मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची तासभर एकांतात चर्चा केल्यानंतर मनसे महाराष्ट्रातल्या सत्ताधारी महायुतीत लवकरच सहभागी होण्याची शक्यता वाढल्याच्या चर्चेला ऊत आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वरचेवर भेटी घेत आहेत. राज ठाकरे यांनी अलीकडेच हिंदुत्वाची कास धरली आहे. मात्र, त्याचबरोबर त्यांनी मराठी माणसाचा मुद्दाही सोडलेला नाही. भाजपाला मनसेचा हाच मराठी माणसाचा मुद्दा खटकत आहे. परंतु लोकसभेत चारशे पारचा नारा प्रत्यक्षात उतरवायचा असेल तर मनसेशी जुळवून घ्यावे लागेल, या निष्कर्षापर्यंत भाजपाचे नेते आले आहेत.
नवी दिल्लीत भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या दोन दिवसांच्या सत्रात दिल्लीतल्या भाजपा नेत्यांनी महाराष्ट्रातल्या नेत्यांशी याच अनुषंगाने चर्चा केली. त्यानंतर लगेचच आज शेलार यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली असल्याचे बोलले जाते. लोकसभेत मनसेचा पाठिंबा घ्यायचा आणि त्या मोबदल्यात महायुतीतल्या घटक पक्षाला जिंकणे अशक्य असलेल्या जागा सोडाव्यात किंवा त्या बदल्यात विधानसभेसाठी जास्त जागा द्याव्यात असा प्रस्ताव पुढे येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या चर्चेनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. परंतु यात या विषयावर कोणतेही भाष्य त्यांनी केले नाही. शेलार यांनीही नंतर माध्यमांशी बोलताना या चर्चेबद्दल योग्य वेळी योग्य ती माहिती दिली जाईल, असे सांगितले.