Homeमाय व्हॉईसअहो, पिंपळे मॅडम.....

अहो, पिंपळे मॅडम.. ज्यांची सत्ता.. त्यांचेच मंगळसूत्र फेरीवाल्यांच्या गळ्यात!

ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या कासारवडवली भागात अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यासाठी गेल्या असता त्यांच्यावर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचा फेरीवाल्यांच्या संघटनेने वा त्यांच्या कोणाही ‘मुखन्ड’ नेत्याने अजून साधा निषेधही केल्याचे वाचनात आलेले नाही. याचा सरळ अर्थ त्यांचा या जीवघेण्या हल्ल्याला मूक पाठिंबा होता, असा घ्यायचा का?

ठाणे महापालिकेतील सर्वच राजकीय पक्षांनी या हल्ल्याचा एकमुखाने निषेध केला असला तरी त्याला राजकारणाची किनार आहेच. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन सहाय्यक आयुक्तांची विचारपूस केल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच त्यांनी तो यादव बाहेर आला की पाहून घेऊ, असे जाहीर केल्याने आगीत तेल तर पडणार नाही ना अशी उगाच शंका निर्माण झाली आहे.  ठाण्याचे पालकमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही पिंपळे यांची भेट घेतल्यानंतर हल्लेखोरावर कडक कारवाई करण्याची ग्वाही दिल्याने पालिका कर्मचारी अधिकाऱ्यांना हायसे वाटले आहे.

मात्र या सर्व प्रकरणात कासारवडवली पोलीस ठाण्याची कारवाई काहीशी ढिली वाटत आहे. खरेतर ठाणे पोलिसांनी हे प्रकरण मुळीच गांभीर्याने घेतलेले दिसत नसल्याचे खेदाने नमूद करावे लागत आहे. गुन्हा घडला तो परिसर कासारवडवली पोलीसठाण्याच्या हद्दीत येतो. त्या परिसरात फेरफटका मारला असता फूटपाथ जेमतेम दीड-दोन फुटाचे दिसून आले. म्हणजे तेथील सर्व फेरीवाले आपला सर्व व्यवसाय रस्त्यावरच करत होते. फेरीवाले रस्त्यावर बसलेले वा व्यवसाय करत असताना दिसले तर पोलीसठाण्याने थेट कारवाई करावी असे नियम सांगतात. रस्ता मोकळा करून देणे हे पोलिसांचेच काम आहे. परंतु कासारवडवली ठाण्याने ते आजपर्यंत कधीच केले नसल्याचे त्या परिसरातील नागरिकांनी मला सांगितले.

महापालिकेची कारवाई होणार असल्याची कुणकुण लागली की हे सर्व फेरीवाले नजीकच्या निवासी संकुलामध्ये आपला माल हलवत असतात. यावेळी मात्र कुणकुण न लागल्याने फेरीवाले गडबडले होते आणि या गडबडीतच संताप अनावर झाल्याने यादवने कोयताच बाहेर काढून पिंपळे यांच्यावर हल्ला केला. नशीब म्हणूनच बोटावर निभावले. घाव वर्मी बसला असता तर..!

पिंपळे

कासारवडवलीच काय पण कालपासून ठाण्यातील समस्त पदपथांनी कधी नव्हे तो मोकळा श्वास घेतला आहे. मोकळे पदपथ हे काहीच दिवसांचे नाटक असल्याचे ठाणेकर नागरिकांचे म्हणणे आहे. त्यात तथ्य नाही असे कोण म्हणेल? फेरीवाले – महापालिका – सर्वपक्षीय राजकीय नेते आणि पोलीस खाते यांची भक्कम साखळी तयार झाल्यानेच फेरीवाले मस्तवाल झाले आहेत. त्यांच्यात अनेक गट असले तरी धंदा करणे हे सर्वांचे एकच ध्येय आहे. शिवाय मतदार बँक आहे. ही बँक एकनिष्ठ कधीच नसते. पालिकेत ज्याची सत्ता त्याचे मंगळसूत्र ते गळ्यात मिरवते.

फेरीवाले गरीब असतात असा समज एकेकाळी होता. परंतु हल्ली कुटुंबेच्या कुटुंबे फेरीवाल्याचा धंदा करतात. त्यामुळे अनेकजण लखपती झालेले आहेत. त्यातील काही वाटा राजकीय नेते, पोलीस आणि पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना देण्यात त्यांना काहीच अडचण भासत नाही. कारण घाऊक बाजारात कमी किंमतीने माल घ्यायचा आणि चढ्या भावाने तो शहरवासियांना विकायचा हे त्यांचे ठरलेलेच असते.

ठाणे पोलिसांनी 353, 307, 333 आदी कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे. आता खरी लढाई न्यायालयात होणार आहे. पोलीस वा सरकारी वकील किती हुशारीने आणि तडफेने हा खटला लढवतो हे पाहणे मजेशीर ठरणार आहे. खरे तर पोलीस किती तगडे आरोपपत्र दाखल करतात यावर सर्व भिस्त आहे. आरोपपत्र मिळमिळीत असेल तर यादवला जामीन हसत हसत मिळेल. परंतु असे झाले तर पोलीस समाजाचा विश्वास गमावून बसतील.

जसे प्रशासनावर आपण सर्व टीका करतो, तसेच जनतेनेही फेरीवाल्यांवर बहिष्कार घालून आपले कर्तव्य बजावले पाहिजे. महापालिकेनेही एका घरातील एकालाच फेरीचा परवाना द्यावा. रेल्वेस्थानक परिसरात तर नागरिकांना चालायला रस्ता शोधावा लागतो. ही स्थिती बदलायला हवी. फेरीवाल्यांच्या संघटनांनीही आता शहाणे व्हायची गरज आहे. महापालिकेची कारवाई अशीच चालू राहवी व जनतेचा दुवा घ्यावा अशी समस्त ठाणेकरांची इच्छा आहे. बघुया.. कधीपर्यंत ती पूर्णत्वास जाते?

Continue reading

माध्यमांना ठाकरेंच्या शिवसेनेचे का बरे वावडे?

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आज दाकल झाले. या प्रक्रियेत गेल्या चार दिवसांपासून विविध मराठी वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत एक सवाल विचारला गेला- उबाठाचे प्रवक्ते पत्रकारांना वा वृत्तवाहिन्यांना उपलब्ध का नसतात? त्याबाबत निरीक्षणातून हाती आलेली...

‘केइएम’मध्ये मदत कक्षालाच हवी मदत! तपासायला डॉक्टर मिळाला तर उत्तमच!!

मुंबई महापालिकेच्या प्रमुख समजल्या जाणाऱ्या केइएम रुग्णालयात डॉक्टरांसहित कर्मचारी-कामगारांमध्ये सुमारे २० टक्के इतकी मोठी कपात करण्यात आली असून मोडकळीस आलेले स्ट्रेचर्स वगैरे सामान गोदमात ढकलून देण्यासाठीही कामगार नसल्याची संतापजनक माहिती हाती आली आहे. अपघात विभागातील डॉक्टरांची संख्या तर एक-दोन...

मुंबई बॉम्बस्फोटांचे मास्टरमाईंड अंमली पदार्थांच्या फॅक्टरीमागे?

मुंबईच्या आग्रीपाडा पोलीसठाण्याच्या समोरच्या बाजूसच असलेल्या घास गल्लीतील अमली पदार्थांचा कारखाना नार्कोटिक्स विभागाने उद्ध्वस्त केल्यानंतर गेले सुमारे पाच-सहा दिवस दक्षिणमध्य मुंबईतील अनेक भागांना भेटी दिल्यानंतर एक गोष्ट हळूहळू स्पष्ट होत आहे की, या अमली पदार्थांच्या व्यापार व कारखान्यांमागे मुंबईत...
Skip to content