Homeटॉप स्टोरीअजितदादांनी उराशी बाळगलेले...

अजितदादांनी उराशी बाळगलेले स्वप्न होणार पूर्ण!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पाहिलेले, नाशिक-पुणे महामार्गावर विनाअडथळा, सुखकर प्रवासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या मार्गावर, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या धर्तीवर ₹ 261 कोटी खर्चून 4 मिसिंग लिंक विकसित केल्या जाणार आहेत. त्यामुळे या महामार्गावरील ‘ट्रॅफिक जाम’ची कोंडी सुटणार आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पीएमआरडीए आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी महामार्गाच्या सद्यस्थितीचा सखोल अभ्यास करून हा उपाय सुचवला होता. ‘मिसिंग लिंक’ जोडल्यामुळे वाहतूक दोन मार्गांवर विभागली जाईल आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण परिसरातील वाहतूककोंडीने वर्षानुवर्षे प्रवाशांची सहनशक्ती अजमावली आहे. चाकण शहर आणि एमआयडीसी परिसरातील रस्ते अरुंद असून पर्यायी मार्गांचा अभाव हेच या कोंडीचे मूळ कारण होते. वाहनांचा प्रवाह दिवसेंदिवस वाढल्यामुळे दररोज नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता. आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) तब्बल 261 कोटी रुपये खर्चून चार महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

या मिसिंग लिंक जोडल्या जाणार

या चार मिसिंग लिंकपैकी पहिली- हिंगणे चौक ते फोक्सवॅगन कंपनी (खराबवाडी), 900 मीटर लांबीची असून ती एमआयडीसी टप्पा 3 ला जोडेल. दुसरी- नाणेकरवाडी ते समृद्धी सीएनजी पंप, 1.2 किमी लांबीची असून राष्ट्रीय महामार्ग 60 ला थेट जोडणी देईल. तिसरी- मेदनकरवाडी ते रासे फाटा 2.5 किमी असून तळेगाव-चाकण महामार्गाला जोडणारी महत्त्वाची दुवा असेल. चौथी- वेस्टर्न बायपास, पुणे-नाशिक महामार्ग ते चाकण एमआयडीसी टप्पा पाच, तळेगाव एमआयडीसी ते जुन्या मुंबई-पुणे महमार्गाला जोडणारा 850 मीटर लांबीचा प्रमुख रस्ता. या चारही लिंकमुळे तळेगाव चौक, आंबेठाण व आळंदी फाटा येथील गर्दी मोठ्या प्रमाणात विभागली जाईल. भूसंपादनानंतर एका वर्षाच्या आत हे काम पूर्ण करण्याचे PMRDA चे उद्दिष्ट असून चारही लिंकच्या मार्गांवर आरक्षण टाकण्यात आले आहे आणि अनधिकृत बांधकामे काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

कुंभमेळा सोहळ्यावेळचा वाहतूकताण कमी होणार

पुणे-नाशिक महामार्गावर नाशिक फाटा ते राजगुरुनगर या 28 किलोमीटरच्या पट्ट्यात दररोज सकाळी आणि सायंकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. भोसरी एमआयडीसी असो किंवा मोशी-चाकणचा औद्योगिक पट्टा, हा संपूर्ण मार्ग वाहतूककोंडीच्या चक्रात अडकला आहे. शिवाय पुढील वर्षी नाशिकमध्ये कुंभमेळा सोहळा असल्याने महामार्गावरील वाहनांची संख्या आणखी प्रचंड वाढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हे चार मिसिंग लिंक केवळ चाकण-पुण्यासाठी नव्हे, तर नाशिककरांसाठीही एक महत्त्वाचा श्वास ठरणार आहेत.

महाराष्ट्राचा ‘सुवर्णत्रिकोण’ पूर्ण करणारा महत्त्वाचा दुवा

दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहता, पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाची आखणी रेषा राजगुरुनगर, चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर आणि सिन्नरमार्गे प्रस्तावित असून पुणे, नगर व नाशिक या तीन जिल्ह्यांना जोडणारा हा महामार्ग महाराष्ट्राचा ‘सुवर्णत्रिकोण’ पूर्ण करणारा ठरेल. या मार्गालगत नवे उद्योग, आयटी कंपन्या, कृषी प्रक्रिया केंद्रे विकसित होण्याची मोठी संधी नाशिकसमोर उभी आहे. मिसिंग लिंकच्या या चार धाग्यांमधून भविष्यातील मोठ्या औद्योगिक विणीचा पाया रचला जात आहे. नाशिककरांनी या संधीचे महत्त्व ओळखणे गरजेचे आहे.

नाशिक फाटा ते खेड उन्नत मार्गिकेची निविदा पुन्हा लांबणीवर

दरम्यान, नाशिक-पुणे गतिमान प्रवासासाठी अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण, नाशिक फाटा ते खेड (एनएच-60) उन्नत मार्गिकेची निविदा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) पुन्हा एकदा लांबणीवर टाकली असल्याचे समजते. गेल्या वर्षीपासून ही निविदा प्रक्रिया सुरू असून, वारंवार पुढे ढकलण्यात येत आहे. हा मार्ग कार्यान्वित झाल्यास नाशिक फाटा ते खेड (राजगुरुनगर) हा अडीच तासांचा प्रवास फक्त 20 मिनिटांत पूर्ण होणार आहे. मात्र, 14 हेक्टर जागा संपादित होऊन एजन्सीच्या ताब्यात न आल्याने तिढा कायम असल्याचे समजते. भाईंदर फ्लायओव्हर प्रकरणात भूसंपादनाअभावी झालेल्या घोळाबाबत हसे झाल्यानंतर सरकारी पातळीवर अतिरिक्त सावधगिरी बाळगली जात आहे.

अंदाजे ₹ 7,434 कोटींचा हा प्रकल्प बांधा-वापरा-हस्तांतरित करा (BOT) तत्त्वावर बांधला जात आहे, ज्यामध्ये 30 किमी रस्ता व सेवा रस्त्यांचा समावेश आहे. 2024मध्ये प्रकल्पाला मंजुरी मिळाली. मात्र, निविदा प्रक्रियेला 15पेक्षा जास्त वेळा मुदतवाढ मिळाली आहे. या 8-पदरी उन्नत मार्गिकेसाठी निविदा सादर करण्याची अंतिम तारीख आता एप्रिल 2026च्या सुरुवातीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. जागेचा ताबा सुनिश्चित करण्यासाठी भूसंपादनाचे प्रयत्नही एकाच वेळी वेगाने सुरू आहेत. भूसंपादनासाठी महापालिका आणि राज्य सरकार संयुक्त निधी देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यांनी हा प्रकल्प लवकर मार्गी लावण्यासाठी सर्व संबंधितांना आढावा बैठकीचे आदेश दिले आहेत.

निविदेच्या स्थितीविषयी महत्त्वाचा तपशील

प्रकल्पाची व्याप्ती: नाशिक फाटा (किमी 12.190) ते खेड (किमी 42.113) पर्यंतच्या विद्यमान रस्त्याचे 4-6 पदरी श्रेणीवर्धन करून, दोन्ही बाजूंना 2-पदरी सेवा रस्त्यांसह एकाच खांबावर 8-पदरी उन्नत उड्डाणपूल विकसित करणे.
अंदाजित खर्च: सुमारे ₹ 7,434.33 कोटी.
अंमलबजावणी मोड: बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर (BOT).
नवीनतम अपडेट्स: निविदा उघडण्याच्या तारखेला अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. एनएचएआयच्या नियोजनानुसार, या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मार्च 2030पर्यंत ठेवण्यात आले आहे.
मुख्य आव्हान: प्रकल्पाची प्रत्यक्ष सुरुवात भूसंपादन पूर्ण होण्यावर अवलंबून आहे, ज्याला पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) गती देत आहे. 

Continue reading

आता व्हा पूर्वीसारखे तरुण!

वय वाढणे आणि म्हातारपण येणे हा निसर्गाचा नियम आहे, असे आपण मानतो. पण जर कोणी तुम्हाला सांगितले की, आता तुमचे वाढणारे वय थांबवता येऊ शकते, इतकेच नाही तर म्हातारपणाकडून पुन्हा तारुण्याकडे रिव्हर्स प्रवास करणे शक्य आहे, तर तुमचा कदाचित...

बँकांचे कर्ज बुडवणाऱ्यांच्या घरावर आता थेट जप्ती!

बँकांकडून घेतलेले कर्ज वेळेवर न फेडणाऱ्यांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने आता अधिक कठोर पवित्रा घेतला आहे. ५ मे २०२६ रोजी आरबीआयने 'निर्दिष्ट अ-वित्तीय स्थावर जंगम मालमत्ता' म्हणजेच (एसएनएफए) संदर्भात एक नवीन मसुदा (ड्राफ्ट गाईडलाईन्स) जारी केला आहे. यानुसार,...

जगातल्या पहिल्या कृत्रिम पेशीचा ‘कोडर’ जे. क्रेग वेंटर!

प्रसिद्ध अमेरिकन शास्त्रज्ञ आणि मानवी जीनोम डिकोड करण्यात मोलाची भूमिका बजावणारे जे. क्रेग वेंटर यांचे वयाच्या ७९व्या वर्षी निधन झाले. 'जे. क्रेग वेंटर इन्स्टिट्यूट' (जेसीव्हीआय)ने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, बुधवारी, २९ एप्रिल २०२६ रोजी सॅन डिएगो येथे त्यांनी अखेरचा श्वास...
Skip to content