Homeन्यूज अँड व्ह्यूजआयाराम 'सम्राट' झाले...

आयाराम ‘सम्राट’ झाले बिहारचे मुख्यमंत्री!

दोन दशकाहून अधिक काळ बिहारचे मुख्यमंत्री राहिलेल्या नितीश कुमार यांनी भाजपाच्या रेट्यापुढे विनम्र होऊन राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच भाजपाचे नेते सम्राट चौधरी यांनी बिहारचे २४वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यात नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड आणि भाजपा यांचे युती सरकार आहे. नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील असे जाहीर करून भाजपाने विधानसभा निवडणूक लढवली होती. राज्य विधानसभेत सर्वाधिक आमदार असलेला भाजपा हा नंबर १ पक्ष आहे. पण चार महिन्यांतच नितीश कुमार यांना राष्ट्रीय पातळीवर जाण्याची सूचना मित्र पक्षाकडून आली आणि नितीश कुमार यांना ती मान्य करावी लागली. बिहारमध्ये आता सम्राटपर्वाची सुरूवात झाली आहे.

२०१४मध्ये देशात मोदीपर्व सुरू झाल्यापासून दिड डझन राज्यात भाजपाने स्वबळावर किंवा मित्रपक्षाला बरोबर घेऊन सत्ता स्थापन केली. आजवर बिहारमध्ये भाजपाचा कधी मुख्यमंत्री झाला नव्हता. हिंदीभाषिक प्रदेशात बिहार या मोठ्या राज्यात आपला मुख्यमंत्री नाही, ही भाजपाला सल बोचत होती. पण भाजपाने मोठ्या खुबीने नितीश कुमार यांना पाटण्यातून दिल्लीला नेले व मुख्यमंत्रीपदावर सम्राट चौधरींना बसवले. चौधरी हे काही मूळचे भाजपाचे नाहीत, ते संघ परिवारातील नाहीत, ते संघाचे स्वयंसेवक होते असे कधी कोणी सांगितलेही नाही. लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलात ते निष्ठावान कार्यकर्ते होते. नंतर नितीश कुमार यांच्या जनला दल युनायटेडमध्ये आले. त्यानंतर बिहारचा वेगाने विकास करण्यासाठी ते भाजपामध्ये आले. काही काळ जीतनराम मांझीच्या हिंदुस्थान आवाम पक्षात होते. राजद ते भाजपा, हिंआप – जनता दल मार्गे हा त्यांचा चार पक्षातील राजकीय प्रवास एखाद्या कथा-कांदबरीसारखा आहे.

आठ वर्षांपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर कधी मागे वळून बघितले नाही. आपल्याला मुख्यमंत्रीपदाच्या सिंहासनावर भाजपाच नेऊ शकतो, हा त्यांना विश्वास होता. बिहारमधील ज्येष्ठ समाजवादी नेते शकुनी चौधरी यांचे सम्राट हे पुत्र. आपल्या राजकीय प्रवासाची सुरूवात त्यांनी लालू यादव यांच्या राजदपासून केली. सम्राट चौधरी भाजपामध्ये आल्यापासून पक्षाने सतत त्यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी देणे सुरू केले. भाजपामध्ये प्रवेश केल्यापासून त्यांच्या राजकीय करिअरचा आलेख सतत उंचावतच राहिला. वडिल शकुनी चौधरींबरोबर ते अनेक वर्षे  राजदमध्ये राहिले. नंतर नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडमध्ये गेले. तिथे फारसे मन रमले नाही म्हणून ते जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्थान आवाम मोर्चात गेले. सन २०१८ मध्ये ते भाजपात आले. भाजपाचे दिवंगत उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनीच सम्राट यांना भाजपात आ‌‌‌णले. त्यावेळी बिहारचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय होते. नित्यानंद यांच्या टीममधे सम्राट यांच्यावर प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली. सन २०२०मध्ये राज्यात एनडीएचे सरकार स्थापन झाले तेव्हा सम्राट चौधरी यांचा पंचायतराज राज्यमंत्री म्हणून सरकारमध्ये समावेश झाला. २०२१मध्ये एनडीएमध्ये फूट पडली, तेव्हा सम्राट यांच्यावर विधान परिषदेतील विरोध पक्षनेता म्हणून जबाबदारी सोपवली. विरोधी पक्षनेता म्हणून सम्राट यांनी प्रभावी कामगिरी केली. भाजपाने मार्च २०२३मध्ये त्यांच्यावर बिहार प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. सम्राट यांना चार राजकीय पक्षांचा दांडगा अनुभव. त्यांनी भाजपाचा राज्यात वेगाने विस्तार केला. राजद आणि महाआघाडीवर ते सतत घणाघाती हल्ले करीत. सुशील मोदी यांच्या निधनानंतर भाजपामध्ये राज्यात नेतृत्त्वाची पोकळी निर्माण झाली होती, ती सम्राट यांनी भरून काढली. २०२४मध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यात एनडीएचे सरकार स्थापन झाले, तेव्हा उपमुख्यमंत्रीपद व सरकारमधील दोन क्रमांकाचे स्थान सम्राट यांना देण्यात आले. लोकसभा निवडणूक काळात तेच प्रदेशाध्यक्ष होते. बिहारमधून भाजपाचे बारा खासदार निवडून आले.

सम्राट

नोव्हेंबर २०२५मध्ये झालेली विधानसभा निवडणूक पक्षाने सम्राट चौधरींच्या नेतृत्त्वाखाली लढवली. मतदारांना आकर्षित करणाऱ्या घोषणा सम्राट यांनीच केल्या. बिहारमधील प्रशासनावरही सम्राट यांनी चांगली पकड निर्माण केली. विधानसभेत भाजपाचे सर्वाधिक म्हणजे ८९ आमदार निवडून आले. तरीही दिलेला शब्द पाळण्यासाठी भाजपाने नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद दिले. मात्र सम्राट यांना उपमुख्यमंत्री करताना त्यांच्याकडे गृह खाते देण्यास भाजपाने नितीश यांना भाग पाडले. एनडीएच्या सरकारमध्ये गृहखाते उपमुख्यमंत्र्याकडे गृह खाते, असे कधी घडले नव्हते. एनडीएचे सरकार असले तरी मुख्यमंत्री, गृहमंत्री व विधानसभा अध्यक्ष ही तीनही पदे भाजपा नेहमीच आपल्याकडे ठेवते. कारण त्या पदांवर सरकारचे भवितव्य अवलंबून असते.

सम्राट चौधरी हे बिहारमधे दबंग नेते म्हणून ओळखले जातात. साम-दाम-दंड-भेद सर्वांचा वापर करून सत्ता कशी खेचायची यात ते तरबेज आहेत. नितीश कुमार हे महाआघाडीचे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर सम्राट जोरदार प्रहार करीत असत. त्यांना सत्तेवरून हटविण्यासाठी त्यांनी एकदा अयोध्या येथे जाऊन मुंडनही केले होते. ५७ वर्षांच्या सम्राट चौधरींकडे संघटनकौशल्य आहे. भाजपाला बिहारमध्ये कोणी चेहरा नव्हता. तो सम्राटच्या रूपाने मिळाला आहे. ते कोईरा जातीचे (कुशवाह) आहेत. बिहारमध्ये ओबीसीमध्ये हा प्रभावी समाज आहे. १९९०मध्ये लालू प्रसाद यादव यांच्या राजदमध्ये प्रवेश करून त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. त्यांचे वडिल शकुनी, हे मुंगेर जिल्ह्यातील तारापूर मतदारसंघातून सहा वेळा काँग्रेस, समता पार्टी किंवा राजदचे आमदार म्हणून निवडून आले होते. १९९९मध्ये सम्राट, आमदार म्हणून निवडून आले तेव्हा राबडी देवी यांच्या सरकारमध्ये कृषीमंत्री म्हणून त्यांचा समावेश झाला. वयाची तेव्हा पंचवीस वर्षे पूर्ण झाली नसताना ते आमदार-मंत्री कसे झाले, असा वाद निर्माण  झाला व त्यातून त्यांचे मंत्रीपद गेले. २०००च्या निवडणुकीत ते पुन्हा आमदार म्हणून निवडून आल्यावर राजद सरकारमध्ये मंत्री झाले. २००५मध्ये राजदचा पराभव झाला. पक्षाने त्यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती केली. सन २०१४मध्ये सम्राट चौधऱी राजदच्या अकरा आमदारांसह बाहेर पडले आणि जीतनराम मांझी यांच्या सरकारमध्ये मंत्री झाले. मांझी यांना हटवून नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा मात्र सम्राट यांना मंत्रीपद गमवावे लागले.

सम्राट हे भाजपाचे पहिले मुख्यमंत्री आहेत आणि राज्यातील भाजपाचा ओबीसींचा शक्तिशाली चेहरा आहे. सन २०२९च्या लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणूनच भाजपाने पक्षातील निष्ठावंताना बाजूला ठेवून चार पक्ष फिरून आलेल्या आयाराम सम्राट चौधरी यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. लालू प्रसाद यादव, राबडी देवी, नितीश कुमार यांचे गेली पस्तीस वर्षे बिहारवर वर्चस्व होते. बिहारमध्ये आपला मुख्यमंत्री देण्याची खेळी भाजपाने यशस्वी करून दाखवली आहे. पाच महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री  अमित शाह तारापूर मतदारसंघात मतदारांना आवाहन करताना म्हणाले होते, सम्राट चौधरी यांना प्रचंड मताधिक्यांने निवडून द्या, लवकरच तो खूप मोठा माणूस होणार आहे…

(लेखक डॉ. सुकृत खांडेकर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

पार्थ पवार अपरिपक्व, अहंकारी की, बेजबाबदार?

अजित पवार यांच्या २८ जानेवारी रोजी विमान अपघातात झालेल्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात येत्या तेवीस एप्रिल रोजी निवडणूक होत आहे. अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार, या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत. अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष...

कित्येकांचे गॉडफादर, नारायण राणेंचे आज अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण

दहा एप्रिल, हा अनेकांचे गॉडफादर राहिलेले नारायण राणे यांचा जन्मदिवस. वयाच्या पंचाहत्तरीत पदार्पण करणाऱ्या या नेत्याचा एक शिवसैनिक, शाखाप्रमुख, बेस्ट समितीचे अध्यक्ष, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता ते केंद्रीयमंत्री असा सारा जीवनप्रवास अदभूत व आश्चर्यकारक आहे. सहा दशकांच्या सार्वजनिक...

बोजड शब्दजंजाळात अडकलेल्या भाजपला तारले राम रथयात्रेने!

सहा एप्रिल १९८०, हा भारतीय जनता पक्षाचा (भाजप) स्थापना दिवस. मुंबईत समता नगरमध्ये या पक्षाची स्थापना झाली. पूर्वाश्रमीचे जनसंघी अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्त्वाखाली नव्या पक्षात एकत्र आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारातून वाढलेल्या कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून...
Skip to content