विजयकुमार कसे आहात? काय चाललंय?, ही साद आता ऐकू येणार नाही. 40 वर्षे बाळासाहेबांचा विश्वास बाळगायचा ही सोपी गोष्ट नव्हे! शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी उर्फ सरांचे काल पहाटे निधन झाले. रुग्णशय्येवर जाण्याआधी सर नेहमीच मॉर्निंग वॉकला जायचे. नव्हे तो त्यांचा दिनक्रमच होता. अगदी तसेच आपल्या महायात्रेलाही ते पहाटेच निघाले. काल रात्रीच जेव्हा उशिरा समजले की त्यांना व्हेन्टीलेटरवर ठेवले आहे तेव्हाच पुढे काय होणार याची चाहूल लागलेली होती. वयही झालेले होते. तशात शरीरही साथ देत नव्हते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटतम सहकाऱ्यांपैकी बहुतेक सर्व प्रकृतीच्या या ना त्या कारणाने त्रस्त होते. परंतु जोशी सर मात्र गेली पाच-सहा वर्षे वगळता फिट होते, हे मान्यच केले पाहिजे. प्रकृती तंदुरुस्त होती म्हणूनतर त्यांनी अनेक आव्हाने पेलली. काहींशी निकराने लढले. काही अंगावर घेतली. परंतु शिवसेनाप्रमुखांची साथ कधीच सोडली नाही. पत्रकारितेत असल्याने त्यांना साडेचार दशके ओळखत होतो. नव्हे आमची बऱ्यापैकी मैत्रीच होती. ते माझे ज्येष्ठ मित्र होते. वडीलकीच्या हक्काने ते चार गोष्टी सांगतही असत. जेव्हा जेव्हा ते भेटत तेव्हा ‘विजयकुमार कसे आहात?’ असे पूर्ण नाव उच्चारून विचारपूस करायचे व हळूच सांगायचे दुपारी जमलं तर फेरी मारा. उशीर करू नका असे बजावण्यासही विसरत नसत. आम्ही काय बातमीच्या मागेच असायचो. दुपारी बोलावले आहे म्हणजे काही तरी खास ‘बॉम्ब’ असणारच असे मनोमन जाणून आम्ही बातमीचे वारकरी होणेच पसंत करत असू!
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी मुकाबला करून सरांनी राजकारणात प्रतिष्ठा प्राप्त केली होती. अगदी नगरसेवकापासून ते मुख्यमंत्रीपद, केंद्रीय मंत्री, लोकसभा अध्यक्षपदापर्यंतची विविध पदे त्यांनी लीलया सांभाळली होती. यामागे त्यांचे जसे कर्तृत्त्व होते तशीच शिवसेनाप्रमुखांवरील जाज्वल्य निष्ठाही होती, हे मान्य करायला हवे. शिवसेनाप्रमुखांनी सरांना आणि सरांनी शिवसेनाप्रमुखांना कधीच दगा दिला नाही व तसा स्वप्नातही विचार केला नाही.
आता राजकारण म्हटले की जी व्यक्ती पक्षप्रमुखांच्या अत्यंत जवळ असते त्या व्यक्तीविरुद्ध ‘काड्या’ घालणारे लोक काही कमी नसतात. तसे येथेही झाले. अगदी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या कारभारापासून काहींनी ‘पेट्रोल’ टाकायला सुरुवात केलेली होती. पेट्रोल टाकलेही होते. परंतु या दोघांपैकी कुणीही आपल्याजवळील काडीपेटीतील काडी काढून आग लावली नाही. त्यामुळे ओतलेले पेट्रोल हवेत उडूनच गेले, अशा अनेक कहाण्या मला माहित आहेत.
“There are three essentials to leadership : humanity, clarity and courage” हे नेतृत्त्वाचे तीनही गुण सरांमध्ये होते. याशिवाय प्रत्येक लहानसहान गोष्टीत डोक्यात राग घेऊन राहणाऱ्या शिवसेना नेत्यांना शांत करणे हेही तितकेच महत्त्वाचे काम सर लीलया पार पाडायचे. याबाबत वर्तमानपत्रांमध्ये सडकून टीकाही व्हायची. पण सर त्या टिकेला हसतमुखाने सामोरे जायचे. श्रीकृष्ण आयोग व एनरॉन ही वादाची प्रकरणे अंगावर घेऊनही राजकीय कौशल्याने त्यातून सरकारची नौका पैलतटावर घेऊन जाण्यात त्यांचे राजकीय कसबच दिसून येते. मुंबई महापालिकेच्या महापौर वा अन्य समित्याच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला नेहमीच भरघोस मते पडत होती, हे ध्यान्यात घेण्याजोगे आहे.
शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर नवीन पक्षनेतृत्त्व व सरांचे पटेनासे झाले होते. खरं तर हा दोन पिढ्यांमधला वाद होता. वाद काय मतभेदच होते. परंतु काही हितशत्रूंनी त्याला हवी तितकी हवा दिली व मजा पाहात उभे होते. यातूनच शिवाजी पार्कचा नको तो प्रसंग घडला आणि सरांना त्यांच्या घरासमोरच अवमानित केले गेले. त्याचवेळी पक्षनेतृत्त्वाने हस्तक्षेप करून तो प्रसंग टाळायला हवा होता, असं मनापासून वाटतं. पण झालं ते झालं. अवमानित होऊनही सरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्यास नकार दिला ही लक्षणीय बाब आहे. ज्या शिवसेनेने मला सन्मानाची सर्व पदे दिली त्या पक्षाला मी दगा देणार नाही असं त्यांनी निक्षून सांगून आपली खणखणीत पक्षनिष्ठा दाखवलीच!!
सर भले शिवसेनेचे ज्येष्ठ व प्रमुख नेते होते. परंतु त्यांनी आपली पातळी केव्हाच सोडली नाही. नेहमीच सुसंकृतपणेच सर्व सुखदुःखाला सामोरे गेले. वहिनींच्या जाण्याने ते खचले होते. बरेचसे एकाकी पडले होते. तरीही कर्तव्यभावनेने शिवसेना शाखेत ते बसत असत. शिवसेनेच्या नवनेत्यांनी हे जरूर लक्षात घेतले पाहिजे की पदे मिळतील व जातीलही. परंतु ज्यामुळे आपल्याला ती पदे मिळाली त्या शाखेला विसरता कामा नये हे सरांनी शिकवले. शिवसेनेच्या पहिल्या पिढीतील या अष्टपैलू नेत्याला शेवटचा सलाम!