Homeपब्लिक फिगरऔषध खरेदीसाठी मंत्र्यांमध्ये...

औषध खरेदीसाठी मंत्र्यांमध्ये स्पर्धा!

कोणत्या औषधांचा तुटवडा आहे, याची माहिती गोळा होत नाही. सरकारचे प्रमुख मात्र गोंधळलेल्या अवस्थेत आहे. कारण, मंत्र्यांमध्ये आपल्याला खरेदीचे अधिकार मिळावेत, यासाठी स्पर्धा लागलेली आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.

विरोधी पक्षांच्या नियम २९३ अन्वये, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी, नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण या विभागासंदर्भात विधानसभेत प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर बोलताना त्यांनी, शहरे तसेच ग्रामीण भागातील पाणीपुरवठा, आरोग्यसेवा, अतिक्रमण, वाहतूक कोंडी, रस्ते, मलनि:सारण प्रकल्प, मास हाऊसिंग, प्रदूषण अशा अनेक मुद्यांवर आपली मते मांडली.

सर्वच विभागांना लागणारी औषधे आणि यंत्रसामग्री हाफकीनकडून खरेदी करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१७ला झाला होता. हाफकीनकडून औषधांचा पुरवठा वेळेत होत नसल्याने औषधांचा तुटवडा निर्माण झाला. हा प्रश्न सोडवण्याऐवजी औषध खरेदीचे अधिकार आपल्या विभागाला मिळण्यासाठी शिंदे गटातील मंत्र्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
आज एक निर्णय होतो… दुसऱ्या विभागाचे मंत्री स्थगिती देतात… नंतर दुसराच निर्णय होतो. तिकडे मात्र रुग्णांचे हाल सुरू आहेत. याच सरकारने काही दिवसांपूर्वी विशेष खरेदी प्राधिकरणाची घोषणा केली. तोपर्यंत वैद्यकीय शिक्षण संचालकांना खरेदीचे अधिकार दिलेले होते. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या आयुक्तांना अधिकार देण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली गेली. आता पुन्हा हे अधिकार अन्न व औषध प्रशासन आयुक्तांकडे जाण्याची शक्यता आहे. औषध खरेदीचे अधिकार ‘एफडीए’कडे द्यावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या मंत्र्यांचा आग्रह आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हतबल होऊन मंत्र्यांमधील ही रस्सीखेच बघत आहेत, असे ते म्हणाले.

राज्यात, इन्फ्लुएंझा एच३एन२ या विषाणूचा प्रभाव वाढलेला आहे, हे सरकारनेही मान्य केले आहे. अहमदनगर आणि नागपूर येथे दोघांचा मृत्यू झाला. तापाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. ताप, सर्दी, खोकला यावर शक्यतो लोक खाजगी क्लिनिकमध्ये उपचार घेतात. त्यामुळे ही संख्या कमी दिसते आहे. सरकारने मोफत टेस्टिंग सुविधा वाढवल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे सर्व जिल्ह्यांचे रोजचे अहवाल मागवून त्यावर लक्ष ठेवले पाहिजे, असे आवाहनही पवार यांनी केले.

राज्यातल्या महापालिका, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका तातडीने झाल्या पाहिजेत. तिथे प्रशासकांच्या माध्यमातून सुरू असलेला सरकारचा हस्तक्षेप तत्काळ थांबला पाहिजे. प्रस्ताव, मंजूरीशिवाय कोट्यवधीची कामे सुरू करणे हा भ्रष्टाचार असून त्याला आळा बसला पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासनिधीतून मुख्यमंत्र्यांच्या जाहीरातींवर होत असलेली उधळपट्टी थांबली पाहिजे. जीएसटीनंतर केंद्राकडून मिळत असलेली नुकसानभरपाई बंद झाली आहे, ही भरपाई पुढील पाच वर्षांसाठी चालू ठेवावी, पंधराव्या वित्त आयोगाचा प्रलंबित निधी तातडीने मिळावा, अशी मागणी केंद्राकडे करावी, यासारख्या अनेक मागण्या आणि सूचना त्यांनी केल्या.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content