मुंबई मुक्कामी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर 80 कोटी रुपयांच्या डांबर घोटाळ्याचा आरोप होताच रत्नागिरी मुक्कामी भल्या सकाळी अनेकांच्या घरी मोबाईलच्या बेल घघणल्या! मांडवलीची भाषा होती. आता आम्हाला सांभाळून घ्या, तुमच्याकडेही पाहू, काळजी कशाला करताय? आपल्याला घेऊन सर्वांचाच विकास करायचा आहे, असे मार्दव आवाजात समजावून लक्ष्मीलेपनाची सुरुवात झाल्याची माहिती हाती आली आहे. काहींना तर पक्षात मोठे पद देतो अशा गोड थापाही मारल्याचे समजते.
संतापजनक बाब म्हणजे ज्या मिलिंद कीर यांनी 80 कोटी रुपयांचा डांबर घोटाळा उघड केला त्यांनाच ‘मोहपाशात’ गुंतवण्याचाही अश्लाघ्य प्रयत्न झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान सर्व विरोधी पक्षांनी या डांबर घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. परंतु या मागणीचे काय होईल हे सांगण्याची आवश्यकता नसल्याचे दर्शवणारे एक छायाचित्र सोबत जोडले असल्याने यावर अधिक बोलण्याची गरज नसल्याचे वाटते. हे छायाचित्र जुने नाही. अवघे चार दिवसांपूर्वीचे आहे!
खरेतर उद्योगमंत्री सामंत आणि त्यांचे बंधुराज ‘भैय्या’ यांचे प्रताप आम्ही कोरोना काळात वाचकांसमोर ठेवले होते. आम्हाला कल्पना आहे की रस्तेबांधणीचा व्यवसाय हा उद्योगमंत्र्याचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. तो तसा असण्याबद्दल कुणाचाच आक्षेप नाही. मात्र रत्नागिरी व शेजारच्या सिंधुदूर्ग जिल्ह्यातील रस्त्यांची कामे आपल्याच कंपनीला मिळावीत हा अट्टाहास मात्र चुकीचा आहे. हे तर काहीच नाही. रस्ते किंवा द्रूतगती मार्ग वा महामार्गाचे काम अन्य कंत्राटदारास मिळाल्यास त्या कामात अडथळा निर्माण करण्यात हे भैय्याजी वाकबगार आहेत, असे बोलले जाते.

या डांबर घोटाळ्यात कंपनीने अनेकदा बोगस बिले दिल्याचा आरोप आहे. एकच बिल त्यांनी वरील क्रमांक बदलून अनेक ठिकाणी सादर केल्याचे उघडकीस आले आहे. वास्तविक बिल सादर केल्यानंतर व बिल अदा केल्यानंतर त्यावर सही, शिक्का मारला जातो व झेरॉक्स रद्द केली जाते. हे संपूर्ण प्रकरण राज्य सीआयडीकडे दिल्यास अनेक गंभीर प्रकार उघडकीस येण्याची शक्यता कीर यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केली आहे. चौकशी करता असेही समजले की सार्वजनिक बांधकाम खात्यातील एक-दोन अभियंते रत्नागिरी विभागात गेली 15/20 वर्षे फेव्हिकॉल लावून बसले आहेत. त्यांचा ‘देवपिता’ भलताच बाहुबली असल्याची चर्चा त्या विभागात नेहमीच होत असते.
उद्योगमंत्री सामंत यांचे तथाकथित कारनामे इथेच संपलेले नाहीत. एमआयडीसी, आरोग्ययंत्रणा, पाणीपुरवठा खाते आदी अनेक खात्यात पुरेपूर उतरलेले आहेत. सामंत यांची कंपनी रस्तेबांधणीचे काम करते. म्हणजे खडी आणि डांबर त्यांना लागतेच. क्रशरचे काम तर जोरातच होत असते. या कुटुंबाचा एक संबंधित प्रकल्प दाभोळे गावाच्या परिसरात आहे. या प्रकल्पामुळे आजूबाजूची चार-पाच गावे प्रदूषणमय झाल्याचे तेथील रशिवाशांनी सांगितले. “The more corrupt state, the more numerous laws” या उक्तीनुसार कायद्यातील पळवाटांमुळे कुणावरही कारवाई होऊ शकत नाही, हे या देशाचे दुर्दैव आहे. तसेच “A man who has never gone to school may steal freight car, but if he has university education he may steal the whole railroad” आणि राज्यात नेमकं हेच घडत आहे. यामुळे राज्य खड्ड्यात जात आहे, हे प्रमुख नेत्यांच्या लक्षातच येत नाही.
जाता जाता कवी कुसुमाग्रज यांचा ‘युगादेश’…
‘मान्य आहे
आज सर्वत्र साम्राज्य आहे ते
अत्याचार हा अधिकार
आणि भ्रष्टाचार हा धर्म
मानणाऱ्या किचकांचं..
राजगृहात किचक जन्माला येतात
त्यांचा नि:पात करणारी
भीमशक्ती ही
अंशअंशाने जन्माला येते’..
याच आशेवर तर तुम्ही-आम्ही जगत असतो, जगत आलो आहोत…