Homeपब्लिक फिगरटिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या...

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा आणि त्यांच्या पिलावळीकडून हा अपप्रचार नियोजनपूर्वक पसरवण्यात आला व त्याआधारे राज्यात धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला. भाजपाच्या या गलिच्छ, खोडसाळपणामुळे काही शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या. त्याबद्दल मी मनःपूर्वक खेद व्यक्त करतो. कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचवण्याचा माझा हेतू नव्हता. आता हे प्रकरण येथेच थांबवू, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानच्या वादग्रस्त प्रकरणावर दिलगिरी व्यक्त केली.

हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांची संयुक्त बैठक आज टिळक भवन येथे झाली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, खजिनदार अभय छाजेड, वरिष्ठ उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील, मोहन जोशी, सिद्धार्थ हत्तीअंबिरे, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, अनंत गाडगीळ, गोपाळ तिवारी आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे. ते माझे आदर्श, प्रेरणास्थान आणि स्वाभिमान आहेत. त्यांच्या तुलनेचा प्रश्नच उद्भवत नाही. मी तुलना केलेली नाही. इतिहासावर मतभेद असू शकतात. मात्र त्यावर संयत, अभ्यासपूर्ण चर्चा व्हावी आणि समाजात संघर्ष निर्माण होऊ नये, जात-धर्म-पंथावर ध्रुवीकरण अजिबात खपवून घेता कामा नये, हीच भूमिका मी मांडली होती. शिवजयंती दोन दिवसांवर आली आहे. आपण सर्वांनी गैरसमज दूर ठेवूया, अपप्रचाराला बळी पडू नका. भाजपाने याप्रश्नी अत्यंत हीन पातळीवरचे राजकारण केले. मला धमक्या दिल्या. पण अशा धमक्यांना मी घाबरत नाही. भाजपाची पोलखोल करतच राहणार. अंगावर आले तर शिंगावर घेऊ.

आजच्या बैठकीबद्दल बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे घेऊन मला एका वर्ष झाले, या एका वर्षात मी केलेल्या कामाचा अहवाल आजच्या बैठकीत मांडला, तसेच आगामी वर्ष संघटन बांधणीचे वर्ष म्हणून काम केले जाणार आहे. ग्रामीण भागात मंडल स्तरावर, गावपातळीवर व शहरात वार्ड प्रभाग अध्यक्ष नियुक्त करण्याचे नियोजन आहे.  भाजपा सरकारचे अपयश जनतेसमोर मांडण्यासाठी शेतकरी, बेरोजगारी, महिला सुरक्षा, कायदा सुव्यवस्था सारख्या मुलभूत प्रश्नांवर विविध पद्धतीने आंदोलन करुन सरकारला जाब विचारला जाईल, असेही सपकाळ यांनी सांगितले.

बैठकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, भाजपा सरकार सर्व पातळ्यावर अपयशी ठरले आहे. अमेरिकेबरोबरचा व्यापार करार, एपस्टिन फाईल्समुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड दबावात आहेत. सरकारविरोधातील प्रश्नावर जनमानसात माहिती पोहोचवली पाहिजे. शेतकरी प्रश्न, बेरोजगारी व इतर मलभूत प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले पाहिजे. सरकारविरोधात लढले पाहिजे. कोस्टल रोडवरून दररोज अंदाजे ५० हजार लोक प्रवास करतात तर लोकलमधून दररोज ९० लाख लोक प्रवास करतात. लोकलमधून दररोज १० प्रवाशांचे मृत्यू होतात, लोकल प्रवाशांना सुविधा दिल्या पाहिजेत. दररोज ८ शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या होत आहेत. काँग्रेस सर्वात मोठा विरोधी पक्ष असून एका सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावली पाहिजे.

ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी ‘काँग्रेसने विचारधारेचे राजकारण का केले पाहिजे?’ या विषयावर व्याख्यान दिले तर ज्येष्ठ पत्रकार अमेय तिरोडकर यांनी ‘महाराष्ट्राची बदलती राजकीय संस्कृती’ या विषयावर व्याख्यान दिले. हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रदेशाध्यक्षपदाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...

‘काळा घोडा’ महोत्सवात मुंबई महापालिकेचे बचत गट मालामाल

मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या...

एमजेएससी कॅरम स्पर्धेत प्रसन्न गोळे अजिंक्य

मुंबईच्या माहीम ज्युवेनाइल स्पोर्ट्स क्लब-एमजेएससी व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित राज्यस्तरीय शालेय मुलामुलींच्या एमजेएससी ट्रॉफी विनाशुल्क कॅरम स्पर्धेत पोद्दार अकॅडमी स्कूल-मालाडचा प्रसन्न गोळे विजेता ठरला. १०-९ अशी आघाडी घेणाऱ्या राष्ट्रीय ख्यातीचा सबज्युनियर कॅरमपटू प्रसन्न गोळेने न्यू इंग्लिश स्कूल-जैतापूरच्या आर्यन...
Skip to content