Homeपब्लिक फिगरलोककला, गडकिल्ले राखणारे...

लोककला, गडकिल्ले राखणारे सांस्कृतिक धोरण लवकरच!

महाराष्ट्राची संस्कृती, पर्यटन, कारागिरी, गडकिल्ले यांचे संवर्धन आणि विविध लोककला, नृत्य, संगीत यांना प्रोत्साहन देणारे राज्याचे सांस्कृतिक धोरण तयार होत असून लवकरच या धोरणास राज्य मंत्रिमंडळात मंजुरी मिळेल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

सांस्कृतिक धोरण २०१० पुनर्विलोकन समितीने दिलेल्या अहवालाच्या अनुषंगाने आज मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या धोरण समितीचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उपसचिव नंदा राऊत, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक सुजीतकुमार उगले आदी यावेळी उपस्थित होते.

शासनाचे सांस्कृतिक धोरण खऱ्या अर्थाने बहुआयामी असे असणार आहे. आपल्या संस्कृतीची ओळख त्यातून प्रतिबिंबीत व्हावी, यासाठी हे धोरण तयार करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. धोरण समितीने दिलेला अहवाल आणि त्यातील शिफारशी लक्षात घेऊन शासन व्यापक असे सांस्कृतिक धोरण जाहीर करेल. राज्यातील गड किल्ले, कारागिरी, पुरातत्व, भाषा साहित्य ग्रंथव्यवहार आणि वाचनसंस्कृती, लोककला, भक्ती संस्कृती, संगीत, नृत्य, रंगभूमी, चित्रपट, दृश्यकला अशा विविध बाबींचा विचार या धोरणात असेल. याशिवाय, राज्याच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण बाबींचाही यात समावेश असेल, असे त्यांनी सांगितले.

राज्यात विविध संस्कृती, पेहराव, खाद्य, आभूषण, मौखिक संस्कृती आहे. ती जपली जावी, यादृष्टीने काय करता येईल याचाही विचार केला जाणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

यावेळी सांस्कृतिक धोरण 2010 पुनर्वलोकन समितीचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनीही  या धोरणातील शिफारशींच्या अनुषंगाने माहिती दिली. या धोरणात सर्वसमावेशकतेचा आग्रह धरण्यात आला आहे. या समितीच्या एकूण 18 बैठका झाल्या. तसेच, विविध विषयांच्या अनुषंगाने नेमलेल्या उपसमितीच्या 108 बैठका झाल्या. समितीकडे एकूण 137 व्यक्ती आणि 43 संस्था-संघटनांनी त्यांची निवेदने सादर केल्याचे त्यांनी सांगितले.

सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव खारगे यांनी, या धोरणाचा मसुदा मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल. त्यापूर्वी या धोरणातील शिफारशींच्या अनुषंगाने इतर शासकीय विभागांशी निगडीत बाबींसंदर्भात त्यांची मते जाणून घेण्यात येतील, असे सांगितले.

Continue reading

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...

मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

मुंबईतल्या आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे एमएससी बँक पुरस्कृत मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत शेठ करमशी कानजी इंग्लिश स्कूलचा केवल कुळकर्णी विजेता ठरला. अटीतटीच्या अंतिम आठव्या फेरीत डावाच्या मध्यापर्यंत १०-० अशी आघाडी घेणाऱ्या उमैर पठाणला...
Skip to content