Homeब्लॅक अँड व्हाईट८ तासांच्या शिफ्टनंतर...

८ तासांच्या शिफ्टनंतर दीपिका पदुकोणला हवा स्वतःसाठी वेळ!

चित्रपटाच्या जगात वावरण्यासाठी आपण दिवसातील किती तास द्यायचे आणि आपल्या घरासाठी/ कुटुंबासाठी किती वेळ द्यायचा याचं गणित मांडता येईल का? स्पर्धात्मक युगात ते शक्य आहे का? अशी वर्गवारी करता आलीच तर बरे होईल असे दीपिका पदुकोण म्हणेल आणि कंगना राणावत तिला सकारात्मक प्रतिसाद देईल. तसा तिने दिलाही. दीपिका पदुकोणने म्हटले, चित्रिकरणासाठीची शिफ्ट आठ तासांची असावी. उर्वरित वेळ त्या कलाकाराला आपल्या व्यक्तिगत आयुष्यासाठी असावा. आपण चोवीस तास सेलिब्रिटीज असावं असं मुळीच नाही.
दीपिकाच्या म्हणण्यावर प्रतिक्रिया उमटणे काही थांबायला तयार नाही. काहींच्या मते, मुंबईतील ट्रॅफिक जॅमची समस्या पाहता, चित्रिकरणस्थळी वेळेत पोहोचणे कठीण आहे. म्हणूनच की काय, अधूनमधून अक्षयकुमार आपल्या अंधेरीतील पश्चिमेकडील प्रशस्त घरातून चक्क मोटारसायकलवर बसून हेम्लेट घालून गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत जा-ये करतो आणि त्याच्या त्या प्रवासाची पेज थ्रीवर फोटोस्टोरी होते. जुहूवरुन मढ आयलंड येथे सेटवर यायचे तर लिंक रोडवरुन जावे लागते, त्यात सिग्नल केवढेतरी, श्रद्धा कपूर हा लांबचा प्रवास टाळून वर्सोवा येथून जेट्टीने जाते तेव्हा तेथेही पाप्पाराझी त्या क्षणाचे चित्रिकरण करत त्याचे सोशल मीडियात रिल पोस्ट करतात. ते काही असो. उद्या अगदी जुहूच्या पवनहंस विमानतळावरुन काशीमीरा असो, पनवेल असो किंवा अलिबाग असो येथे हेलिकॉप्टरमधून चित्रिकरणासाठी ये-जा करणे असो, तुम्ही नियोजित वेळेनुसार चित्रिकरणासाठी ये-जा करता का, ही गोष्ट महत्त्वाची.

दीपिका

आपल्या मनोरंजन क्षेत्रात चित्रिकरणाच्या शिफ्ट असतात. आता त्यानुसार काम करायचे तर चित्रिकरणाची वेळ संपत आली की ‘उरकून घ्या’ असा घोषा लागू शकतो. दिलीपकुमार कायमच दुपारी दोन ते रात्री दहा वाजता अशाच शिफ्टमध्ये काम करत असे. पण समजा, रात्री नऊ वाजता एखाद्या दृश्याचे चित्रिकरण लांबले, सतत रिटेक होत राहिले, ती दिलीपकुमारची खासियत, तर ते दृश्य दिग्दर्शकाने ओके म्हणायला अकरा वाजले तरी दिलीपकुमार थांबून ते पूर्ण करणार. ईगल फिल्म निर्मित आणि उमेश मेहरा दिग्दर्शित ‘किला’ (१९९९)च्या चित्रनगरीतील कोर्टाच्या सेटवर मी हे स्वतः अनुभवलेय. याच कोर्ट दृश्यात रेखा, स्मिता जयकर यांनीही सहभाग घेतला. स्मिता जयकरच्या खास आमंत्रणावरुन मी या सेटवर गेलो होतो. अनिल कपूरही आपलं दृश्य अधिकाधिक नेमकं होण्यासाठी कायमच आग्रही. इतका की, आजच्या दिवसअखेर चित्रित झालेले, दिग्दर्शकाने ओके म्हटलेले दृश्य अधिक चांगले व्हावे म्हणून दुसऱ्या दिवशी सेटवर आल्याआल्या कालचेच दृश्य पुन्हा एकदा चित्रित करण्याचा त्याचा आग्रह असतो, असे दिग्दर्शक एन. चंद्रा मला एकदा म्हणाले होते. अमिताभ बच्चन तर वक्तशीरपणासाठी ख्यातनाम.

दीपिका

शिफ्ट किती तासाची असावी हे जास्त महत्त्वाचे की सेटवर उशिरा आल्यावरही कलाकार कसं सहकार्य करतो ते महत्त्वाचे? राजेश खन्नाच्या चित्रपटाच्या सेटवर आम्हा सिनेपत्रकारांना शूटींग रिपोर्टीगसाठी आवर्जून आमंत्रित केले जाई. (ते फॅड त्यानेच आणले.) तेव्हा साधारण अकरा वाजताची वेळ आम्हाला दिली जाई. रवि टंडन दिग्दर्शित ‘नजराना’ (१९८६)च्या एसेल स्टुडिओतील सेटवर आम्ही काही सिनेपत्रकार बारा वाजता पोहोचलो तेव्हा स्मिता पाटील आणि श्रीदेवी यांच्यावर काही दृश्ये चित्रित होत होती आणि राजेश खन्ना दीडच्या सुमारास स्टुडिओत आला आणि लगेचच त्याचे सेटबाहेर जेवणासाठीचे टेबल लागले. नंतर मात्र एकदा संवाद वाचूनही ते लक्षात ठेवून दृश्य देऊ लागला. हाच असाच ‘आँखो देखा हाल’ लिहिला. दीपिकाने वेळेचे गणित मांडले त्यात तिचा हेतू आपण आपल्या दोन वर्षांच्या मुलीसाठी (दुवा तिचं नाव) एक ‘आई’ म्हणून वेळ द्यावा हे आहे. सुखवस्तू घरातील मुले, सेलिब्रिटीजची मुलं सांभाळायला त्या प्रशस्त घरात नोकरचाकर असले तरी आपण आपल्या मुलाला लहानाचे मोठे होताना अनुभवणे हा अनुभव एकदाच मिळणार आहे. त्यात रिटेक नाही अथवा फ्लॅशबॅक नाही. चित्रपटसृष्टीच्या झगमगाटात हरवून, हरखून, न्हाऊन निघणे एका ठराविक काळानंतर गरजेचे नसते. घरची ओढ, आपल्या कुटुंबातील वावर याही गोष्टी महत्त्वाच्या असतात. हे दीपिका पदुकोणला वेळीच उमजलेले वास्तव, आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला वेळीच उमजलं तर उत्तम. आता तर रणवीर सिंग आणि दीपिका पुन्हा एकदा आईबाबा होणार आहेत, तेव्हा तर ती आठ तासांची शिफ्टही आणखी एकदीड तासाने कमी असली तर बरं.. असेही तिला वाटेल. चित्रपटसृष्टीच्या शोमनशीपच्या क्षेत्रात ‘आपलं घर, आपल्या घरातील माणसं, आपलं नातं’ हेदेखील महत्त्वाचे आहे हे दीपिका पदुकोण अधोरेखित करत आहे. ही गोष्ट ‘फक्त आठ तासाची शिफ्ट’ असावी एवढ्यावरच संपत नाही…

(लेखक दिलीप ठाकूर ज्येष्ठ सिने पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

आता मुंबईतला ‘मटका’ नागराज मंजुळेच्या हाती!

'मटका किंग' म्हणताच चित्रपटरसिकांच्या पन्नाशी ओलांडलेल्या पिढीला फिरोज खान अभिनित, निर्मित आणि दिग्दर्शित 'धर्मात्मा' (१९७५) आठवला असेल तर त्याच वयाच्या पण फारसे चित्रपट न पाहिलेल्या परन्तु सामाजिक भान असलेल्यांना ओरिजनल मटका किंग रतन खत्री आठवला असेल. नागराज मंजुळे दिग्दर्शित...

होय, ती हेमा मालिनीसारखी दिसतेय, मग?

आपल्या बहुसांस्कृतिक देशात आपण आपल्या आवडत्या चित्रपट‌ कलाकार, क्रिकेटपटूसारखं दिसावं, असावं यासाठी आपल्या चेहऱ्यावर, केसांवर, हसण्यावार, पाहण्यावर मेहनत घेणारे, ब्यूटी पार्लरवर चकरा मारणारे 'दीवाने' (की येडे?) कमी नाहीत. ती वेडी मानसिकता वेगळी. राजेश खन्नाच्या अक्राळविक्राळ क्रेझच्या युगात आमच्या गिरगावात...

त्याला स्वतः काम केलेला चित्रपटही बघण्याची अडचण!

चित्रपटाच्या जगात काहीही घडू/बिघडू शकते. आणि म्हणूनच तर ते काय काय घडतंय हे जाणून घेण्यात रस आहे. अशीच एकदम ताजी गोष्ट, आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंदर २' पाहायला याच चित्रपटात रिक्षाचालकाची छोटीशी असली तरी महत्त्वाची भूमिका साकारलेल्या बदरुल इस्लाम या...
Skip to content