Homeमाय व्हॉईसठाण्यातल्या राममारुती रोडवरचे...

ठाण्यातल्या राममारुती रोडवरचे पदपथ आणि ‘१२० फूट शिल्पी’!

“नसत्याची आग| असत्याला लागे| असा जन्म जागे|

अशांतीत| अचूक ते येई बोलता बिचूक| लिव्हा घरी डुका

जाणत्याचा| जाणत्याचा डोळा| पापण्यांच्या भिंती| पापाचीच गिनती

…. मंत्र आहे पाठ| फक्त ताटी ताठ| नकाराची|”

विंदांची ही कविता आठवण्याचे कारण ठाणे शहरातील राम मारुती रोड परिसर!

तसा मी अजून ठाण्यात नवीनच असल्याने आणि थोडे निर्बंध सैल झाल्याने (कोरोनाचे) जमेल तितके पायी चालतो व शहर जाणण्याचा प्रयत्न करतोय. मागे एकदा लिहिल्याप्रमाणे शरीर जमेल तितके ताठ ठेवून एका सरळ रेषेत चालणे ठाण्यात तसे अवघडच आहे. राममारुती रोड, गोखले रोड आणि रेल्वेस्थानक परिसर शरीराला वेडीवाकडी वळणे देतच फिरावा लागतो. कधी रोरावणारी टीएमटी बस अंगावर चालून येईल आणि डोळे मिचकावत ड्रायव्हरदादा म्हणेल ‘काका जरा सबुरीनं..’. त्यातून सावरतोय तोच रिक्षावाला प्यां प्यां करतोय. महाभारतकालीन चक्रव्यूह भेदणे एक वेळ सोपे असेल, परंतु नेहमीच गर्दीच्या या परिसरातून गर्दीला भेदणे मात्र मुश्किलच आहे. सणावारी वा सुट्टीच्या दिवशी तर माणसांचा पूरच असतो. तरी बरे हल्ली कोरोनाच्या भीतीने अनेक ठाणेकर बाहेरच पडत नाहीत.

… तर, आपण राममारुती रोडवर होतो. आधीच जुन्या ठाण्यातील अरुंद गल्ल्या नको इतक्या वळणदार आहेत. इतके ‘वळणे’ महापालिकेतील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना लागली असती तर ठाणे शहराचे नक्कीच भले झाले असते. “roads get wider and busier and less friendly pedestrians and all of the development base around cars, like big sprawling shopping malls. Everything seems to be change to designed for the benefit of automobile and not benefit of the human beings” याच तत्त्वाने शहरातील मोटारगाड्यांची संख्या सतत वाढतीच आहे. रिक्षांची संख्या तर बेसुमार वाढली आहे. सुमारे 30 रिक्षांना धंदाच मिळत नाही, हे वास्तव आहे तरीही परिवहन खाते, लोकप्रतिनिधी आणि रिक्षा संघटनांचे नेते आपले डोळे उघडत नाहीत, हे जनतेचे दुर्दैव आहे.

थोडे विषयांतर झाले. परंतु ते गरजेचे होते. टीएमटी, रिक्षा तसेच मोटार गाड्यांचा या परिसराला त्रास होतच आहे. त्यात भर म्हणून व्यापारी मंडळीही यात सामील झाल्याचे सुमारे दोन-तीन तासांच्या भटकंतीत दिसून आले. व्यापारी मंडळींना राग येईल. परंतु राममारुती रोड आणि गोखले रोडवरील अनेक पदपथ व्यापारी मंडळींनी चोरले आहेत. आणि या चोरीत लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी सामील आहेत असे खेदाने म्हणावे लागत आहे. सोबतच्या छायाचित्रात पदपथ कसा चोरला आहे हे स्पष्ट दिसत आहे. दुसरी संतापजनक गोष्ट म्हणजे गोखले रोडकडे जात असतानाही प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे पदपथाची रुंदी. पुढेपुढे आकुंचन पावताना स्पष्ट दिसते. काही महाभागांनी तर पदपथ दुकानाचा भाग करून आपल्या स्कूटर्स वा बाईक्सना तेथे विराजमान केलेले दिसले. एका होमिओपॅथी डॉक्टरच्या दवाखान्याबाहेर पदपथानजीक रोजच एक गाडी पार्क करून ठेवण्यात येते की, पदपथ सोडून पादचाऱ्याला रस्त्यावर यावेच लागते.

या राममरुती रोडबाबत एक मजेशीर किस्सा या भेटीत एका ज्येष्ठ नागरिकाने ऐकवला तो भन्नाटच होता. ७२-७३चा काळ होता. तेव्हा ठाणे शहरात नगरपालिका होती. पालिकेचे मुख्य अधिकारी कोणी सूर्यवंशी म्हणून होते. त्यांच्या डोक्यात प्रथम राममारुती रोड रुंद करण्याची कल्पना सुचली. त्यानुसार त्यांनी तत्कालीन वास्तू विशारद (हल्लीचे वास्तूवाले नव्हेत) शिल्पी यांची मदत घ्यायची ठरविले. शिल्पी यांनीही ते काम आनंदाने घेतले आणि राममारुती रोड थोडाथोडका नाही तर त्यावेळी १२० फूट रुंद करण्याची योजना दिली. तेव्हा हे थोडेच मान्य होणारे होते. शिल्पी यांच्या या रुंदीकरणाच्या ‘मारुती’ उडीमुळे ते विनोदाचा विषय झाले. पुढे जेव्हाकेव्हा रुंदीकरणाचा विषय निघत असे तेव्हा त्याची संभावना ‘१२० फूट शिल्पी’ अशी केली जात असे.

अशा तऱ्हेने तेव्हापासून राममारुती रोडचे रुंदीकरण जे खोल पुरले गेले आहे त्याला कोणी वर आणण्याचा प्रयत्नच करत नाही. लोकप्रतिनिधी तर खासगीतही या विषयावर बोलण्यास तयार नसतात. लोकप्रतिनिधींनी रुंदीकरणामधील ‘रु’ जरी उच्चारला तरी धनदांडगे आपल्यालाही पुरून टाकतील अशी भीतीच निर्माण करून ठेवल्याचे जाणवले. राममारुती रोडचे रुंदीकरण जेव्हा व्हायचे तेव्हा होवो. परंतु, त्या परिसरातील पदपथ चोरीबाबत नौपाडा पोलीसठाण्यात किमान एफआयआरतरी नोंदवला जावा हीच अपेक्षा!

Continue reading

येथे प्रत्येक छायाचित्र बोलते…

"For me the subject of the picture is always important than the picture" हा सुविचार दिवंगत छायाचित्रकार रजनीश काकडे यांनी काढलेल्या छायाचित्र प्रदर्शनात प्रकर्षाने जाणवत होता. रजनीशला आदरांजली वाहण्यासाठी मुंबई प्रेस क्लबने त्याच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या...

‘एशियाटीक’ची निवडणूक जूनमध्ये तरी होणार? दोन्ही बाजूंच्या सदस्यांत घुसखोर!

मुंबईतल्या एशियाटीक लायब्ररी, या प्रतिष्ठित संस्थेची निवडणूक 'घुसखोर' सदस्यांशिवाय जून महिन्यात घेण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला असला तरी ती जूनमध्येच होईल की नाही, याबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत. कारण नव्याने निवडल्या जाणाऱ्या कार्यकारिणीची मुदत केवळ सप्टेंबर...

ठाणे पालिकेच्या बेसमेंटमध्ये आहे ५० घमेली धूळ!

ठाणे शहरात संपूर्ण लोकमान्य नगर अगदी जुन्या बस डेपोपासून तो नव्या बस डेपोपर्यंत फेरफटका मारला असता रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग केलेल्या दुचाक्या व रिक्षा यांना चकवत नागरिक कसे चालत असतील याचा विचारच न केलेला बरा. लोकमान्य नगरात तर एका ठिकाणी...
Skip to content