Details
एका नव्या कामगार नेत्याचा उदय!
18-Jan-2019
| 0
”
अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
aniketsjoshi@hotmail.com
मुंबई महानगरीची जडण घडणच कामगारांनी केलेली आहे. अनेक छोटेमोठे उद्योग व व्यापार या शहरात होऊ लागले तसे तिथे काम करणाऱ्या चारमान्यांची संख्याही वाढू लागली. बाजारातील सामान वाहून नेणारे माथाडी कमगार आले. गोदीत काम करणारे कामगार आले. गिरणी कामगारांची संख्या तर एकेकाळी इतकी मोठी होती की या कामगारांनी संप पुकराला की मुंबई ठप्प होऊन जाणार हे ठरलेले होते. श्रीपाद अमृत डांगेंसारख्या विद्वानांपासून ते डॉ. दत्ता समंतांसारख्या धडाडीच्या नेत्यापर्यंत या शहराने अनेक कामगार नेते पाहिले. गिरणी कामगार, महापालिकेचा कामगार, विविध छोट्यामोठ्या कारखान्यांमध्ये काम करणारा कामगार, गोदीतील कामगार या साऱ्यांचे अनेक लढेही मुंबई महानगराने गेल्या काळात पाहिले, अनुभवले. या नेत्यांनी घडवलेले मोठमोठे संप, आंदोलनेही शहराने पाहिली.
डॉ. दत्ता सामंतांनी या शहरावर एकेकाळी राज्य केले म्हटले तरी चालेल. कारखान्यातील कामगार असो वा गिरणीतील कामगार, त्याला एकच नेता हवा होता. ते नेतृत्त्व होते डॉक्टरांचेच. त्यांनी संपाची हाक दिली म्हटले की दोन-तीन महिन्यांची निश्चिती. कामगारांनी घरात धान्य, रेशन भरून घ्यावे आणि मगच माझ्याकडे यावे असे डॉक्टर स्पष्ट सांगतच असत. तरीही कामगारांना त्यंच्याच नेतृत्त्वाखाली संप कऱण्याची जिद्द असे. त्याआधी मुंबईवर राज्य करणारा मोठा नेता होता जॉर्ज फर्नांडिस आणि जॉर्ज ज्या समाजवादी विचारांची परंपरा सांगत, त्याचेच एक पाईक होते म्युन्सिपल कामगारांचे नेते शरद राव. टॅक्सीवाले, रिक्षावाले, मुंबई महापालिकेचे कामगार, कर्मचारी यांच्या संघटनांमध्ये शरद रावांची हुकूमत होती. त्यांचा हा लढाऊ बाणाच त्यांच्यानंतर त्यांच्या मुलाने चालू ठेवला आहे. त्याचा दणदणित प्रत्यय परवाच्या बेस्टच्या ऐतिहासिक संपाने दिला. शशांक राव हे ४६ वर्षांचे. पण पोरसवदा भासणारे कामगार नेते. वडील शरद रावांच्या तालमीत ते तयार झाले. पण वडिलांच्या निधनानंतर २०१६ पासून ते विविध संघटनांचे सरचिटणीस म्हणजेच प्रमुख नेते बनले. त्यांनी २०१७ मध्ये टॅक्सीवाल्यांच्या संपात यशस्वीरीत्या दरवाढ करून घेतली व आपल्या नेतृत्त्वाचा प्रत्यय दिला होता. पण महापालिका कामगारांमध्ये शशांक राव यांना विरोध झाला. २०१६ मध्ये शरद रावांच्या निधनानंतर शशांक राव यांची सरचिटणीसपदावर नेमणूक करायला रावांच्या जुन्या काही सहकाऱ्यांचाच विरोध होता. शरदरावांच्या जुन्या सहकाऱ्यांना शशांक यांचे नेतृत्त्व मान्य नव्हते. पण बेस्ट कमगारांचा जो यशस्वी लढा त्यांनी दिला आणि मोठ्या मागण्या पदरात पडून घेतल्या त्यामुळे एका नव्या खणखणित नेत्याचा उदय मुंबईत झाला याची द्वीही फिरली आहे.
कामगार नेते शरद राव यांच्या निधनानंतर बेस्ट कामगारांचा हा पहिलाच मोठा संप. त्यामुळे हा लढा किती काळ टिकेल, याबाबत साशंकता व्यक्त होत होती. शशांक राव यांच्या नेतृत्त्वाला त्यांच्या वडिलांच्या सहकाऱ्यांनी नाकारल्यामुळे हा संप त्यांना कामगार चळवळीतून नामशेष करेल, असा दावा केला जात होता. मात्र, बेस्ट कृती समितीच्या माध्यमातून सर्वच कामगार संघटना एकत्रित आल्याने, शशांक राव यांच्या लढ्याला बळ मिळाले. कामगारांच्या या एकजुटीचा दबाव वाढत गेल्यामुळे बेस्ट कामगारांच्या मागण्या मान्य झाल्या आणि पहिल्याच लढ्यात शशांक राव यांनी आपले अस्तित्व निर्माण केले. त्यांनी संप पुकारताच दुसऱ्या दिवशी शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेने प्रशासनाबरोबर चर्चा केल्या व मागण्या मान्य होत आहेत असे सांगत संपामधून सेना बाहेर पडत आहे असे जाहीर केले. पण हे नेते चांगलेच तोंडघशी पडले. बेस्ट कामगार सेनेचे ११ हजार सदस्य होते. म्हणजे एकूण कामगारांपैकी सुमारे २५ टक्के कामगार सेना युनियनचे सदस्य असल्याचा दावा शिवसेनेने केला होता. पण एकही कामगार संप सोडून बाहेर पडला नाही आणि सेनावाले एकही बस रस्त्यावर आणू शकले नाहीत. त्यामधून बेस्ट कमगारांची एकता तर दिसलीच, पण शशांक राव यांच्यावरील कामगारांचा विश्वासही व्यक्त झाला.
कामगार नेते शरद राव यांच्या नेतृत्त्वाखाली अनेक संप झाले. मुंबईतीलच नव्हे, तर देश पातळीवरील अनेक संघटनांमध्ये त्यांचा यशस्वी सहभाग होता. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र शशांक राव यांनी सर्व संघटनांचा कारभार आपल्या हाती घेतला. परदेशातून उच्चशिक्षण घेऊन आलेले शशांक राव यांनी वडिलांबरोबर काही सभा, आंदोलन जवळून पाहिली. मात्र, अनुभव तोकडा असल्याने त्यांचे नेतृत्त्व ज्येष्ठ नेत्यांनी स्वीकारले नाही आणि म्युनिसिपल मजदूर युनियनमधून त्यांना दूर करण्यात आले. त्यामुळे बेस्टचा संप हा राव आणि बेस्ट उपक्रमालाही संपविणार, असा काहींचा अंदाज होता. बेस्ट प्रशासनाने केलेली कारवाई, पालिका प्रशासनाची ताठर भूमिका आणि शिवसेनेची संपातून माघार या घडामोडींमुळे राव यांच्यावर संप मागे घेण्याचा दबाव वाढू लागला. राव यांचे बोलविते धनी दुसरेच असल्याचेही बोलले जात होते. त्याचवेळी कामगारांची एकजूट, प्रतिस्पर्धी पक्षाकडून मिळणारा पाठिंबा आणि मनपातील पहारेकऱ्यांचे मौन यामुळे राव यांचे आंदोलन यशस्वी ठरले. आता मुंबईच्या कामगार चळवळीत शशांक राव यांचा आवाज घुमला आहे! राव यांनी या चळवळीत आपला दबदबा निर्माण केला आहे. जुन्या कामगार नेत्यांच्या तुलनेत शशांक राव आपले नेतृत्त्व कसे सिद्ध करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष होते. बेस्टच्या या संपाने शशांक राव यांना कामगार चळवळीत स्वत:चे स्थान निर्माण करण्याएवढी शक्ती दिली आहे.
या संपात बेस्ट कामगारांचा गिरणी कामगार करेल, अशी भीती व्यक्त होत होती. मात्र, दत्ता सामंत यांच्या पुण्यतिथीलाच बेस्ट कामगारांचा संप यशस्वी झाला. मुख्य म्हणजे कामगारांचा कौल घेऊन हा संप पुकारण्यात आला होता. तसेच प्रत्येक निर्णय कामगार मेळाव्यात घेण्यात आल्याने कामगारांचा विश्वास वाढत गेला. त्यामुळे हाच फॉर्म्युला आता महापालिकेतही अंमलात येणार आहे. बेस्टमधील अन्य संघटनेचे सभासदही बेस्ट वर्कर्स युनियनकडे वळले. त्यामुळे महापालिकेतील आणि इतर संघटनेतील सभासदही शशांक राव यांची ताकद वाढवतील. बेस्ट कामगार कर्मचाऱ्यांच्या हा संप सलग नऊ दिवस चालला हे आणखी विशेष. याआधी दोन-तीन दिवसांचे संप झाले आहेत. या संपातील न्यायालयातील लढाईदेखील महत्वाची आहे. कधी न्यायालयाने सरकारला, मनपाला व कधी युनियनलाही चांगलंच खडसावलं. त्यांनी रावांना बजावले की ‘तुमच्या मागण्या रास्त असल्या तरी त्यासाठी सामान्यांना वेठीस धरू नका. या संपावर राज्य सरकार आणि युनियननं तोडगा काढावा. त्यात ते अपयशी ठरले तर आम्ही मंगळवारी योग्य तो आदेश देऊ,’ अशा शब्दांत उच्च न्यायालयानं संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांना आणि सरकारला सुनावलं. उच्च न्यायालयानं सरकारनं नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकांचे अहवालही घेतले. त्यावर मते व्यक्त केली. सगळे अहवाल वेळोवेळी न्यायालयात सादर करण्याचे निर्देश महाअधिवक्त्यांना दिले. संपावर जर तोडगा निघणार नसेल तर न्यायालयाला आदेश द्यावे लागतील हे न्यायालयाने संबंधितांना बजावले. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल उच्च न्यायालयात सुनावणी दीर्घकाळ झाली. ही संपाची स्थिती कायम राहू शकत नाही, असं मुख्य न्या. नरेश पाटील व न्या. एन. एम. जामदार यांच्या खंडपीठानं बजावले. अखेरीस तोडगा निघाला. साधारणतः प्रत्येक कमगाराला सात हजार रुपयांची पगारवाढ व संपकाळातली गैरहजेरीबद्दल कोणतीही करवाई नाही तसेच तीन महिन्यात लावादातर्फे मागण्यांचा विचार व निर्णय या मुद्द्यावर विजय मिळवत शशांक राव यांनी नेतृत्त्व केलेला बेस्टचा संप समाप्त झाला.”

