Homeटॉप स्टोरीचीन नियंत्रित काही...

चीन नियंत्रित काही भारतीय कंपन्यांवर इन्कमटॅक्सची धाडसत्रे!

चीनसह काही शेजारी देशांद्वारे नियंत्रित काही भारतीय कंपन्या आणि त्यांच्या सहयोगी घटकांवर प्राप्तीकर विभागाने नुकत्याच घातलेल्या धाडसत्रांमध्ये जप्तीची कारवाई करताना सुमारे २८ कोटींची रक्कम गोठवण्यात आली असल्याचे समजते.

या कंपन्या रसायने, बॉल बेअरिंग्ज, यंत्राचे सुटे भाग आणि इंजेक्शन मोल्डिंग यंत्रणा, या व्यवसायात आहेत. मुंबई आणि गुजरातमधील अहमदाबाद, गांधीधाम तसेच दिल्लीमधील सुमारे २० ठिकाणी ही धाडसत्रे घालण्यात आली. या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात बेहिशेबी कमाई केल्याचे डिजिटल डेटाच्या रूपातले पुरावे सापडले आहेत. ते जप्त केले गेले आहेत.

या कंपन्या हिशेबाच्या पुस्तकांमध्ये फेरफार करून करचोरी करत असल्याचे आढळून आले आहे. या कंपन्यांनी बोगस कंपन्यांच्या नेटवर्कचा वापर करून एका शेजारील देशात निधी हस्तांतरित केल्याचे पुराव्यातून समोर आले आहे. वरील कार्यपद्धतीद्वारे मागील दोन वर्षांत अंदाजे २० कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यात आली. मुंबईतील एका व्यावसायिक कंपनीने या बोगस कंपन्यांच्या निर्मितीमध्ये केवळ मदतच केली नाही तर त्यांना बनावट संचालकही पुरवल्याचे तपासात समोर आले आहे.

तपासात असेही दिसून आले आहे की, हे बोगस संचालक एकतर व्यावसायिक कंपनीचे कर्मचारी/वाहनचालक होते किंवा ते कोणत्याही अर्थाने कंपनीशी संबंधित नव्हते. चौकशी केली असता, त्यांनी मान्य केले की, या कंपन्यांच्या कारभाराची आपल्याला माहिती नव्हती आणि मुख्य अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कागदपत्रांवर ते स्वाक्षऱ्या करत होते. बँकिंग व्यवहार आणि इतर नियामक आवश्यकतांसाठी त्यांचे पत्ते प्रदान करून परदेशी नागरिकांना मदत करण्यासाठीही व्यावसायिक कंपनीने भूमिका बजावली आहे.

रसायनांचा व्यापार करणाऱ्या अशा कंपन्यांपैकी एकीने कमी कर असलेल्या मार्शल बेटाद्वारे खरेदीचा दावा केल्याचे आढळून आले. कंपनीने प्रत्यक्षात शेजारच्या देशातील कंपनीकडून ५६ कोटी रुपयांची खरेदी केली. पण, मार्शल बेटाकडूनही तेच बिल दाखवले आहे. तथापि, अशा खरेदीचे पैसे शेजारच्या देशात असलेल्या मार्शल बेट-आधारित कंपनीच्या बँक खात्यात वर्ग केले गेले आहेत. या भारतीय कंपनीचे कर दायित्व कमी करण्यासाठी खोटी खरेदी बिले घेण्यात आणि भारतातील जमीन खरेदीसाठी बेहिशेबी रोकडदेखील देण्यात आल्याचे शोध प्रक्रियेदरम्यान पुढे उघड झाले.

झडतीच्या कारवाईत यापूर्वीच सुमारे ६६ लाख रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे. काही कंपन्यांची बँक खाती, एकूण बँक शिलकी सुमारे रु. २८ कोटी, गोठवण्यात आले आहेत.

Continue reading

लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना ३० नोव्हेंबरला?

महिला आरक्षणाला जोडून देशातल्या लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यासाठी आणि ही प्रक्रिया २०२९च्या लोकसभा निवडणुकीआधी पूर्ण करण्यासाठी येत्या ३० नोव्हेंबरपासून संसदेचे चार दिवसांचे अधिवेशन होणार असल्याचे समजते. येत्या ३० नोव्हेंबरला लोकसभेचे एक दिवसाचे अधिवेशन होईल तर दोन डिसेंबरला राज्यसभेत एका...

‘मालवणी रोंबाट’चे प्रकाशन

कवी अरविंद परुळेकर लिखित 'मालवणी रोंबाट', या अनोख्या साहित्यकृतीचा भव्य प्रकाशन सोहळा काल रविवारी, मुंबईतल्या गोरेगाव येथील प्रज्ञाबोधिनी हायस्कूल हॉलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास एखाद्या कौटुंबिक मेळाव्याचे स्वरूप आले होते. कवि अशोक नायगावकर, प्रसाद कुलकर्णी, शशिकांत तिरोडकर, प्रख्यात...

समकालीन भान आणि साहित्यिक मूल्य जपणारा ‘हेमांगी’!

महाराष्ट्रातील दर्जेदार दिवाळी अंकाच्या परंपरेतील महत्त्वाचे नाव म्हणजे ‘हेमांगी’. यंदा ‘हेमांगी’चा ५१वा दिवाळी अंक प्रकाशित झाला. यंदाच्या काही मोजक्या सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकांमध्ये या अंकाचा समावेश करावा लागेल. या अंकात ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांनी अमेरिका-इराण युद्धाची नेमकी कारणे कोणती,...
Skip to content