Homeपब्लिक फिगरनाना पटोलेंच्या जागी...

नाना पटोलेंच्या जागी हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारत त्यांच्याजागी हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे आमदार विजय वडेट्टीवार यांची विधिमंडळ काँग्रेसचे गटनेते म्हणूनही नियुक्ती केली आहे.

हर्षवर्धन सपकाळ युवावस्थेपासूनच गाडगे महाराज, तुकडोजी महाराज व गांधीवादी – सर्वोदयी कार्यकर्ता म्हणून परिचित आहेत.  काँग्रेससंलग्नित राजीव गांधी पंचायत राज संघटनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना म्हणजेच एनएसयुआयच्या माध्यमातून राजकीय जीवनात सक्रीय झाले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे ते उपाध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून बी.कॉम. व बी. पी.एड पदवी धारण केली आहे. ते शेतकरी कुटूंबातून आलेले असून सामाजिक कार्य व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. ग्राम स्वराज्याच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्रात सुरू केलेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत त्यांनी विशेष योगदान दिले आहे. ग्रामस्वच्छता तथा आदर्श ग्राम निर्माण या क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. युवकांसाठी युवक शिबिराच्या नियमित सातत्याने आयोजन, ही त्यांची वैचारिक प्रतिबद्धता दर्शविते. शेती स्वावलंबनासाठी तसेच टंचाईमुक्तीसाठी  त्यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघात केलेल्या जलवर्धन प्रकल्पाच्या माध्यमातून जलव्यवस्थापन तथा जलसंधारण क्षेत्रात त्यांनी विशेष उल्लेखनीय कार्य केले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी तथा आदिवासी गावांचे सक्षमीकरण करण्यासाठी ते गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने प्रयत्नशील आहेत. 1999 से 2002 या कालावधीत महाराष्ट्रातील सर्वात तरूण जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या कार्यकाळात बुलढाणा जिल्हा परिषद महाराष्ट्रात अव्वल होती, हे येथे विशेष उल्लेखनीय. २०१४ ते २०१९ या कालावधीत ते बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. यापूर्वी राष्ट्रीय सचिव, अ.भा.काँ.कमेटी नवी दिल्ली व राष्ट्रीय उपाध्यक्ष, राजीव गांधी पंचायत राज संगठन ही जबाबदारीसुद्धा त्यांनी पार पाडली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीवर्षाच्या निमित्ताने त्यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघात संविधान चेतना यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गाव-वस्ती-वाडीपर्यंत संविधान जागृतीसाठी कार्य केले आहे.

काँग्रेसचे सचिव म्हणून पंजाबचे सहप्रभारी म्हणूनसुद्धा त्यांनी काम केले आहे. तत्पूर्वी गुजरात व मध्य प्रदेश या राज्यांचे सहप्रभारी म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे. अ. भा. काँ. कमिटीद्वारा सेवाग्राम-वर्धा येथील गांधी आश्रमात आयोजित देशव्यापी गांधी विचार दर्शन शिबिराचे राष्ट्रीय शिबिर समन्वयक म्हणून पक्षाने सोपविलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीतारित्या पार पाडली आहे. यासोबतच विविध राज्यातील विधानसभा निवडणुकीत उमेदवार निवडीसाठी पक्षाने स्थापित केलेल्या स्क्रिनिंग कमिटीचेही ते सदस्य राहिले आहेत. एकविसाव्या शतकातील वैश्विक मित्रता अभियानांतर्गत जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशनच्यावतीने 1996मध्ये जपानमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय युवा परिषदेसाठी त्यांनी 20 भारतीय युवक प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्त्व केले आहे.

Continue reading

काँग्रेसची मंत्रालयासमोरची जागा परस्पर आरबीआयच्या घशात!

काँग्रेससह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचजागी काँग्रेससह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते. पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात...

लाभ घ्या आयुष्मान भारत आणि म. फुले जनआरोग्य योजनेचा

महाराष्ट्रात ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना’ एकत्रित राबविण्यात येत असून राज्यातल्या सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सर्व लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड राज्यातल्या आशा कर्मचारी, आपले सरकार सेवा केंद्रातील कर्मचारी तसेच स्वस्त धान्य दुकानचालक यांच्यामार्फत तयार केले...

एमआयजी क्रिकेट क्लबची राज्य मानांकन कॅरम स्पर्धा

मुंबईतल्या एमआयजी क्रिकेट क्लबच्या वतीने तिसरी महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धा येत्या 27 ते 29 सप्टेंबर 2025दरम्यान एमआयजी क्रिकेट क्लब, कलानगर वांद्रे (पाश्चिम), मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन विभागात खेळविण्यात येणाऱ्या या...
Skip to content