HomeArchiveकाय पण करा!...

काय पण करा! पण, मोठा भाऊ म्हणा!!

Details
“काय पण करा! पण, मोठा भाऊ म्हणा!!”

    30-Jan-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
shail.dinman@gmail.com
युतीचे रहस्यरंजन मागील पानावरून पुढे सुरू आहे. रहस्यरंजन म्हणजे युती होईल की नाही याबद्दलची वायफळ चर्चा आणि त्यामुळे होणारे रंजन. रंजन लोकांचे नाही, कारण लोकांचा या रहस्यातील रस कधीच संपला आहे. पण तरीही चर्चा सुरू आहे आणि त्यामुळेच रंजन होत आहे ते युतीचे मेलेले कोंबडे जिवंत आहे असे दाखवू पाहणाऱ्या शिवसेना आणि भाजपामधील नेत्यांचे. युतीबद्दल प्रत्येकाची अटकळ आहे आणि प्रत्येकाचे आडाखे, अंदाज-हिशेब आहेत. त्या त्या हिशेबांनुसार नेत्यांची ठरलेली वक्तव्ये सुरू आहेत. पडद्यामागे वेगळेच सुरू आहे आणि पडद्यासमोर येणारी पात्रे मात्र त्यांना सांगितलेले संवाद पाठ केल्यासारखे घडाघडा बोलून विंगेत जात आहेत.

अगदी कालपर्यंत युतीचे घोडे गंगेत न्हाणार की नाही याबद्दल साशंकता वाटत होती. शिवसेनेने लगाम ताणून धरल्याचा आविर्भाव ठेवला होता आणि भाजपा युतीसाठी तळमळते आहे असे वाटत होते. सोमवारी चमत्कार घडल्यासारखी दोन्ही पक्षांची, त्यांच्या नेत्यांची भाषा बदलली. आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय कार्यकारिणीतच घेतला आहे, त्यापासून मागे हटणार नाही, आम्ही मुंडावळ्या बांधून बसलेलो नाही, अशी भाषा करणाऱ्या शिवसेना नेत्यांनी एकदम पलटी खाल्ली. काय पण करा, पण मोठा भाऊ म्हणा.. अशी भाषा आता सुरू झाली आहे. युती नाहीच, आमचे आम्ही, अशी राणा भीमदेवी थाटात गर्जना करणारे शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊतच आता मोठे भाऊ होतो आणि राहू.. असे म्हणायला लागले आहेत. हे मोठा भाऊ, छोटा भाऊ यांचे नाटक २०१४ मध्ये सत्तांतर झाल्यापासून दोन्ही पक्षांमध्ये सुरू आहे. जनता गेली काही वर्षे हे नाटक पाहून कंटाळली आहे. दोन्ही पक्ष पुन्हा सत्तेवर येण्यासाठी आतुरले आहेत आणि परस्परांना हात दिल्याशिवाय सत्तेचे सिंहासन दुर्लभ आहे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही जाणतात. आघाडीचे काही खरे नसले तरी युतीतील बेबनावात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची खिचडी शिजू शकते. यामुळेच निवडणुकीचे ढोल स्पष्टपणे कानावर येऊ लागल्यावर युतीसाठी हाकारे-उतारे सुरू झाले आहेत.

मोठा भाऊ होतो आणि राहू.. म्हणत शिवसेनेने पुन्हा एकदा माघार घेतली आहे. गेल्या दोन दिवसांतील घडामोडींवर नजर टाकली तर, उद्धव ठाकरे यांनी सेना खासदारांशी चर्चा केल्यावर आणि काही निवडक मंडळींचे मत ऐकल्यावर शिवसेनेची ही भूमिका जाणवण्याइतपत बदलली आहे. शिवसेनाच मोठा भाऊ होता आणि राहू.. हे म्हणणे म्हणजे युतीसाठी अप्रत्यक्ष मान डोलावणे हेच आहे. काही करा पण, आम्हाला मोठा भाऊच म्हणा, असा हा शिवसेनेचा बालहट्ट आहे. निवडणुकांमधील घमासान आणि इतर राज्यांतील गडबड लक्षात घेता भाजपाला तो पुरवावा लागेल असे दिसते. शिवसेनेला निवडणुकीपुरता मोठा भाऊ म्हणणे भाजपा मान्य करू शकते. युतीसाठी आम्ही लाचार नाही, पण तयार आहोत, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न सोमवारीच केला. चोरांच्या हाती सत्तेच्या चाव्या जाऊ नयेत… पाकिस्तानधार्जीणे.. ज्यांना हिंदुत्व हवे आहे, ही फडणवीस यांची भाषा शिवसेनेला युती करणे आणि एक पाऊल मागे घेणे फार अवघड वाटू नये यासाठीच आहे. राज्यात मोठ्या भावाचे स्थान आणि भाजपाकडून सन्मानाची वागणूक असा आग्रह शिवसेना धऱत असली तरी प्रत्यक्षात मुख्यमंत्रीपद, लोकसभा आणि विधानसभेसाठी एकत्रित जागावाटपाचे सूत्र हे शिवसेनेला पदरात पाडून घ्यायचे आहे हे आता लपून राहिलेले नाही. भाजपा हे मान्य करील असे सध्या तरी वाटत नाही. दोन्ही पक्षांचे नेते, युतीचा प्रस्ताव अद्याप तरी आमच्याकडे आलेला नाही, असे म्हणत आहेत.

युतीची वाटचाल २०१४ पासून तणावपूर्णच राहिली आहे. भाजपाने विधानसभेच्या अधिक जागा जिंकल्या असताना यावेळी आम्हाला अधिक जागा हव्यात ही शिवसेनेची मागणी भाजपा सहजी मान्य करणार नाही. कारण शिवसेनेत जशी स्वबळाची सुरसुरी आहे तशीच भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्येही आहे. २०१४ च्या प्रमाणातच जागावाटप व्हावे अशी भाजपाची भूमिका आहे. मुख्यमंत्रीपदही शिवसेनेकडे देण्याची भाजपाची तयारी नाही. भिवंडी आणि पालघर जागेसाठीच नव्हे तर एकूणच जागा जास्त मिळाव्यात असे शिवसेनेचे प्रयत्न आहेत. लोकसभेसाठी आणि विधानसभेसाठीही भाजपा हे सूत्र मान्य न करता शिवसेनेला नमवण्याचा प्रयत्न करणार हे उघड आहे. त्यासाठी भाजपाकडे आणखी एक अस्त्र आहे. ते म्हणजे शिवसेनेचे लोकप्रतिनिधी फोडण्याचे. शिवसेनेचे काही नेते आधीच भाजपात दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांना भाजपाचे हे डावपेच लक्षात आले आहेत. यामुळेच शिवसेनेची भाषा किंचित मवाळ झाली आहे.”
 

Continue reading

पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित

व्हिक्टोरिया (सेशेल्स) येथे एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा पहिला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्त्वासाठी, विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, सागरी...

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...
Skip to content