Homeपब्लिक फिगरमहाराष्ट्रात काँग्रेसची परिस्थिती...

महाराष्ट्रात काँग्रेसची परिस्थिती चिंताजनक!

महाराष्ट्रातील काँग्रेसची परिस्थिती चिंताजनक असून येथे काँग्रेसला जनाधार द्यायचा असेल तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पदावरून उचलबांगडी करावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केली आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठवलेल्या एका पत्रात त्यांनी नाना पटोले यांच्या कार्यकाळात काँग्रेस कशी रसातळाला जात आहे, याचे सविस्तर विवेचन केले आहे.

आपल्या नेतृत्त्वात काँग्रेस प्रगतीच्या अपेक्षेत आहे. एकेकाळी काँग्रेस देशाचा एक प्रमुख पक्ष होता. खरे म्हणजे, काँग्रेस हा नुसता राजकीय पक्ष नसून एक विचार आहे, एक चळवळ आहे. काँग्रेससारखी परंपरा इतर कोणत्याही पक्षात दिसत नाही. एक मोठा राजकीय पक्ष आज आपले अस्तित्त्व टिकवण्यासाठी धडपडतोय, अशी परिस्थिती मागील काही वर्षांपासून उत्पन्न झाली आहे. आपला काँग्रेस पक्ष इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा मागे पडला आहे. आपला पक्ष महाराष्ट्रात सकारात्मक कार्य करताना दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

शेतकरी, कामगार, आदिवासी, युवा वर्ग, महिला, शोषित, पीडित, वंचित, मागासवर्गीय यांचे प्रश्न व्यवस्थित हाताळण्यासाठी तसेच संघटनात्मक कार्य करून ओबीसी, महिलांवरील अत्याचार आणि जनहितार्थ मुद्यांवर मार्ग काढण्यासाठी फेब्रुवारी २०२१मध्ये नाना पटोले यांना मोठ्या विश्वासाने काँग्रेस श्रेष्ठींनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली. पण तो विश्वास त्यांनी सपशेल फोल ठरवला. विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. प्रदेशाध्यक्षांच्या कार्यशैलीमुळे हा बालेकिल्ला आता काँग्रेसच्या हातातून निसटला आहे, हे सर्वश्रुत आहे.

सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीने काँग्रेसची नामुष्की झाली. यात प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले हेच जबाबदार आहेत. पटोलेंच्या कार्यकाळात पक्षाला सातत्याने नाचक्कीचा सामना करावा लागत आहे. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून काँग्रेसची दाणादाण उडत आहे. फेब्रुवारी २०२१मध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काँग्रेस पुढच्या काळात महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष ठरेल यासाठी आम्ही कामकाज करू, असे त्यांनी ठासून सांगितले होते. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून काँग्रेसची वाताहत सुरू झाली आहे. डिसेंबर २०२१मध्ये विधान परिषदेसाठी नागपूरच्या जागेवरून काँग्रेस उमेदवार रवींद्र भोयर होते. पण मतदानाच्या काही तास आधी नाट्यमय घडामोडी झाल्या. अचानक अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपाच्या बावनकुळे यांचा जबरदस्त विजय झाला. जून २०२२मध्ये विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हांडोरे हे नंबर एकचे उमेदवार होते. पण भाई जगताप यांना जास्त मते मिळाली. त्यामुळे चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला. हांडोरे यांना निवडून आणण्याचे हायकमांडचे आदेश होते. तरीही या आदेशाच्या विरोधात निकाल लागला. ४ जुलै २०२२ला शिंदे-फडणवीस सरकारची बहुमत चाचणी परीक्षा होती. यावेळी विरोधकांची एकजूट महत्त्वाची होती. पण काँग्रेसचे तब्बल १० आमदार या बहुमत चाचणीत गैरहजर राहिले. यामुळे सरकारचे बहुमत मोठ्या प्रमाणात वाढले. पक्षादेश असतानासुद्धा अनेकांनी पक्षविरोधी काम केले. या तीनही प्रकरणांची चौकशी करण्याचे आश्वासन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले होते. त्यासाठी हायकमांडकडे अहवाल पाठवणार असल्याचे दावे त्यांनी केले. पण आजपर्यंत कोणावरही कारवाई झाली नाही किंवा कोणालाही जबाबदार ठरविण्यात आले नाही, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

सर्व बाजूंनी काँग्रेस सपशेल तोंडघशी पडली आहे. सत्ता गेल्यानंतरसुद्धा महाविकास आघाडी एकसंघ आहे, हे चित्र खोटे ठरले आहे. जर भाजपाने पाठींबा दिलेले सत्यजित तांबेसारखे अपक्ष उमेदवार पाचही जागांवर निवडून आले तर विधान परिषदेच्या सभापतीपदाचा तिढा तयार होईल. महाराष्ट्रात बेबंदशाही आहे, असे म्हणायलाही आता काही अर्थ उरलेला नाही. राज्यात पक्ष पहिल्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. शिंदे गटामुळे पक्ष पाचव्या क्रमांकावरही जाईल. पक्षात शिस्त नाही. मुळात पक्षाच्या विचारधारेवरही नेत्यांच्या मनात आदर नाही. एकीकडे राहुल गांधी भारत जोडायला निघाले आहेत, पण स्थानिक काँग्रेस नेत्यांना मात्र पक्षापेक्षा स्वत:च्या सत्तेची पडलेली आहे. अशा काँग्रेसविरोधी घटना घडत असताना प्रदेश काँग्रेस अध्यक्षांमध्ये कारवाई करण्याची धमक उरलेली नाही. तसे केल्यास पक्षात कोण उरेल, अशी भीती त्यांच्या मनात आहे.

ज्या काँग्रेसची पाळेमुळे शहरांपासून तर ग्रामीण भागांपर्यंत रोवली गेली होती त्या पक्षाकडे कार्यकर्तेच उरले नाहीत. म्हणजेच पक्षाचा कणा उरलेला नाही. पक्षांतर्गत गटबाजी हा मोठा प्रश्न राज्यातील काँग्रेससमोर उभा ठाकला आहे. संघटनेची घडी विस्कळीत झालेली आहे. आज संघटनेमध्ये चैतन्य निर्माण करण्याची गरज आहे. चैतन्य निर्मितीसाठी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला सर्वत्र प्रचंड प्रतिसाद मिळाला. तरुण वर्गाची गर्दी बघता एका नव्या वर्गाला काँग्रेस जवळची वाटत आहे. काँग्रेसपासून दुरावलेली माणसे जोडण्याचे काम राहुल गांधी करीत आहेत. परंतु, हा प्रतिसाद मतांमध्ये परिवर्तीत करण्यासाठी ठोस रणनीती प्रदेशाध्यक्षांना कितपत जमेल, ही शंका आहे.

महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष आजच्या घडीला सक्षम नेतृत्त्व नसणारा पक्ष म्हणून दिसत आहे. विविध निवडणुकींमध्ये सतत होणारे पराभव असण्याचे कारण म्हणजे पक्षाची असलेली दयनीय अवस्था आहे. या पक्षात नेते उरले आहेत. परंतु कार्यकर्ते नाहीत. राज्यात या पक्षाचा चेहरा गेल्या अनेक वर्षांपासून बदलला नाही. गेली अनेक वर्षे त्याच-त्या नेत्यांची नावे समोर येत आहेत. तळागाळातील कार्यकर्ते यामुळेच पुढे जाऊ शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. नवे चेहरे क्वचितच दिसत आहेत. परिणामी राजकीय करिअरसाठी काँग्रेस विचारसरणीचे लोक इतर पक्षांमध्ये जात आहेत. त्यामुळे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस असे अनेक पक्ष राज्यात प्रभावशाली होत आहेत. राहुल गांधी यांची यात्रा आणि इतर माध्यमांतून तसेच काँग्रेसाध्यक्ष म्हणून आपल्या मदतीने काँग्रेस पक्षाची पुनर्बांधणी होत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. परंतु, महाराष्ट्राचे काय, हा प्रश्न तसाच कायम राहतो.

महाराष्ट्रातील काँग्रेसचे भविष्य हे महाराष्ट्रातील लोकांच्या हातात आहे. काँग्रेसला निर्णायक भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यासाठी मजबूत नेते आणि कार्यकर्त्यांचे नेटवर्क तयार करावे लागणार आहे. नेते व कार्यकर्ते पुन्हा नक्कीच जुळतील. पण त्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील शिर्षत्व नेतृत्त्व आणि कार्यकर्त्यांमधील दुवा म्हणजेच महाराष्ट्र प्रदेशातील नेतृत्त्व सक्षम असणे गरजेचे आहे. म्हणूनच, महाराष्ट्रात काँग्रेसची स्थिती सुधारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष तत्काळ बदलण्याची नितांत गरज आहे. प्रदेशाध्यक्ष असा असावा, जो महाराष्ट्राच्या गावा-गावांत फिरून जनतेचे प्रश्न उचलून त्यास वाचा फोडेल आणि काँग्रेसची स्थिती मजबूत करेल. काँग्रेसच्या उज्ज्वल भवितव्यासाठी या पत्राची गंभीर दाखल घ्यावी, अशी विनंती डॉ. आशिष देशमुख यांनी आपल्या पत्राद्वारे केली आहे.

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content