Homeमुंबई स्पेशल.. आणि अवघ्या...

.. आणि अवघ्या दीड मिनिटांतच राज्यपालांनी सोडले सभागृह!

विधानभवनात आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाच्या सत्ताधारी महाविकास आघाडी तसेच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे उद्विग्न झालेले राज्यपाल यांनी आपले अभिभाषण अवघ्या दीड-दोन मिनिटांतच अर्धवट सोडून संयुक्त बैठकीचे सभागृह सोडले.

आज विधानभवनात राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. सकाळी ११ वाजता विधानसभा तसेच विधान परिषदेच्या संयुक्त बैठकीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरूवात झाली. राज्यपालांचे वाचन सुरू होताच सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यास सुरूवात केली. सत्ताधाऱ्यांच्या या भूमिकेनंतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी ईडीकडून दाऊदच्या हस्तकांशी व्यवहार करणाच्या आरोपांवरून अटक करण्यात आलेल्या अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली. यावेळी काही सदस्यांनी कुविख्यात दाऊद इब्राहिमची छायाचित्रेही झळकावली. दोन्ही बाजूंच्या सदस्यांची आक्रमक भूमिका पाहता राज्यपालांनी आपले अभिभाषण अर्धवट सोडत काही मिनिटांतच सभागृह सोडले.

राज्यपालांना माफी मागावीच लागेल – नाना पटोले

राज्यपाल निघून गेल्यावर सभागृहाबाहेर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आम्ही गदारोळ केलाच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यांना माफी मागावीच लागेल. आम्ही अभिभाषणाला विरोध केला नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला, असे त्यांनी सांगितले.

राज्यपालांनीच राष्ट्रगीताचा अवमान केला – जयंत पाटील

राज्यपाल कोश्यारी यांनी राष्ट्रगीतानंतर अभिभाषणास सुरूवात केली. त्यानंतर ते काही मिनिटांतच अभिभाषण अर्धवट टाकून निघून गेले. अभिभाषणानंतर त्यांनी राष्ट्रगीत म्हणणे अभिप्रेत आहे. पण ते न म्हणता निघून जाणे हा राष्ट्रगीताचा अपमान आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केला.

कामकाज चालवणे हे सरकारचे काम – देवेंद्र फडणवीस

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, देशद्रोही दाऊद इब्राहीमची बहीण हसिना पारकर हिला व्यवहारातले पेसे देणारे आणि दाऊदच्या हस्तकांशी संबंध ठेवणारे मंत्री नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होईपर्यंत आम्ही संघर्ष करत राहणार. मुंबई उद्ध्वस्त करणाऱ्या दाऊदला अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्यांना पाठिशी घालत अभिभाषणाच्या माध्यमातून चुकीचे चित्र उभे करण्याविरूद्ध आम्ही घोषणाबाजी केली. अभिभाषणासह कामकाज सूरळीत चालवण्याची जबाबदारी सरकारची आहे, असेही त्यांनी सांगितले.

संजय दौंड यांचे शीर्षासन

यापाठोपाठ विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. राज्यपाल हाय हाय.. खाली डोके वर पाय.. अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. राष्ट्रवादीचे आमदार संजय दौंड यांनी यावेळी शीर्षासन करून खाली डोके, वर पायचे प्रात्यक्षिक दाखवले.

विधानसभेत नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी

विधानसभेतही कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नियम ५७ अन्वये बोलताना नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मुंबईशी गद्दारी करणाऱ्या, बॉम्बस्फोट घडवणाऱ्या दाऊदच्या हस्तकांशी, नातेवाईकांशी व्यवहार करणाऱ्या, व्यक्तीला मंत्रिमंडळात स्थान देणे, इतकेच नव्हे त्या नवाब मलिक यांना अटक झाल्यावरही त्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवणे घटनेला धरून नाही. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून ताबडतोब हकालपट्टी करावी, असे ते म्हणाले.

यानंतर उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी हा विषय फेटाळला आणि राज्यपालांचे अभिभाषण पटलावर ठेवले. लगेच राज्यपालांचे अभिभाषणाबद्दल अभिनंदन करणारा प्रस्तावही मांडण्यात आला. त्यापाठोपाठ अध्यादेशही पटलावर ठेवण्यात आले. पुरवण्या मागण्याही सादर करण्यात आल्या.

तालीकाध्यक्ष जाहीर

गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करताना केलेले वक्तव्य कामकाजातून काढण्याची विनंती केली. परंतु उपाध्यक्ष झिरवाळ यांनी त्याकडे दुर्लक्ष करत तालिकाध्यक्षांची नावे जाहीर केली. भास्कर जाधव, कालीदास कोळंबकर, संजय शिरसाट, दीपक चव्हाण आणि कुणाल पाटील यांची तालीकाध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आले. त्यानंतर लता मंगेशकर, राहुल बजाज, एन. डी. पाटील आदी सदस्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content