Homeन्यूज अँड व्ह्यूजतीन हात नाक्यावर...

तीन हात नाक्यावर बेस्ट चालक-वाहकाचा ‘मोला’चा विचार!

स्थळ- तीन हात नाका, ठाणे शहरातला एक प्रमुख मोठा चौक! जवळजवळ दिवसाचे २४ तास गजबजलेला!! नाताळाच्या आदल्या दिवशी गर्दीत जरा वाढच (गाड्यांच्या हो…). आकाशातल्या मायबापाला विनवण्यासाठी जणू सर्वांचीच धडपड! लाल बहाद्दूर शास्त्री मार्गाजवळील सिग्नलजवळ एक म्हातारबुवा चबुतऱ्याच्या आधाराने उभा आहे. रस्ता ओलांडायच्या प्रतीक्षेत आहे. पण चाहूबाजूंनी येणाऱ्या भरधाव गाड्यांनी त्या म्हातारबुवांचं मन विचलित होतंय असं मला दिसत होतं. कारण मीही त्यांच्याच समांतर रेषेत म्हटलं तर दूर, म्हटलं तर जवळ असं आडनाड्या हिशेबात उभा होतो. मलाही रस्ता ओलांडायचा होता.

तसा मी बराचसा निशाचरच! ठाणे काय, मुंबई काय? ही शहरे जवळून पाहायची असतील तर रात्रीशिवाय पर्याय नाही! सर्व गल्ल्या व बऱ्याचदा मोठे रस्तेही मनाप्रमाणे ‘नजरेखालून’ घालता येतात! पदपथावर कुठे दगड ठेवून कोण उद्या सकाळसाठी जागा ‘अडवून’ गेला आहे तेही समजते. मात्र, बराच धीर धरण्याची आणि समोरच्याला ‘कटिंग’ देण्याची दानत असावी लागते. कधीकधी ‘बिडी’ही द्यावी लागते. हे सर्व पुन्हा कधीतरी.. आधी त्या विचलित झालेल्या म्हातारबुवांची चौकशी करूया. दोन-तीन मिनिटांतच गाड्यांचा अंदाज घेत मीही म्हातारबुवांच्या जवळ गेलो. इतक्या रात्री कुठून? सहज प्रश्न गेला. शीववरून येतोय. ४९१ नंबरच्या बसने! पण मग इथे कुठे? नाही हो, बस तीन हात नाक्यापर्यंत होती. अरे मग बसथांबा तर सिग्नलनंतरच आहे. मध्ये कुठे उतरलात? बुवा या प्रश्नांची वाटच पहात होते. उसळून ते म्हणाले- बसच्या चालक-वाहकांनी येथेच उतरून घ्या, थांब्यापर्यन्त गेलो तर बस वळवण्यासाठी थेट कॅडबरी चौकपर्यंत गाडी न्यावी लागेल. (डिझेल किंवा वीज वाचवण्यासाठी किती ‘मोलाचा’ विचार)…

तीन हात

बुवा बोलतच होते- खरंतर बसमध्ये आम्ही १५/२० प्रवासी होतो. बस बाळकूम दिशेकडे जाणाऱ्या सिग्नलला थांबली होती. याचा गैरफायदा घेत चालकाने ‘चला आता येथेच उतरून घ्या, थांब्यावर बस जाणार नाही. येथेच आम्ही वळवणार व माघारी जाणार’ असे वरच्या पट्टीत सांगितले. म्हातारबुवा म्हणाले की बस तर तीन हात नाका, थांब्यापर्यंत आहे ना? तेथे सोडा, महिलांवर्ग व ज्येष्ठ नागरिक रस्ता कसा ओलांडतील? ते मी कसं सांगू? उलट जबाब… अहो येथे मागूनही बाईक्स व रिक्षा येत असतात, सांगण्याचा निष्फळ प्रयत्न.. बघा सर्व उतरून गेलेही, तुमचेच नखरे… चला लवकर उतरा… फर्मानच सुटले म्हणा ना! मुकाट्याने खाली उतरलो.. रखडत रखडत.. कारण, गाड्यांचे प्रखर दिवे व बाईक्स कधी पायावरून जातील याचा नेम नसल्याने अधिक सावध! दहा मिनिटे झाली. काही सुधरत नव्हते, म्हणून स्वस्थ उभा होतो. तोच तुम्ही आलात. तुम्हीही ‘आजोबा’च दिसताय! (माझी विकेट गेलीच). मला सवय आहे हो.. रात्री-बेरात्री फिरायची. माझी काळजी करू नका. चला आपण दोघे मिळून रस्ता ओलांडू!

रस्ता ओलांडून बुवांना बसथांब्यापर्यंत सोडले. पण अनेक प्रश्न बेस्ट प्रशासनासाठी मनात आले. प्रवासी बसमध्ये असताना केवळ बस सिग्नल नाही म्हणून थांबली असताना प्रवाशांना उतरवणे वाहक-चालकाला शोभते का? बेस्ट परिवहनाच्या कोणत्या नियमात हे बसते, याचा खुलासा बेस्ट प्रशासन किंवा मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी करणे गरजेचे आहे. बेस्ट परिवहन हा महापालिकेच्या अख्त्यारीत येत असल्याने त्यांनीच याप्रकरणी काही कारवाई करावी. कारवाई अशासाठी हवीय की कुणीही कुणाच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करू नये तसेच नियमांचे पालन करावे. जशी अपेक्षा प्रवाशांकडून केली जाते, तीच नियमावली कर्मचाऱ्यांनाही लावावी. सुमारे ८० वर्षांच्या म्हातारबुवांना आम्ही भेटलो. असे नशीब सर्वांचेच थोडे असणार आहे. उद्या आम्हाला कोण भेटले तर बरे…

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Continue reading

भाईंदरमध्ये पोलिसांच्या कार्यक्रमात ताकाचा ग्लास आणि …

वाचक हो, तुम्हाला आठवत असेलच की जुन्या हिंदी चित्रपटात अर्ध्या नोटेचं चिटोरं दाखवलं की खलनायकाच्या गुहेत विनासायास प्रवेश मिळत असे. (हल्ली काही वेबसिरीजमध्येही हा खेळ दाखवत असतात) तसेच लाचलूचपत प्रतिबंधक खात्यातर्फे धाड पडली की काहीजण नोटा खातात. काहीजण संडासाच्या...

न्यायालयात शब्दांना धार, बोरूही चालतो.. पण हातचं राखून!

ठाणे शहरात नुकतेच शहरातील 'वाहतूक लोककेंद्री कशी असावी' यावर एक चर्चासत्र होते. या सत्रात दिगज्ज वक्ते होते. सर्वोच्च न्यायालयातले निवृत्त न्या. अभय ओक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, अ. पा. देशपांडे व नगर रचनाकार सुलक्षणा महाजन आदी तगडे वक्ते होते....

न्यायमूर्तींचे निरीक्षण मोदी सरकारच्या अंगाशी!

अखेर अडीच-तीन महिन्यांच्या घोळानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलाच! त्यासाठी विद्यार्थ्यांना जंतरमंतरवर चार दिवस आंदोलन करावे लागले, लाठीमर खावा लागला. अनेक विद्यार्थ्यांना तर दिल्ली पोलिसांनी बदडून काढलेले जनतेने पाहिले. (विद्यार्थ्यांनीही पोलिसांना मारले...
Skip to content