ठाणे शहरातील मुख्य व सेवा रस्त्यांबाबत नागरिकांच्या नेहमीच तक्रारी असतात. रस्त्यावरील खड्डे व उड्डाणं पुलांवरील टेंगुळे तसेच सांध्यावर बसणाऱ्या जर्कमुळे समस्त ठाणेकर हैराण झालेले आहेत. उज्वल उद्यासाठी मेट्रो येणार आहे. त्याचे स्वागतच आहे. पण मेट्रोच्या कामामुळे रस्त्याच्या आजूबाजूला पडलेले खड्डे महिनोमहीने तसेच ठेवल्याने हजारो ज्येष्ठ नागरिकांना मणकादुखीचे आजार बळावत असल्याचे अनेकांनी सांगितले.
छायाचित्रात दिसणारे खड्डे हे घोडबंदर रोडवरील आर मॉलच्या सेवा रस्त्यावरील आहेत. तेथे मेट्रोचे काम सुरु आहे हे मान्य आहे. पण हे काम गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. म्हणून काय नागरिकांनी मेट्रोचे काम पूर्ण होईपर्यन्त या खड्ड्यातूनच जायचे? याबद्दल ठाणे महापालिका व विकास प्राधिकरणाने एकदा खुलासा केलेला बरा! म्हणजे मग दररोज खड्ड्याबाबत कोणी तक्रार करणार नाही.
तसाही नागरिकांना बरेच आवंढे गिळण्याची सवय आहेच. त्यात आणखी एकाची भर पडली हे पाहून बापुडे नागरिक गप्प तरी बसतील. नगरविकास खात्याचे सचिव, प्राधिकरणाचे सर्वेसर्वा आणि ठाणे महापालिकेच्या आयुक्तांनी संयुक्तपणे ठाण्यातील रस्त्यांची पाहणी करावी व संबंधित अभियंत्यांना कामाला लावावे अशी जनतेची मागणी आहे.