Homeकल्चर +रविकिरण बालनाट्य स्पर्धेत...

रविकिरण बालनाट्य स्पर्धेत ‘अडलंय का?’ अव्वल!

सहा दशकांहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात अवीट ठसा उमटवत आलेल्या रविकिरण संस्थेची बहुप्रतीक्षित ३९वी बालनाट्य स्पर्धा यंदा अधिक दिमाखात, अधिक उत्साहात आणि अधिक कलात्मकतेने साजरी झाली. ११ व १२ डिसेंबर रोजी मुंबईतल्या यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे पार पडलेल्या या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट बालनाट्याच्या प्रथम पारितोषिकासह सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, उत्कृष्ट नेपथ्य, उत्कृष्ट प्रकाशयोजना असे पाच पुरस्कार पटकावून कल्याण वरपच्या सेक्रेड हार्ट स्कूलचे ‘अडलंय का?’ हे बालनाट्य अव्वल ठरले.

सर्वोत्कृष्ट बालनाट्य, लेखन व दिग्दर्शनाच्या द्वितीय पुरस्कारासह सर्वोत्कृष्ट तृतीय अभिनेत्री या पुरस्कारांवर दिंडी ‘झ’ प्रतिष्ठानच्या ‘दिव्या खाली दौलत’ने नाव कोरले. सर्वात्कृष्ट अभिनय व लेखनाच्या प्रथम पुरस्कारासह सर्वोत्कृष्ट तृतीय बालनाट्य व दिग्दर्शनासह उत्तेजनार्थ अभिनेत्रीचा सन्मान मुक्तछंद नाट्य संस्थेच्या ‘रंग जाणिवांचे’ला मिळाले. अनुप मोरे स्पोर्ट्स अँड सोशल फाऊंडेशन, पुणे यांच्या सर्कस या बालनाट्यास स्पेशल ज्युरी अवॉर्डने गौरवण्यात आले. पहिले उत्तेजनार्थ पारितोषिक पार्ले टिळक विद्यालय इंग्रजी माध्यम विलेपार्ले शाळेच्या ‘रे क्षणा’ला, तर दुसरे उत्तेजनार्थ संदेश विद्यालय, पार्क साईटच्या ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ला देण्यात आले. १९ उत्कृष्ट बालनाट्यांमधून हा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.

या स्पर्धेचे परीक्षण लोकप्रिय युवा अभिनेत्री पूर्वा पवार, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक हेमंत सुहास भालेकर आणि ज्येष्ठ नाट्यसमीक्षक, निवेदक, कलादिग्दर्शक व पत्रकार नंदकुमार पाटील यांनी केले. अभिनेते प्रमोद पवार, नारायण जाधव, महेंद्र पवार, विनोद पवार यांसह अनेक दिग्गज कलावंतांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली. कल्पनाशक्तीने समृद्ध अशा १९ दर्जेदार बालनाट्यांमध्ये ही रंगतदार चुरस रंगली होती. यंदा रविकिरण मंडळाची ही स्पर्धा मंडळाचे ज्येष्ठ, निष्ठावान सभासद मनोहर नगरकर आणि कोकणच्या लालमातीतील रंगकर्मी रघुनाथ कदम यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात आली होती. मंडळाचे ज्येष्ठ सभासद अशोक परब यांच्या कलाक्षेत्रातील कार्याबद्दल आणि हेमंत चव्हाण यांच्या सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

या स्पर्धेच्या निकालासाठी विशेष अतिथी म्हणून सन मराठी वाहिनीचे बिझनेस हेड दीपक राजाध्यक्ष आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची विशेष उपस्थिती होती. दोन्ही मान्यवरांचे बालरंगभूमी व रंगकलेशी जिव्हाळ्याचे अतूट नाते असल्याचे दिसून आले. मुलांनी दाखवलेले अभिनयकौशल्य, सादरीकरणातील पकड आणि लेखकांनी खास तयार केलेल्या संहितांतील अद्भूत कल्पनाशक्ती, काळानुसार विषयांतील विविधता यामुळे यंदाची स्पर्धा अविस्मरणीय ठरली. या स्पर्धेत आपले कलागुण दाखविणारे बालकलावंत उद्याचे चमकते तारे असणार आहेत हे निश्चित, असे उद्गार दीपक राजाध्यक्ष यांनी काढले.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content