नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक वित्तीय सेवांचा लाभ आठ कोटी ग्राहकांना उपलब्ध करून देत एक महत्त्वाचा टप्पा गाठल्याची घोषणा इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (आयपीपीबी) काल केली.
या बँकेच्या स्थापनेपासून, आयपीपीबी देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात सुलभ आणि किफायतशीर बँकिंग उपाय प्रदान करण्यासाठी समर्पित आहे. आठ कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची ही उल्लेखनीय कामगिरी भारतातील लोकांची आयपीपीबीवर असलेली निष्ठा आणि विश्वास दर्शवते. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेची स्थापना ही आर्थिक दरी भरून काढण्यासाठी, सेवा उपलब्ध नसलेल्या लोकसंख्येला सशक्त बनवण्यासाठी आणि पारंपरिक व डिजिटल बँकिंग सेवांच्या संयोजनाद्वारे आर्थिक समावेशन करण्यासाठी एक धोरणात्मक पाऊल होते.
आर्थिक समावेशनाच्या वचनबद्धतेसह, आयपीपीबीने दुर्गम आणि सेवा नसलेल्या भागात राहणाऱ्या लोकांसह विविध जनसमूहातील व्यक्तींना सक्षम बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. डिजिटल बँकिंग सेवांवर बँकेने लक्ष केंद्रित केल्याने विनाअडथळा व्यवहार सुलभ झाले आहेत, ज्यामुळे बँकिंग सेवा मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचत आहेत.
“इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने 8 कोटी ग्राहकांचा टप्पा गाठला आहे हे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. हे यश, व्यक्तीचे स्थान किंवा सामाजिक-आर्थिक स्थिती विचारात न घेता प्रत्येक भारतीयाला बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याच्या आमच्या उद्दिष्टाची साक्ष आहे,” असे आयपीपीबीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (हंगामी) आणि मुख्य कार्यान्वयन अधिकारी ईश्वरन व्यंकटेश्वरन यांनी सांगितले.
टपाल कार्यालयांच्या विस्तृत जाळ्यासह, आयपीपीबीच्या ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाने या महत्त्वाच्या टप्प्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.आर्थिक समावेशनाला पुढे नेण्यासाठी, नाविन्यपूर्ण उत्पादने समोर आणण्यासाठी आणि आगामी वर्षांमध्ये ग्राहकांचा अनुभव वाढवण्यासाठी बँक वचनबद्ध आहे.
ही कामगिरी साजरी करत असताना, ग्राहक, भागधारक आणि आयपीपीबीआणि टपाल विभागाच्या समर्पित चमूची त्यांनी दिलेल्या लक्षणीय पाठबळाबद्दल आयपीपीबीने कृतज्ञता व्यक्त केली आहे. आर्थिकदृष्ट्या सर्वसमावेशक भारताच्या दिशेने प्रवास सुरूच आहे आणि यासाठी आयपीपीबी आघाडीवर आहे, सुलभ बँकिंग सेवांद्वारे सकारात्मक बदल घडवून आणत आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेबद्दल
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) ही भारत सरकारच्या मालकीच्या 100% भागीदारीसह टपाल विभाग, दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आली आहे. आयपीपीबी1 सप्टेंबर 2018 रोजी सुरू करण्यात आली. भारतातील सर्वसामान्यांसाठी सर्वात सुलभ, किफायतशीर आणि विश्वासार्ह बँक तयार करण्याच्या दृष्टीकोनातून या बँकेची स्थापना करण्यात आली आहे. 155,000 टपाल कार्यालये (ग्रामीण भागात 135,000) आणि 300,000 टपाल कर्मचारी असलेल्या टपाल जाळ्याचा लाभ घेऊन बँकिंग सेवा नसलेल्या लोकांना येणारे अडथळे दूर करणे आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचणे हे इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे मूलभूत उद्दिष्ट आहे.