Homeटॉप स्टोरी... अखेर शरद...

… अखेर शरद पवारांची भाकरी भाजलीच नाही!

२७ एप्रिलला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शरद पवार यांनी आपण लवकरच भाकरी फिरवणार आहोत, असे सांगितले होते. त्यामुळे पक्षात मोठे फेरबदल होतील अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र दोन मे रोजी त्यांनी स्वतःच आपल्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यावरून, आपण भाकरी फिरवणार होता, पण प्रत्यक्षात तवाच फिरवला… असे का, असे त्यांना विचारले असता पवार म्हणाले की, भाकरी भाजलीच नाही आणि मग एकच हंशा पिकला.

लोक माझे सांगाती, या सुधारित आत्मचरित्रपर पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात दोन मे रोजी शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा जाहीर केला होता. त्याचवेळी त्यांनी आपला उत्तराधिकारी निवडण्यासाठी तसेच आपल्या राजीनाम्यावर विचार करण्यासाठी एक समितीही जाहीर केली. पवार यांनी आपला निर्णय जाहीर केल्यापासून राजीनामा मागे घेईपर्यंत गेले तीन दिवस पक्षाच्या विविध नेत्यांकडून तसेच त्यांच्या सहकारी पक्षांच्या नेत्यांकडून पवार यांनी आपल्या पदावर कायम राहावं असा आग्रह केला जात होता. पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून रोजच्या रोज राजीनामासत्र तसेच ठिय्या आंदोलन अथवा इतर प्रकारच्या माध्यमातून पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून प्रयत्न केले जात होते.

आज सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण केंद्रात पवार यांनी घोषित केलेल्या समितीची बैठक झाली. ही बैठक जेमतेम पंधरा मिनिटे चालली. या बैठकीला अजित पवारही उपस्थित होते. या बैठकीमध्ये शरद पवार यांनी दिलेला राजीनामा एकमताने फेटाळण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे तसा ठरावही एकमताने मंजूर करण्यात आला. ठराव मंजूर झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण केंद्राबाहेर असलेले पक्षाचे कार्यकर्ते प्रफुल्लित झाले आणि त्यांनी पवारांच्या बाजूने घोषणाबाजी चालू केली. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनीही माध्यमांना या ठरावाबद्दलची माहिती दिली. त्यानंतर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले. तेथे त्यांनी ठरावाबद्दलची माहिती दिली तसेच राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. त्यावेळी पवार यांनी संध्याकाळी साडेपाच वाजता पत्रकार परिषदेत आपण आपला निर्णय जाहीर करू, असे स्पष्ट केले.

संध्याकाळी साडेपाच वाजता यशवंतराव चव्हाण केंद्रात शरद पवार आपल्या पत्नी प्रतिभाताई यांच्यासमवेत आले. मात्र पत्रकार परिषदेच्या वेळी त्या व्यासपीठावर आल्या नाहीत. गाडीतच बसून राहणे त्यांनी पसंत केले. त्यानंतर पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, तसेच पक्षाची यंग ब्रिगेड होती. यात आमदार रोहित पवार, संग्राम पाटील, सोनिया मोहन, दर्शना संगत आदींचा समावेश होता. कार्यकर्त्यांच्या भावना, आपल्या सहकाऱ्यांचा आग्रह या साऱ्याचा सन्मान करत आपण पक्षाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे पवार यांनी यावेळी जाहीर केले. मात्र पक्षांमध्ये नवे नेतृत्त्व तयार करण्याचं आपले काम चालूच राहील. यासाठी काही संघटनात्मक बदल केले जातील. यापुढे कोणतेही जबाबदारीचे पद आपण स्वीकारणार नाही. संघटनात्मक बदलांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असेही पवार यांनी सांगितले.

63 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीनंतर आपण निवृत्त होण्याचा निर्णय प्रयत्न केला, असे ते म्हणाले. अजित पवार का उपस्थित नाहीत, असे विचारले असता पवारांनी प्रतिप्रश्न केला की, पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार उपस्थित असतात का? अजित पवार यांची कोणतीही नाराजी नाही, आपण राजीनामा मागे घ्यावा असं अजित पवार यांचीही विनंती होती. अजित पवार दिल्लीला गेले आहेत, या म्हणण्यातही काही तथ्य नाही. सुप्रिया सुळेंना आपला उत्तराधिकारी बनवण्यात येईल, या म्हणण्यातही काही तथ्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीतीलसर्व पक्षांचा समन्वय अधिक मजबूत केला जाईल, असेही ते म्हणाले.

Continue reading

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...

प्राध्यापक डॉक्टर भ्रष्टाचारी? जे. जे. रुग्णालयात खळबळ!

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (आर्थॉपेडिक्स) विभागात एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्ध अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रा. डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ करणे, बनावट सह्या करणे आणि...
Skip to content