेदी यांच्या वर अनेक बेबुनियाद आरोप करण्यात आले आहेत. यात बदल्यांपासून तो दाऊद संबंध, परदेश प्रवास..  त्यात दुबई ते पाकिस्तानही आले पाहिजे. तसेच मुंबईतील दाऊदचा चिंधी पंटर, या सर्व गोष्टींचा उल्लेख आहे. बदल्यांमध्ये कोटींच्या कोटी उड्डाणे होत असताना येथेही 25 कोटींची रक्कम ठोकून दिलेली आहे.

या सर्व कथित आरोपांबाबत माजी अधिकारी राजेंद्र त्रिवेदी यांच्याशी संपर्क साधला असता प्रथम त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून तर लावलेच आणि वर या व्हॉट्स एप मेसेजची सायबर क्राईम विभागामार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी केली. या संबंधात आपण स्वतः पोलीस महासंचालक संजय पांडे यांना पत्र लिहून याप्रकरणी चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणार आहोत, असे ते म्हणाले.

आपल्याकडे पारपत्रच नसल्याने परदेशी प्रवास करणे शक्यच नसल्याचे त्यांनी ठासून सांगितले. संजय पांडे यांच्या कार्यालयात आपण कधीच ठाण मांडून बसत नाही आणि महासंचालकांच्या कामात हस्तक्षेप तर मुळीच करत नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली. पांडे साहेबांची कार्यपद्धती ज्याला माहिती आहे तो असा बिनबुडाचा आरोप करणारच नाही, असे सांगून त्रिवेदी म्हणाले की, हे निवेदन कोणी निरीक्षकाने केलेलेच नाही. हे असंतुष्ट अधिकाऱ्यांचेच काम आहे. आता सायबर क्राईम कोणाला हुडकून काढते ते पाहणे मनोरंजक ठरेल!

Continue reading

पोलीस आयुक्त देवेन भारती.. एक नजर इधर भी…

मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन यंदाच्या जानेवारी ते ऑगस्टमधील शहरातील गुन्हेगारीचा आलेख व पोलिसांची कामगिरी विषद केली. खरंतर अशा पत्रकार परिषदा घेऊन पोलीस, जनता व पत्रकारांध्ये माहितीचे आदानप्रदान होणे महत्त्वाचे असते. पूर्वी अनेक...

गणरायही गुदमरले रेल्वेस्थानक परिसरातल्या या प्रचंड गर्दीने!

सरकारी व रेल्वे खात्याच्या आकडेवारीच्या आधारे विचार केला तर ठाणे रेल्वेस्थानकातून दररोज सुमारे पाच ते सहा लाख प्रवासी ये-जा करीत असतात. प्रवासी नागरिकांबरोबरच स्थानक परिसरात असलेल्या लाखो फेरीवाल्यांमुळे आधीच हैराण झालेल्या प्रवाशांच्या हालात परिसरातच मोठा मंडप घालून सार्वजनिक गणपती...

मुंढेंच्या कारवाईविरूद्ध न्यायालयाचे अर्थशून्य ताशेरे! बहोत नाइंसाफी है यह…

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध विभागाचे आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून संपूर्ण राज्यभर एकच हलकल्लोळ माजला आहे. भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. औषध नियंत्रण नियमावलीचे पालन न करणाऱ्यांचे तर आता पितळ उघडे पडत आहे. अधूनमधून कारवाईचा दणका बसलेली...
Skip to content