Homeमाय व्हॉईसमी बोलतोय... गर्जा...

मी बोलतोय… गर्जा महाराष्ट्र माझा!!

दोन दिवसांपूर्वी काही निमित्ताने मुंबईच्या फोर्ट भागात गेलो होतो. जुन्या बाजारातील पुस्तके पाहताना वेळ कसा गेला ते समजलेच नाही. नंतर आणखी काही खरेदी झाल्यानंतर हुतात्मा चौकाच्या परिसरात आलो. रात्रीचे दहा-साडेदहा वाजले असतील. सकाळ-दुपारच्या तुलनेत तेथे काहीच वर्दळ नव्हती. शांततेने हुतात्मा स्मारक पाहत होतो. दोन दिवसानंतर ‘महाराष्ट्र दिन’ होता. म्हणून नकळत जरा गंभीर झालो. या मंडळींनी बलिदान दिले नसते तर आजचा महाराष्ट्र निर्माणच झाला नसता असे मनोमन वाटत असतानाच एक धीरगंभीर आवाज आला. मी आसपास पाहिले. कोणीच नव्हते. परत आवाज आला- ‘घाबरु नकोस. मीच आहे. माझ्याशी आजकाल कोणी बोलतच नाही आणि मलाही बोलू देत नाहीत. माझं काहीही न ऐकता माझ्यावर राज्य करण्याचे स्वप्न पाहतात वेडे कुठले…’

मला काय हवंय, काय नकोय याचा विचार न करता गेली २०/२५ वर्षे विकासाच्या नावाखाली अत्याचार होत आहे हे कुणी पाहतच नाही. त्याबाबत विचारही करत नाहीत. गेली २०/२५ वर्षे मी उघड्या डोळ्यांनी माझी कशी तुकड्या-तुकड्यांनी हानी होत आहे हे कळत असूनही बहुमताच्या कुऱ्हाडीने माझ्यावर घाव घातले जात आहेत. राज्याचा विकास मलाही हवा आहे माझ्या गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना चांगली घरे मिळणार असतील तर विरोध कोण करेल आणि कशासाठी? परंतु त्यांनाही अजून घरे मिळालेली नाहीत. ही मंडळी आपली वणवण फिरून आपली गाऱ्हाणी सर्वांना सांगत असतात आणि सबंधित अधिकारी, मंत्री नंदीबैलासारखी मान डोलवून ‘आम्हीच तुमची कामे करणार’ अशी पोकळ आश्वासने देतात.

सर्वांना एकाचवेळी चांगले दिवस येणार नाहीत हे मलाही माहीत आहे. पण त्या चांगल्या दिवसांची दूरवरून तरी सामान्यांची खात्री पटायला हवी ना? मुख्यमंत्री कुठल्याही राजकीय पक्षाचा असो… तो एकामागून एक अशा प्रकल्पांची घोषणा करतो. प्रकल्पाचा नारळही वाढवला जातो. परंतु नंतर मात्र प्रकल्प इतका रखडतो की पुन्हा सर्व नव्याने सुरुवात करावी लागते. असे अनेक प्रकल्प आहेत त्यांची नावे सांगून मी येथील जागेचा अपव्यय करू इच्छित नाही. कवी केशवकुमार उर्फ आचार्य अत्रे यांच्या ‘हातात घ्या काळे निशाण’ या कवितेतील एकच ओळ बदलून म्हणावेसे वाटते-

“आता मराठ्यांनो, उठा,

आहे तुम्हा ना स्वाभिमान!

जेथे मंत्री जेथे नेते

तेथें आता काळे निशाण!”

अत्रे यांनी लिहिलेली तत्कालिन मत्र्यांची नावे वगळली आहेत. बाकी परिस्थिती तशीच आहे.

प्रकल्पांचे सोडा, साध्या मराठी भाषेबद्दल राज्याच्या निर्मितीच्या वेळी पहिले मुख्यमंत्री यशवंतरावं चव्हाण म्हणाले होते, “राज्यकारभार इंग्रजीच्या ऐवजीं आता मराठीत चालविणे कसे इष्ट व निकडीचे आहे याची सरकारला पूर्ण जाणीव आहे. हा बदल कारभारातील कार्यक्षमतेस बाधा न येऊ देता करायचा आहे.” ६१ वर्षांपूर्वी केलेले हे भाषण आजही लागू आहे. आजही मंत्रालयात मराठी उपयोगात आणण्याबाबत केवळ चर्चाच होत आहे. शिवाय २५/३५ वर्षे सरकारात काम करूनही अनेक सनदी अधिकाऱ्यांना मराठीचा गंध नसतो. हे सुधारण्यासाठी कोणीच प्रयत्न करत नाही. हे खरोखरीच लाजिरवाणे आहे. सरकारी बैठकांमध्ये जोपर्यंत मराठीचा वापर मुक्तपणे केला जात नाही तोपर्यंत तुम्हाला मराठी भाषा दिन साजरा करावाच लागेल.

राज्य कारभाराबाबत यशवंतराव म्हणतात, “राज्य कारभार चांगला चालला आहे की नाही याची खरी कसोटी वरच्या अधिकऱ्याने तुमच्या कॉन्फिडेनशियल शीटवर काय लिहिले आहे ही नाही किंवा बदली झाल्यावर लोकांनी सत्कार करुन हार घातले, हीही नाही. माझ्यामते लोकांचे समाधान हीच चांगल्या राज्य कारभाराची खरी कसोटी आहे.” अधिकारी तसेच अन्य सरकारी कर्मचारी-कामगारांनी अंतःर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आलेली आहे. चांगला कारभार सोडा, सरकारी कर्मचाऱ्यांच्या टेबलावरील कागदच हलत नाहीत, ही आजची परिस्थिती आहे. याचे दुःख मी कुणाला सांगू? बरे झाले तू तरी त्या स्मारकाला वंदन करण्यासाठी वेळ काढून आलास. भला वाटलास म्हणून दोन शब्द बोलून माझी व्यथा तुला सांगतोय. बरंच काही साठून राहीलं आहे. तू बराच वेळ येथे फेऱ्या मारत आहेस म्हणून मला बोलावेसे वाटले.

खरे तर राज्याच्या अनेक खात्यांबंत बोलता येईल. वेळ पुरणार नाही तुला आणि मलाही… पण पोलीस आणि महापालिकांबाबत थोडे बोललेच पाहिजे. सर्वसाधारणपणे आपले पोलीस खाते चांगलेच आहे. परंतू राजकीय व्यक्तींच्या हसक्षेपामुळे त्यांचा कारभार पार रसातळाला गेलेला आहे. पोलीसठाण्यात तक्रारींचे निवारण होत नाही. तक्रारकर्त्यालाच विविध प्रश्न विचारून हैराण केले जाते की, जेणे करुन तो तक्रारच करणार नाही. तसेच दैंनदिन जीवनात प्रत्येक मोठ्या शहरांत नागरिकांना प्रचंड मोठया वाहतूककोंडीला रोज सामोरे जावे लागत आहे. चौकात वाहतूक हवालदार वा अधिकारी दिसतातही. परंतु गलोगल्ली वाहतूककोंडी होत असते हे वाहतूक विभागाने ध्यानात घ्यायला हवे.

महापालिका कारभाराबाबत बोलत बसलो तर सहा महिने पुरणार नाहीत. पाणीपुरवठा, कचरा साफ करुन शहर स्वच्छ ठेवणे त्यांचे प्रमुख काम असते. राज्यातील प्रमूख नेत्यांच्या गल्ल्याच चकाचक केलेल्या दिसतात. झोपडीच्या आसपासचा कचरा नियमितपणे उचललाच जात नाही. रस्त्यांबाबतची कटकट तर कधीच न संपणारी आहे. रस्त्याच्या कंत्राटाबाबत तर कुठल्या ना कुठल्या वर्तमानपत्रात भांडाफोड केलेला असतो. सर्वच महापालिका आयुक्तांनी आपला वचक सोडलेला आहे. आयुक्तांनी शिस्त लावलीच पाहिजे. या शिस्तीत राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करूच नये. कुणावर अन्याय झाला असेल तर त्याची योग्य दखल घेणारी यंत्रणा असताना पीडित कर्मचाऱ्यांनीही उठसूठ राजकीय नेत्यांकडे जाणे सोडून दिले पाहिजे.

पाणीपुरवठ्याबाबत एक धोरण ठरवण्याची वेळ आलेली आहे. तसे ते धोरण आहे ही… पण ते माझ्याच मंत्रालयातील कुठल्यातरी कपाटात धूळ खात बसलेले असेल. ते धोरण जर कालसुसंगत नसेल तर त्यात सुधारणा करायला हवी. छत्रपती संभाजी नगरसारख्या प्रमुख शहरात जर आठवड्यातून एक-दोन दिवसच पाणी येत असेल तर गोष्ट मला भूषणावह कशी असेल? अनेक गावात ही पाण्याची गंभीर परिस्थिती आहे. टँकरने पाणीपुरवठा होतो असे सांगण्यात येते. मात्र काही ठिकाणीच टँकर जातात असे मला दिसते. पण मी काहीही करू शकत नाही. आरोग्ययंत्रणाही सुधारली पाहिजे. आपल्या सरकारी रुग्णालयात चांगले काम चालते. काही अपवाद असतीलही!

राज्यासमोर अनेक गंभीर समस्या आहेत. आज माझा वाढदिवस आहे. आज आनंदाचा दिवस आहे. गंभीर समस्यांबाबत मी इतकेच म्हणेन की, राज्यकर्ता कुणीही असो. सर्वसंमतीने राज्यशकट हाकणे हे राज्यप्रमुखाचे काम आहे. समस्या येतील आणि जातीलही. परंतु त्या सर्वसंमतीने सोडवल्या तर कटुता राहत नाही, असा इतिहास आहे. अरे वेड्यासारखे सर्वच काय ऐकत बसलास? किती उशीर झाला. राजकीय नेते यायची वेळ झाली. माझा घसाही सुकला. पुन्हा कधीतरी असा निवांत ये. हल्ली कुणी येत नाही रे… कुणाशी बोलले की जरा बरे वाटते. मी काहीसा सावरून बसलो आणि धाडस करुन विचारले… पण, आपण कोण? अरे वेड्या.. मी तुझे राज्यच बोलतोय. मी महाराष्ट्र बोलतोय… गर्जा महाराष्ट्र माझा!!

Continue reading

येथे प्रत्येक छायाचित्र बोलते…

"For me the subject of the picture is always important than the picture" हा सुविचार दिवंगत छायाचित्रकार रजनीश काकडे यांनी काढलेल्या छायाचित्र प्रदर्शनात प्रकर्षाने जाणवत होता. रजनीशला आदरांजली वाहण्यासाठी मुंबई प्रेस क्लबने त्याच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या...

‘एशियाटीक’ची निवडणूक जूनमध्ये तरी होणार? दोन्ही बाजूंच्या सदस्यांत घुसखोर!

मुंबईतल्या एशियाटीक लायब्ररी, या प्रतिष्ठित संस्थेची निवडणूक 'घुसखोर' सदस्यांशिवाय जून महिन्यात घेण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला असला तरी ती जूनमध्येच होईल की नाही, याबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत. कारण नव्याने निवडल्या जाणाऱ्या कार्यकारिणीची मुदत केवळ सप्टेंबर...

ठाणे पालिकेच्या बेसमेंटमध्ये आहे ५० घमेली धूळ!

ठाणे शहरात संपूर्ण लोकमान्य नगर अगदी जुन्या बस डेपोपासून तो नव्या बस डेपोपर्यंत फेरफटका मारला असता रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग केलेल्या दुचाक्या व रिक्षा यांना चकवत नागरिक कसे चालत असतील याचा विचारच न केलेला बरा. लोकमान्य नगरात तर एका ठिकाणी...
Skip to content