Homeमुंबई स्पेशलभल्या पहाटे झाली...

भल्या पहाटे झाली कोस्टल रोड व सी लिंकची यशस्वी जोडणी

बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाने आज, शुक्रवारी पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी मुंबई किनारी रस्ता (मुंबई कोस्टल रोड) आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाला (वांद्रे-वरळी सी लिंक) सांधणारी पहिली महाकाय तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) यशस्वीपणे स्थापन केली. खुल्या समुद्रात भरती-ओहोटीचा सुयोग्य वापर करून तुळईद्वारे या दोन मार्गांना जोडण्याचे शिवधनुष्य पालिकेने लिलया पेलले. भारतातील हा पहिलाच प्रयोग यशस्वी ठरल्याने पालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

पहाटे २ वाजेपासून सुरू झालेली ही मोहीम पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी यशस्वीपणे पार पडली. या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर, प्रमुख अभियंता (मुंबई किनारी रस्ता प्रकल्प) गिरीश निकम, ‘एचसीसी’चे उपाध्यक्ष अर्जुन धवन, मोहिमेचे प्रमुख संतोष राय आदींसह अभियंते, अधिकारी उपस्थित होते.

एकूण १०.५८ किलोमीटर लांब असलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील अतिशय आव्हानात्मक टप्पा म्हणजे मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाची सांधणी. त्यासाठी पालिका प्रशासनाने अतिशय नियोजनबद्ध आखणी केली. या दोन्ही टोकांना सांधणारी पहिली तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) बुधवारी, २४ एप्रिलला दुपारी साडेबारा वाजता माझगाव डॉक येथून मार्गस्थ झाली. त्यानंतर गुरुवारी, २५ एप्रिलला पहाटे चार वाजता ती वांद्रे-वरळी सागरी सेतूजवळ पोहोचली.

संयम आणि कौशल्य पणाला लावणारे १ तास २५ मिनिटे

प्रवाहकीय हवामानानुसार अंदाज घेऊन पहाटे २ वाजल्पायासून गर्डर स्थापनेची कार्यवाही सुरू करण्यात आली. त्यानंतर बार्जच्या मदतीने टप्प्याटप्प्याने तुळई मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाच्या मधोमध आणली. सागरी लाटांचा आणि वाऱ्याच्या वेगाचा अंदाज घेत अभियंत्यांनी कौशल्य पणाला लावत सुयोग्य स्थितीत तुळईला स्थिर केले.

मुंबई किनारी रस्त्याच्या कडेला दोन आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाच्या कडेला दोन असे चार मेटींग युनिट तयार करण्यात आले आहेत. त्या मेटींग युनिटमध्ये तुळईचे चारही कोपऱ्यांना असलेले पांढऱ्या रंगाचे मेटींग कोन ठिक ३ वाजून २५ मिनिटांनी अचूकपणे बसविण्यात आले. चारही मेटींग कोन आणि मेटींग युनिटची सांगड बसताच उपस्थित अधिकारी, अभियंते आणि कामगारांनी ‘हिप हिप हुर्रे..’ म्हणत आणि टाळ्यांचा गजरात मोहीम फत्ते झाल्याचा आनंद व्यक्त केला. त्यानंतर तुळईखाली असलेला रिकामा तराफा बाजूला करण्यात आला.

तुळईचा अंबाला ते मुंबई प्रवास

ही तुळई वरळीकडून नरिमन पाईंट दिशेला जाणाऱ्या मार्गावर स्थापन करण्यात आली. ही तुळई दोन हजार मेट्रीक टन वजनाची असून, १३६ मीटर लांब आणि १८ ते २१ मीटर रुंद आहे. अंबाला (हरियाणा) येथे या तुळईचे छोटछोटे सुटे भाग तयार करण्यात आले आहेत. तेथून तब्बल ५०० ट्रेलरच्या मदतीने हे सुटे भाग येथे दाखल आले. सुटे भाग एकत्र जोडून नवी मुंबईतील न्हावा बंदरातून तराफाच्या मदतीने ही तुळई वरळी येथे आणली गेली.

पुढील टप्प्यात ही कामे होणार

मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील वरळीकडील बाजू आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाची मुंबई किनारी रस्त्याला मिळणारी बाजू येथे प्रत्येकी दोन मेटींग कोन आणि दोन मेटींग युनिट बसविण्यात आले आहेत. या मेटींग कोन आणि युनिटची योग्य सांगड बसविण्यात आली आहे. हे मेटींग युनिट २ मीटर व्यास आणि मेटींग कोन १.८ मीटर व्यासाचे आहेत. यानंतर मेटींग कोन आणि युनिट असलेल्या चारही कोपऱ्यांवर जॅक बसविण्यात येतील. तसेच जॅक कार्यान्वित केल्यानंतर मेटींग कोन आणि युनिट काढून घेण्यात येणार आहेत. पुढच्या तांत्रिक प्रक्रियेत बेअरिंगचा वापर करून त्यावर तुळई स्थिरावणार आहे. त्यानंतर जॅकदेखील काढून घेण्यात येणार आहेत.

तुळईवर होणार सिमेंट क्राँक्रिटीकरण

मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूदरम्यान स्थापन करण्यात आलेल्या तुळईवर पुढील टप्प्यात सिमेंट क्राँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या तुळईला गंज चढू नये यासाठी सी-५ या जपानी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तसेच अतिशय प्रगत वेल्डिंग तंत्रज्ञानाद्वारे तुळईचे सुटे भाग एकमेकांना जोडण्यात आले आहेत.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content