शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या चौकशीत व्हिपच्या मुद्द्यावर शिंदे गटाच्या वकिलांकडून पिळून काढल्यानंतर काल कामकाज सुरू होण्यापूर्वीच ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर पक्षपातीपणा करत असल्याचा दावा केला. तसे पत्रही त्यांनी विधानभवनाच्या सचिवालयाकडे दिले. मात्र, त्यानंतरही व्हिपच्याच मुद्द्यावर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी प्रभू यांच्यावर प्रश्नांचा भडिमार चालूच ठेवला आणि या व्हिपच्या वैधतेवरच शंका उपस्थित केली.
यावेळी झालेला सवाल-जबाब थोडक्यात असा…
जेठमलानी- आमदार निवासात व्हिप पाठवला ते कुठल्या, एमएलए हॉस्टेल का?
सुनील प्रभू- होय.
जेठमलानी- 20 जूनला शिवसनेच्या किती आमदारांनी मते दिली?
प्रभू- प्रतिज्ञापत्रात दिले आहे.
जेठमलानी- मला थेट आकडा अपेक्षित आहे.
देवदत्त कामत (ठाकरे गटाचे वकील)- त्यावेळी शिवसेनेतल्या सर्व आमदारांनी मत दिले.
प्रभू- आकडा पटलावर आहे. पुन्हा पुन्हा का विचारता? मी यापूर्वीच सांगितले.. शिवसेनेच्या सर्व 55 सदस्यांनी मतदान केले.
जेठमलानी- तुम्ही म्हटले 9 जण पक्ष कार्यालयात उपस्थित होते. मग बाकीचे 46 आमदार निवासात होते का?
प्रभू- माझे लक्ष विचलित केले जात आहे. मी विसरलो. आता मला सारे परत आठवावे लागेल.
प्रभू- मी आमदार निवासात व्हिप पाठवले. बाकीच्यांना फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
जेठमलानी- तुम्ही आमदार निवासात व्हीप दिलात की, तो देण्याचा अयशस्वी प्रयत्न केलात?
प्रभू- भाषा जशी वळवाल तशी वळते. मी म्हणालो की जे माझ्यासोबत पक्ष कार्यालयात होते त्यांना तिथे दिले, बाकिच्यांना जिथ संपर्क झाला तिथे देण्याचा प्रयत्न केला.
जेठमलानी- आमदार निवासातील किती आमदारांना व्हिप दिला?
प्रभू- किती ते आठवत नाही. आमदार निवासात दिले होते आणि बाकीचे जिथे होते तिथे जाऊन देण्याचा प्रयत्न केला.
जेठमलानी- तुम्ही हा व्हिप व्यक्तिश: बजावला नव्हता. मग तो बजावला आहे, हे कशाच्या आधारावर बोलता?
प्रभू- मी व्हिप सही करून जारी करतो. कर्मचारी त्या व्यक्तीला नेऊन देतात. तो कोणाला मिळाला हे त्याने केलेल्या सहीवरून समजते. या सह्या पक्ष कार्यालयात आहेत.
जेठमलानी- जर हा रेकॉर्ड आहे तर तो इथे का सादर केला नाही?
प्रभू- हे खोटे आहे.
जेठमलानी- तुम्ही म्हणालात की, जे प्रत्यक्ष उपलब्ध नव्हते त्यांना व्हॉट्सअॅपवर व्हिप पाठवला. तो तुमच्या मोबाईलवरून पाठवलात का?
प्रभू- माझ्याकडून निरोप जातो, फोन जातो. त्यावेळच्या धावपळीत माझ्याकडून ते शक्य नव्हते. यापूर्वीही मी कधी ते पाठवले नाहीत. मी प्रतोद असल्यापासून आणि त्याच्याआधीपासून व्हिपचा मेसेज पक्ष कार्यालातील कर्मचाऱ्याकडून दिला जातो. मी ते मनोज चौगुले या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून पाठवले.
जेठमलानी- हा व्हिप मनोज चौगुलेंच्या व्हॉट्सअपवरून पाठवला होता?
प्रभू- मी मनोज चौगुलेंना सांगितले होते. त्यानुसार त्यांनी तो पाठवला.
जेठमलानी- तुम्ही त्यांचा मोबाईल पाहिला का, की त्यांनी सांगितले आणि तुम्ही मानले?
प्रभू- त्यांनी सांगितले मी मानले.
जेठमलानी- मनोज चौगुलेंचा फोन किंवा त्यांचा फोन त्यांचा इथे साक्षीदार म्हणून उल्लेख नाही. त्यामुळे व्हिपच्या बाबतीत कोणताही मेसेज कुठल्याही आमदाराला पाठवलेला नाही. त्यामुळे हे साफ खोटे आहे.
प्रभू- हे खोटे आहे.
जेठमलानी- तुम्ही खोटे बोलता, म्हणूनच मनोज चौगुलेंना इथे साक्षीदार बनवलेले नाही. कारण व्हिपचा कुठलाही मेसेज कधी पाठवलाच नव्हता.
प्रभू- जे मी पाठवले, ते रेकॉर्डवर आहे.

जेठमलानी- व्हिप नेमका कशासाठी बजावतात? मिटिंगसाठी की वोटिंगसाठी? बैठकीच्या अजेंड्यात त्याचा उल्लेख होता का? कागदावर दाखवा. त्या रात्री अचानक मिटिंग बोलावण्यामागे काय कारण होते, याची नोंद आहे का?
प्रभू- असे कारण पक्षादेशात कुठेच नमूद नसते. केवळ बैठकीचा आदेश असतो. व्हिप दोन प्रकारचे असतात. एक मतदानाचा असतो, एक बैठकीचा असतो. हा बैठकीचा होता.
जेठमलानी- तुम्ही व्हिपबाबत खोटी कागदपत्रे सादर केली आहेत. इथे आणि सर्वोच्च न्यायालयातही…
प्रभू- मी संविधानाची शपथ घेऊन सांगतो, मी बोलतो ते सत्य आहे.
जेठमलानी- तुम्ही सादर केलेली कागदपत्रे कोणी तयार केली?
प्रभू- ती पक्ष कार्यालयात माझ्यासमोर बनवली गेली.
जेठमलानी- यावर ‘पक्षादेश क्रमांक 2/2022’ हे कोणाचे हस्ताक्षर आहे?
प्रभू- नंबर टाकणे हा कार्यालयीन कामकाजाचा भाग आहे. ते कोणी लिहिले हे मला माहित नाही.
जेठमलानी- तो आकडा किती वाजता टाकला याची माहिती देऊ शकाल का?
प्रभू- वेळ कशी सांगता येणार?
जेठमलानी- तुम्ही ते आदेश किती वाजता दिले?
प्रभू- ज्या क्षणी व्हिप काढण्याचा आदेश दिला, त्यावेळी तो नंबर टाकून सही केली गेली. हा कार्यालयीन कामकाजाचा भाग आहे.
जेठमलानी- त्यावरच्या सह्या कधी घेतल्या गेल्या?
प्रभू- व्हिप दिला तेव्हा घेतल्या.
जेठमलानी- ही त्यांनीच तयार केलेली कागदपत्रे आहेत, जी सर्वोच्च न्यायालयात सादर केली आहेत. मग आज ती त्यांनाच का ओळखता येत नाहीत?
प्रभू- सदस्य उपलब्ध झाले तेव्हा सह्या घेतल्या.
जेठमलानी- अपात्रता याचिकेतील कागदपत्रांची हीच मूळ प्रत आहे का?
प्रभू- होय, ही एकच ओरिजनल कॉपी आहे.
जेठमलानी- ती तारीख कोणी टाकली?
प्रभू- तारीख कार्यालयीन कर्मचाऱ्याने टाकली. ते मी कसे सांगणार?
जेठमलानी- अपात्रता याचिकेच्या मूळ प्रतीची ही कॉपी योग्य आहे का?
प्रभू- ती कॉपी आहे, अचूक आहे की नाही. हे मी कसे सांगणार?
जेठमलानी- तुम्ही सर्वोच्च न्यायालयात आणि इथे या कॉपीची शहानिशा केली नाही का? इथेच पाणी मुरते…
प्रभू- जे कागद माझ्याकडे उपलब्ध होते ते मी सादर केले आहेत.
जेठमलानी- तुम्हाला ही कागदपत्रे मराठीत समजावली गेली, त्यामुळे हीच मूळप्रत आहे हे तुम्ही कोर्टात मान्य केले का?
प्रभू- मला आठवत नाही.
जेठमलानी- हे सर्व कागदपत्रांच्या बाबतीत तुमच्यासाठी लागू होते का?
प्रभू- नाही.
जेठमलानी- हाताने लिहिलेली तारीख अपात्रता याचिकेच्या मूळ प्रतीच्या कॉपीवर कुठेही लिहिलेली नाही.
प्रभू- होय, मी ते बघतोय. झेरॉक्स करताना ती कदाचित आली नसावी.
जेठमलानी- याचे कारण ती तारीख नंतर टाकली आहे. ठराव जो तयार केला तो कोणी तयार केला?
प्रभू- वर्षा बंगल्यावर आमदारांची बैठक बोलवली होती. त्या बैठकीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. आमदार उपस्थितीचे कागदपत्र अध्यक्षांकडे सादर केले. उपस्थित असलेल्या सर्व आमदारांनी आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहोत असे सांगितले आणि त्यावेळी ठराव मांडला.
जेठमलानी- हा ठराव कोणी तयार केला? 21 जूनला कोणत्या व्यक्तीने हा ठराव तयार केला?
प्रभू- हा एक प्रक्रियेचा भाग आहे. ज्यांनी अनुमोदन दिले त्यांच्या सह्या त्यावर आहेत.
जेठमलानी- कोणी अशी व्यक्ती आहे का ज्यांनी हा ठराव मांडला?
प्रभू- रवींद्र वायकर यांनी ठराव मांडला.
जेठमलानी- डॉक्युमेंटमध्ये उदय सामंत, दादा भुसे, संजय राठोड यांनी अनुमोदन दिले असे तुम्ही म्हणता. पण कथित ठरावात त्यांनी अनुमोदन दिलेले नाही.
प्रभू- त्यांनी या ठरावावर माझ्यासमोर सह्या केल्या आहेत.
जेठमलानी- उदय सामंत, संजय राठोड, दादा भुसे यांच्या त्या सह्या नाहीत.
प्रभू- हे खोटे आहे.
जेठमलानी- या बनावट सह्यासाठी तुम्ही जबाबदार आहात?
अध्यक्ष- त्या बनावट सह्या असतील तर त्याला आपण जबाबदार आहात.
प्रभू- तुम्ही मला गुन्हेगार बनवत आहात, मी खोटे कसे बोलेन.
जेठमलानी- 21 जूनच्या कथित बैठकीत असा कुठलाही ठराव पारित झाला नाही.
प्रभू- 21 जूनला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आमदारांच्या बैठकीत हा ठराव पास झाला.
जेठमलानी- 21 जूनच्या कथित बैठकीत दादा भुसे, उदय सामंत आणि संजय राठोड यांना सह्या करताना उद्धव ठाकरे यांनी पाहिले का?
प्रभू- मी प्रत्यक्ष सह्या करताना पाहिले. उद्धव ठाकरे यांनी पाहिले. ते या बैठकीचे अध्यक्ष होते.
जेठमलानी- ही कथित बैठक कोणत्या वेळेपासून कोणत्या वेळेपर्यंत चालली?
प्रभू- दुपारी साडेबारा ते साडेचारपर्यंत बैठक चालली.
जेठमलानी- 21 जूनला एकनाथ शिंदे यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला जात होता. उद्धव ठाकरे यांनी यासाठी मध्यस्थ पाठविले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना त्यांच्या पदावरून हटविण्याबाबतचा ठराव 21 जूनला होऊ शकला नाही?
प्रभू- उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि त्यात ठराव पास करण्यात आला.
जेठमलानी- आपण प्रतिज्ञापत्रात म्हणता की दादा भुसे आणि संजय राठोड बैठकीला हजर होते. मात्र सर्वोच्च न्यायालयात तुम्ही प्रतिज्ञापत्रात असे म्हटले आहे की हे दोघे गैरहजर होते. या आपल्या परस्परविरोधी विधानाबद्दल तुम्हाला काय म्हणायचे आहे?
प्रभू- हे रेकॉर्डवर आहे. त्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही सुनावणी 18 दिवस चालणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सुनावणीच्या तारखा दोन्ही गटासमोर वाचून दाखवल्या. या प्रकरणाची सुनावणी नागपूरमध्येही होणार आहे. त्यानंतर अध्यक्षांनी सुनावणीचे वेळापत्रक जाहीर केले. यापुढील सुनावणी 28, 29 आणि 30 नोव्हेंबर, त्यानंतर 1, 2, 5, 6 आणि 7 डिसेंबर, नंतर 11 ते 15 डिसेंबर आणि 18 ते 22 डिसेंबर, अशी होणार आहे.