देशांतर्गत नागरी सहकार्य करण्याच्या प्रक्रियेत भारतीय हवाई दलाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत फार मोठी कामगिरी बजावली. यंदा पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात, गेल्या काही महिन्यांमध्ये हवाई दलाच्या मध्यम उंचीवर उड्डाण करणारी हेलिकॉप्टर्स (एमआय-17 व्हेरिएंट), हलक्या वजनाच्या वाहतुकीसाठीची हेलिकॉप्टर्स (चेतक) आणि स्वदेशी बनावटीची अत्याधुनिक हलक्या वजनाच्या वाहतुकीसाठीची हेलिकॉप्टर्स (Advanced Light Helicopters-ALH) ध्रुव अशा अनेक हेलिकॉप्टर्सनी मोठ्या प्रमाणात उड्डाणे केली.
भारतीय हवाई दलाच्या परिवहन आणि हेलिकॉप्टर ताफ्याद्वारे युद्ध आणि शांततेच्या काळात विविध मोहिमा आणि उपक्रम हाती घेतले जातात. त्याअंतर्गतच शांततेच्या काळात आपल्या सैन्यातले चैतन्य आणि ऊर्जा कायम राखण्याच्या उद्देशाने हवाई देखरेख, देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय सरावादरम्यान लढाऊ सैनिकांना हवाई मार्गाने घेऊन जाणे आणि आणणे अशा प्रक्रारच्या मोहिमा आणि उपक्रम हाती घेतले जातात. याशिवाय राष्ट्रउभारणीच्या प्रक्रियेत कामी येणाऱ्या अनेक मोहिमा या ताफ्याद्वारे पार पाडल्या जात असतातच. एका अर्थाने आपले हवाई दल आपल्या नागरी शक्तीला सहकार्य करण्यात कायम आघाडीवर राहिले आहे.
यंदा पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत हवाई मार्गाने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे घेऊन जाणे आणि येणे, निवडणूक सेवेसाठी तैनात केलेल्या निवडणूक आयोगाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची हवाई मार्गाने ने-आण करणे अशा अनेक मोहिमांमध्ये भारतीय हवाई दल सक्रियपणे सहभागी झाले होते. भारतीय हवाई दलाने मागच्या वेळी झालेल्या सार्वत्रिक / विधानसभा निवडणुकांदरम्यानही अशाच प्रकारची जबाबदारी पार पाडली होती. लोकसभा निवडणुकीत देशाच्या अत्यंत दूर्गम भागांपर्यंत, तसेच ज्या ठिकाणी रस्त्याने होणारी वाहतूक करणे सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेची बाब होती अशा अनेक ठिकाणी भारत निवडणूक आयोगाची यंत्रणा आणि साधनसामग्री पोहोचवण्यात हवाई दलाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. ही संपूर्ण मोहीम काटेकोर कालमर्यादांची होती. कारण, मतदान अधिकाऱ्यांना प्रत्येक दूर्गम भागातील मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष मतदानाच्या तारखेच्या दोन दिवस आधी पोहोचवून तैनात करणे आणि मतदानाच्या दिवशी संपूर्ण प्रक्रिया संपल्यावर लगेचच त्यांना तिथून पुन्हा निश्चित कालमर्यादेतच माघारी आणणे बंधनकारक होते.
लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या सातपैकी पाच टप्प्यांच्या कार्यान्वयामध्ये हवाई दलाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. या काळात हवाई दलाने 1000पेक्षा जास्त तासांची 1750पेक्षा जास्त उड्डाणे केली. या मोहिमा प्रचंड आव्हानात्मक होत्या. मात्र भारत निवडणूक आयोग आणि विविध राज्यांमध्ये नियुक्त समन्वय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तिथल्या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यासोबत समन्वय राखून काम केल्याने या आव्हानात्मक मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या गेल्या. अशा प्रकारच्या नियोजनबद्ध समन्वयामुळे हवाई दलाच्या साधनांची सुरक्षा, हवामान, रस्त्यांची जोडणी अशा महत्त्वाच्या घटकांवर आधारीत नियोजनबद्ध उपयोगिता करून घेणे शक्य झाले. याशिवाय लोकसभा निवडणुकीत भारतीय लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाच्या हेलिकॉप्टर्सचाही या मोहिमांच्या संपूर्ण नियोजनात समावेश करण्यात आला होता.