HomeArchiveडोंबिवलीत भाजपाची मान...

डोंबिवलीत भाजपाची मान खाली!

Details
डोंबिवलीत भाजपाची मान खाली!

    19-Jan-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
shail.dinman@gmail.com
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोरम या पाचही राज्यांतील विधानसभा निवडणुकांमधून आगामी लोकसभेचा कल कळेल असे सांगितले जात होते. गेल्या महिन्यात या राज्यांत जे निकाल लागले त्यातून मतदारांचा कल बदलतोय एवढे तरी नक्कीच कळले आहे. जे सगळ्यांना कळले ते भाजपाला आधीच कळले असणार हे उघड आहे. भाजपाने या निवडणुकांच्या आगेमागेच राज्या-राज्यांत आगामी निवडणुकांच्या दृष्टीने चाचपणी केली होती. त्याचा अहवालही भाजपाच्या वरिष्ठ सूत्रांकडे पोहोचला आहे. भाजपाच्या केंद्रीय पातळीवर आणि संघटनात्मक स्तरावर हालचाली सुरूही झाल्या आहेत.

मतदारांचा कौल बदलण्यासाठी अनेक खटाटोप सुरू आहेत. त्यातीलच एक कार्ड म्हणून राम मंदिराचा मुद्दा जाणीवपूर्वक पुढे आणण्यात आला आहे. राम मंदिराचे प्रकरण न्यायप्रविष्ट असले तरी भाजपाचे सर्वच वरिष्ठ सक्रीय नेते त्याबद्दल प्रतिक्रिया देत आहेत. उलटसुलट चर्चा सुरू आहे. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या ऐतिहासिक मुलाखतीत या प्रश्नावर, न्यायालयात काय ते ठरेल, अध्यादेशाची गरज नाही, असे सांगत हा मुद्दा कळीचा ठरवण्याचे प्रयत्न केले. त्याचवेळी विधानसभा निवडणुकांतील भाजपाच्या कामगिरीकडे त्यांनी एका वेगळ्याच नजरेतून पाहिले आणि गिरे तो भी उपर.. उक्तीनुसार भाजपाच कशी या लढतीत सरस ठरली होती, याचे विश्लेषणही केले.

मोदी सध्या भाजपाचे कर्णधार आहेत. कर्णधाराला आपल्या टीमचा धीर वाढवावाच लागतो. त्यानुसारच ते वागले आणि बोलले. आजही मोदींइतके दुसरे खणखणीत नाणे भाजपाकडे नाही. आगामी लोकसभा मोदींच्याच नावावर भाजपाकडून लढवली जाणार हे उघड आहे. अशा परिस्थितीत मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये जे काही झाले त्याचे पडसाद लोकसभा निवडणुकीत उमटणार याची अटकळ मोदींनाही आहे आणि भाजपालाही आहे. उत्तर भारतात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत. त्यामुळे तेथील निकालांवर भाजपाचे पुनरपी सत्ताग्रहणाचे स्वप्न अवलंबून असेल. गेल्या लोकसभा निवडणुकांत भाजपाला सर्वाधिक जागा उत्तर भारतातच मिळाल्या होत्या आणि त्याआधारेच केंद्रात सत्ता स्थापन करणे शक्य झाले होते. आता याच राज्यांमधील मतदारांनी वेगळाच कौल दिल्यानंतर भाजपाच्या थिंकटँकने याबाबत काहीतरी आखणी नक्कीच केली असणार.

या राज्यांत विजय मिळवून देणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे नेतृत्त्व या निवडणुकांमुळे सिद्ध झाले आहे. राहुल गांधी यांना लिंबुटिंबू म्हणून हिणवणे भाजपाला महागात पडल्यानंतर आता संपूर्णपणे वेगळ्या स्तरावर भाजपाकडून लोकसभा निवडणुकांची आखणी सुरू झाली आहे. ही आखणी अनेकपदरी असून शकते. निवडणुकांच्या आखाड्यात माती खायला लागेल अशी शक्यता बळावल्यास सत्ताधारी पक्ष देशप्रेमाच्या भावनांना भरते आणण्यासाठी किंवा निवडणुकाच पुढे ढकलण्यासाठी शेजारी देशाशी एखादा संघर्ष वा सर्जिकल स्ट्राईक घडवून आणू शकतो अशी चर्चा आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावर धार्मिक विद्वेष भडकवून मतांचे ध्रुवीकरण करण्याचे जसे प्रयत्न सुरू आहेत तसेच प्रयत्न काही राज्यांमध्ये वा विशिष्ट भागांमध्ये दंगली घडवून मतांचे विभाजन करण्यासाठीही होऊ शकतात. भारिप नेते एड. प्रकाश आंबेडकर गेले दोन वर्षे ठिकठिकाणी हीच शक्यता बोलून दाखवत आहेत. निवडणुका जवळ येताना आजूबाजूला ज्या घडामोडी घडत आहेत त्याकडे या दृष्टीकोनातून पाहवे लागेल. डोंबिवलीत गुन्हे शाखेच्या कल्याण युनिटने एका दुकानातून नुकताच जो शस्त्रसाठा जप्त केला त्यात भाजपा पदाधिकाऱ्याचे नाव पुढे आले आहे. फॅशनेबल वस्त्रप्रावरणे विकणारे हे तपस्या फॅशन स्टोअर डोंबिवलीचे भाजपा शहर उपाध्यक्ष धनंजय अनंत कुलकर्णी यांच्या मालकीचे आहे. त्यांच्याच दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त व्हावा ही बाब साधीसुधी नाही. पोलिसांनी या धाडीची पहिली बातमी देताना कुलकर्णी यांचा भाजपाशी असलेला संबंध उघड केला नव्हता. पण दुसऱ्याच दिवशी बातमी फुटली. धनंजय कुलकर्णी यांचे रा. स्व. संघाच्या गणवेशातील फोटो झळकले. रवींद्र चव्हाणांबरोबरचे फोटो व्हायरल झाले आणि ते भाजपाचे डोंबिवलीत उपाध्यक्ष आहेत हेही चव्हाट्यावर आले. त्यांच्या दुकानात धारदार सुरे, एअरगन, कोयते, चॉपर अशी कितीतरी हत्यारे सापडली. या हत्यारांची ते या फॅशन स्टोअरमधून विक्री करत होते असे सांगितले जाते. मुळात फॅशन स्टोअरमध्ये शस्त्रसाठा कसा केला, विक्री कशी केली आणि एवढी शस्त्रे कशासाठी जमवली होती याची उत्तरे आता पोलिसांना शोधावी लागणार आहेत.

मी डोंबिवलीकर म्हणत सुसंस्कृत डोंबिवलीचा चेहरामोहरा असणारे रवींद्र चव्हाण या प्रकरणानंतर मौनात गेले आहेत. कुणीही बोलायला तयार नाही. एकूणच भाजपाची मान डोंबिवलीतील या प्रकारामुळे खाली गेली आहे. पोलीसही कुठल्या अनाकलीनय दबावामुळे आता गप्प झाले आहेत. अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, येणाऱ्या काळात या शस्त्रांचा वापर करून भाजपाला कोणत्या दंगली घडवायच्या होत्या, असा जो प्रश्न विचारला आहे त्याचे उत्तर जनतेला मिळायलाच हवे. तीन दिवस उलटल्यावरही या प्रकरणी भाजपाचा एकही नेता, लोकप्रतिनिधी काही बोलायला तयार नाही याचा अर्थ काय निघू शकतो ते भाजपाला वेगळे सांगायची गरज नाही..”
 

Continue reading

बारामतीतला अजितदादांचा उत्तराधिकारी नसणार बिनविरोध?

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांवर आता राजकीय रणधुमाळी उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने विशेषतः बारामतीची निवडणूक 'बिनविरोध' करण्यासाठी आवाहन केले असतानाच, काँग्रेसने राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर ‘मनाचे श्लोक’चा प्रभाव?

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दररोज सकाळच्या परिपाठात समर्थ रामदास स्वामींचे 'मनाचे श्लोक' म्हणणे सक्तीचे करावे, असा प्रस्ताव मुंबई महापालिकेतल्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मांडला आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या बालमनावर चांगले संस्कार घडवण्यासाठी हा प्रस्ताव आहे, असे पेडणेकर यांचे म्हणणे आहे....

विमानप्रवास महागला! कृषी क्षेत्रालाही फटका!! निर्यात रोडावणार!!!

पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धस्थितीचा थेट परिणाम आता सामान्य प्रवाशांच्या खिशावर दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने विमान इंधन (एटीएफ) दरात मोठी उसळी आली असून, त्याचा परिणाम म्हणून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांचे दर लक्षणीयरीत्या...
Skip to content