अमेरिकेच्या हवाई दलाच्या अलास्का इथल्या आइल्सन हवाई तळावर नुकत्याच झालेल्या एक्स रेड फ्लॅग या हवाई युद्धसरावादरम्यान मिळालेल्या समृद्ध अनुभवाच्या पार्श्वभूमीवर आता भारतीय हवाई दलही एक्स तरंग शक्ती 2024, या हवाई युद्धसरावाचे आयोजन आणि त्यात सहभागी होत असलेल्या इतर देशांच्या हवाई दलांच्या तुकड्यांचे यजमानपद भूषवण्यासाठी सज्ज झाला आहे. एक्स तरंग शक्ती 2024 हा हवाई युद्धसराव भारताच्या वतीने आयोजित पहिला बहुराष्ट्रीय हवाई युद्धसराव असणार आहे. चालू वर्षाच्या अखेरीला हा हवाई युद्धसराव आयोजित केला जाणार आहे.
अमेरिकेच्या हवाई दलाच्या अलास्का इथल्या आइल्सन हवाई तळावर नुकत्याच झालेल्या एक्स रेड फ्लॅग 2024 हवाई युद्धसरावात भारतीय हवाई दलाच्या तुकडीने यशस्वी सहभाग नोंदवला. विविध देशांच्या हवाई दलांचा सहभाग असलेला हा सराव 4 जूनला सुरू झाला. या सरावाचा 14 जूनला समारोप झाला. एक्स रेड फ्लॅग 2024चे हे दुसरे पर्व होते. हा सराव एक प्रगत लढाऊ हवाई प्रशिक्षण सराव असून अमेरिकी हवाई दलाच्या वतीने वर्षातून चार वेळा हा सराव आयोजित केला जातो. या सरावात भारतीय हवाई दलासह रिपब्लिक ऑफ सिंगापूर एअरफोर्स, ब्रिटनचे रॉयल एअर फोर्स, रॉयल नेदरलँड्स एअर फोर्स, जर्मन लुफ्तवाफ्फे आणि यूएस एअर फोर्स सहभागी झाले होते.
या सरावात भारतीय हवाई दलाच्या तुकडीत राफेल विमानांच्या ताफ्यासह हवाई कर्मचाऱ्यांचे पथक, तंत्रज्ञ, अभियंते, नियंत्रक आणि हवाई दलाशी संबंधित विषय तज्ञांचा समावेश होता. एक्स रेड फ्लॅग या हवाई युद्ध सरावात भारतीय हवाई दलातील राफेल विमानांचा हा पहिलाच सहभाग होता. यावेळी या विमानांनी सिंगापूर तसेच अमेरिकी हवाई दलांच्या एफ-16 आणि एफ-15 तसेच अमेरिकी हवाई दलाच्या ए-10 या लढाऊ विमांनांसोबत उड्डाण करत युद्धसराव केला. सरावात सहभागी झालेल्या भारतीय हवाई दलाच्या पथकाने युद्धसरावातील मोहिमांच्या आखणी आणि नियोजनात सक्रिय सहभाग नोंदवला. याशिवाय त्यांनी सरावादरम्यान त्यांच्यावर सोपवलेल्या विशिष्ट मोहिमांचे नेतृत्त्व करण्याची जबाबदारीही पार पाडली.
या सरावाच्या काळातली हवामानविषयक परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक होती. शिवाय बहुतांश काळ तापमानाचा पारा जवळपास शून्यापेक्षा खाली गेलेला होता. अशा स्थितीतही सरावाच्या संपूर्ण कालावधीत सर्व विमानांची कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी आणि या विमानांवर सोपवलेल्या सर्व मोहिमा विनाअडथळा पार पडाव्यात यासाठी भारतीय हवाई दलाच्या देखभाल पथकाने परिश्रमपूर्वक आपली जबाबदारी चोख पार पाडली. त्यांच्या या परिश्रमांमुळेच सरावाच्या संपूर्ण कालावधीत 100पेक्षा जास्त उड्डाणे करणे शक्य झाले.