बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात लवकरच अनोख्या पाहुण्यांचे आगमन होणार आहे! या पाहुण्यांची नावे ऐकूनच अनेक लहानग्यांची पावले राणीच्या बागेकडे वळण्यासाठी हट्ट धरणार आहेत! या पाहुण्यांमध्ये असणार आहेत, मुलांची आवडती पेपा पिग फॅमिली, माशा अँड द बियर, ब्लुई, ट्विटी आणि सिल्व्हेस्टर यांच्यासह नानाविध कार्टून्स! विशेष म्हणजे ही सर्व कार्टून्स पानाफुलांपासून साकारली जाणार आहेत. यासाठी निमित्त ठरणार आहे, ते येत्या ०३ फेब्रुवारी ते ०५ फेब्रुवारी २०२३ यादरम्यान आयोजित होणारे वार्षिक उद्यान प्रदर्शन!

महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित यंदाच्या उद्यान प्रदर्शनाचे आणखी एक आकर्षण असणार आहे ते म्हणजे फुलांपासून साकारलेले ‘जी २०’चे बोधचिन्ह. त्याचबरोबर ‘जी २०’ सदस्य देशांमधील झाडे, फुले आणि भाज्या यांचा समावेशदेखील यंदाच्या उद्यान प्रदर्शनात असणार आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.
पालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात म्हणजेच राणीच्या बागेत आयोजित होणाऱ्या उद्यान प्रदर्शनाचे उद्घाटन पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या हस्ते ०३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी होणार असून या कार्यक्रमाला अतिरिक्त पालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ०५ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या समारोपीय कार्यक्रमातदेखील मान्यवरांची उपस्थित असणार आहे.

दरवर्षी एक मध्यवर्ती संकल्पना घेऊन महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे आयोजित होणारे ‘वार्षिक उद्यान प्रदर्शन’ आता मुंबईची एक ओळख ठरू लागले आहे. लहान मुलांच्या भावविश्वाचा भाग असणारे कार्टून्स या वर्षीच्या उद्यान प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना असणार आहे. या अंतर्गत पानाफुलांपासून तयार केलेल्या विविध कार्टून्सच्या प्रतिकृती यंदाच्या उद्यान प्रदर्शनात बघता येणार आहेत. त्याचबरोबर पानाफुलांपासून तयार केलेले अनेक ‘सेल्फी पॉइंट’देखील यंदाच्या प्रदर्शनाचे खास आकर्षण असणार आहेत.

यासोबतच कुंड्यांमध्ये वाढविलेली फळझाडे व फुलझाडे, फळभाज्यांची झाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोनसाय यांचे अक्षरशः शेकडो प्रकार मुंबईकरांना या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. तसेच मुंबई परिसरात अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या कृष्णवडासारख्या अनेक दुर्मिळ देशी प्रजातींची झाडेदेखील यंदाच्या प्रदर्शनात ‘याची देही, याची डोळा’ बघता येणार आहेत.

कोविड प्रादुर्भावामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर होत असलेले यंदाचे उद्यान प्रदर्शन हे अधिक संस्मरणीय व्हावे, यासाठी महापालिकेच्या उद्यान खात्यातील अधिकारी व कर्मचारी अक्षरशः दिवसरात्र मेहनत घेत आहेत. याच मेहनतीतून पानाफुलांपासून तयार केलेल्या विविध कार्टून्सच्या प्रतिकृतींसह विविध प्रकारच्या प्रतिकृती या प्रदर्शनात अनुभवायला मिळणार आहेत, अशी माहिती परदेशी यांनी दिली.

वर्ष २०१६पासून एका मध्यवर्ती संकल्पनेवर उद्यान प्रदर्शनी आयोजित करण्यात येत आहे. या अंतर्गत २०२०मध्ये मुंबईच्या मानबिंदूंच्या आकर्षक प्रतिकृतींचा समावेश उद्यान प्रदर्शनात करण्यात आला होता. यामध्ये गेटवे ऑफ इंडिया, म्हातारीचा बूट, भारतातील पहिली ट्राम, कापड गिरणी आणि त्यावरील चिमणी, भारतीय चित्रपटसृष्टीचे प्रतीक असणारा फिल्म शूटिंग कॅमेरा यासारख्या प्रतिकृती पानाफुलांपासून साकारण्यात आल्या होत्या.

२०१९मध्ये ‘संगीत आणि वाद्य’ या मध्यवर्ती संकल्पेनवर आधारित उद्यान प्रदर्शनात पानाफुलांपासून तयार केलेली सनई, बासरी, गिटार, तबला, वीणा, सितार, संवादिनी (हामोर्नियम) इत्यादी वाद्यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या होत्या. २०१८च्या प्रदर्शनात ‘जलचर’ या मध्यवर्ती संकल्पनवर आधारित जलपरी, डॉल्फीन, स्टारफीश, ऑक्टोपस, कासव, बदक, मगर, खेकडा इत्यादींच्या प्रतिकृती होत्या. २०१७मध्ये मिकीमाऊस, डोरेमॉन, डोनाल्ड डक यासारख्या लहान मुलांच्या आवडत्या ‘कार्टून्स’च्या प्रतिकृती प्रदर्शित करुन मध्यवर्ती संकल्पना साकारण्यात आली होती. तर मध्यवर्ती संकल्पेनवर आधारित पहिल्या उद्यान प्रदर्शनात ‘स्वच्छ मुंबई – सुंदर मुंबई’ ही मध्यवर्ती संकल्पना होती.

२०१६मध्ये आयोजित या उद्यान प्रदर्शनात पानाफुलांचा वापर करुन तयार केलेल्या स्वच्छताविषयक साहित्य व वाहनांच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, २०२१ आणि २०२२मध्ये कोविड प्रादुर्भावामुळे वार्षिक उद्यान प्रदर्शन आयोजित करण्यात आले नव्हते. महापालिकेच्या उद्यान प्रदर्शनाला भेट देणाऱ्या अभ्यागतांची संख्यादेखील दरवर्षी नवनवे उच्चांक गाठत आहे. वर्ष २०१६मध्ये सुमारे ५० हजार मुंबईकरांनी वार्षिक उद्यान प्रदर्शनाला भेट दिली होती. वर्ष २०१७मध्ये ७५ हजारांपेक्षा अधिकांनी; २०१८, २०१९ आणि २०२०मध्ये तब्बल दीड लाख नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली होती.
‘महाराष्ट्र नागरी क्षेत्र वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम १९७५’मधील तरतुदींनुसार १८ ते २२ जानेवारी १९९६ दरम्यान पहिले उद्यान प्रदर्शन मुंबई महापालिकेद्वारे आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर दरवर्षी साधारणपणे हिवाळ्यात हे प्रदर्शन वृक्ष प्राधिकरण व महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे संयुक्तपणे आयोजित करण्यात येते. सन १९९६पासून दरवर्षी आयोजित होणाऱ्या “फुले, फळे व भाज्या” प्रदर्शनाचे हे २६वे वर्ष आहे. यंदाच्या प्रदर्शनाचा शुभारंभ शुक्रवारी, ०३ फेब्रुवारी २०२३ सकाळी होणार आहे. पहिल्या दिवशी दुपारी १२ ते सायंकाळी ८पर्यंत; तर ०४ फेब्रुवारी व ०५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ८ या वेळेत हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.

या प्रदर्शनाच्या निमित्ताने अनेक परदेशी भाज्यांची रोपे वा झाडे बघण्याची संधीदेखील मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे. तसेच ‘जी २०’ परिषदेचे औचित्य लक्षात घेऊन ‘जी २०’ सदस्य देशातील झाडे भाज्या व फुलेदेखील या प्रदर्शनात बघावयास मिळणार आहेत. या प्रदर्शनासोबतच आयोजित होणाऱ्या विक्री दालनांमध्ये विविध प्रकारच्या झाडांची रोपे, बियाणे, खते, बागकामाची अवजारे, बागकामविषयक पुस्तके यासारख्या अनेक बाबी खरेदी करण्याची संधीही मुंबईकरांना असणार आहे. तरी या प्रदर्शनीसोबतच मुंबईकर नागरिकांसाठी उद्यानविद्याविषयक विविध कार्यशाळांचे आयोजनदेखील करण्यात येणार आहे, असेही परदेशी यांनी सांगितले.

