Details
मुंबईत काँग्रेसला विजयाची आशा
21-Dec-2018
| 0
”
जगदीश भोवड
jagdish.bhovad@gmail.com
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे देशभरासह मुंबईमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे पानिपत झाले होते. मुंबईच्या सहाही लोकसभा मतदारसंघात भाजपा-शिवसेना युतीने बाजी मारली होती. मात्र आता राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन महत्त्वाच्या राज्यांमध्ये सत्ताधारी भाजपाला पराभूत करण्यात काँग्रेसला यश आल्यामुळे मोदी लाट संपल्याच्या भावनेने मुंबईतील काँग्रेसच्या अनेक नेत्यांमध्ये विजयाच्या अपेक्षेने ऊर्मी संचारली आहे. परिणामी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी आतापासूनच स्पर्धा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबईचाच विचार करायचा झाला तर मुंबईमध्ये लोकसभेचे एकंदर सहा मतदारसंघ आहेत. २०१४ मध्ये मोदी यांच्या लाटेमध्ये सहाही मतदारसंघांमध्ये शिवसेना-भाजपा युतीने विजय मिळवला होता. मात्र त्याआधी २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे मिलिंद देवरा, एकनाथ गायकवाड, प्रिया दत्त, संजय निरूपम, गुरूदास कामत आणि राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील हे निवडून आले होते. २००९ मध्ये शिवसेना-भाजपा युतीला लोकसभेची एकही जागा जिंकता आली नव्हती. २०१४ मध्ये ही स्थिती पूर्णपणे पालटली आणि शिवसेनेचे तीन व भाजपाचे तीन, असे सहाही उमेदवार निवडून आले होते. शिवसेनेचे अरविंद सावंत, राहुल शेवाळे आणि गजानन कीर्तिकर तर भाजपाचे पूनम महाजन, गोपाळ शेट्टी आणि किरीट सोमय्या हे विजयी झाले होते.
काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या गेलेल्या प्रिया दत्त आणि मिलिंद देवरा यांच्या मतदारसंघातही काँग्रेसची डाळ शिजली नव्हती. सुनील दत्त, प्रिया दत्त हे सातत्याने निवडून येत असलेल्या मतदारसंघात प्रिया दत्त यांना नवख्या पूनम महाजन यांनी सहजपणे पराभूत केले होते तर मुरली देवरा, मिलिंद देवरा यांचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी केंद्रात मंत्रीपदावर असलेल्या मिलिंद देवरा यांना पराभूत करण्याची किमया साधली होती. आता मात्र राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणूक निकालांनी काँग्रेसला जणू नवसंजीवनीच प्राप्त झाली आहे. त्यामुळे मुंबईच्या सहाही लोकसभा मतदारसंघांत इच्छुक उमेदवारांची संख्या वाढताना दिसत आहे.
काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त पराभूत झाल्यानंतर बराच काळ राजकारणापासून दूर होत्या. मध्यंतरी त्यांनी राजीनामा दिल्याचीही चर्चा होती़. मात्र, अलीकडे त्या पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्याचे सांगण्यात येते. त्याचबरोबर त्यांच्या उत्तरमध्य मुंबईतील मतदारसंघामध्येच काँग्रेसच्या इतर नेत्यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामध्ये मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह तसेच अभिनेत्री नगमा यांची नावे चर्चेत आहेत. कृपाशंकर सिंह यांनी लोकसभेतील काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी चर्चा केली असून लवकर निर्णय घेतला तर तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल, या दृष्टीने त्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झालेली असल्यामुळे ईशान्य मुंबई राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार आहे. तेथे पुन्हा संजय दिना पाटील हेच मैदानात असतील़ तसेच प्रिया दत्त यांचा मतदारसंघही राष्ट्रवादीने मागितला आहे. मात्र राष्ट्रवादी या मतदारसंघात कुणाला उतरवणार आहे, हे अद्याप उघड झालेले नाही. त्याचप्रमाणे काँग्रेसमध्ये मिलिंद देवरा, एकनाथ गायकवाड, संजय निरूपम, प्रिया दत्त ही मंडळी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच कृपाशंकर सिंह, अभिनेत्री नगमा यांसारखी अन्य नावेही पुढे येत असल्यामुळे काँग्रेसमध्ये निवडणूक लढवण्यास उत्सुक असलेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये मोदी लाटेचा कोणताही परिणाम दिसणार नाही, असे या नेत्यांना वाटत असल्याने ही मंडळी आतापासूनच मोर्चेबांधणी करीत आहे.”

