Details
पालघरची लढाई कोण जिंकणार?
09-Feb-2019
| 0
”
विनोद साळवी, मुख्य उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान
vinodsalvi1@gmail.com
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना, भाजपा आणि बहुजन विकास आघाडीत झालेली काँटे की टक्कर संपूर्ण महाराष्ट्रभर गाजली होती. पालघरचे हे मैदान काँग्रेसमधून भाजपात ऐनवेळी आयात झालेल्या राजेंद्र गावित यांनी मारले होते. भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे झालेली ही लढत सहानुभूतीच्या लाटेवर लढली गेली. भाजपाला धोबीपछाड देण्यासाठी शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव झाला होता. त्यामुळे पालघर लोकसभेची लढत ‘मिशन 2019’ साठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
पालघर हा महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक. या मतदारसंघात पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा, वसई या मतदारसंघांचा यात अंतर्भाव होतो. 2009 मध्ये बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी भाजपाच्या चिंतामण वनगा यांचा पराभव केला होता. 2009च्या लोकसभा निवडणुकीत बळीराम जाधव यांना 2,23, 234 मते मिळाली होती तर चिंतामण वनगा यांना 2,10,874 मते मिळाली होती. काँग्रेसचे दामोदर शिंगडा तिसर्या क्रमांकावर 1,60, 570 मते राखून होते. 2014 मध्ये मात्र पालघर मतदारसंघात सत्तांतर झाले. भाजपाने आपला पारंपरिक गड असलेला पालघर मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला. 2009 मध्ये बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांच्याकडून मात खाल्लेल्या चिंतामण वनगा यांनी 2014 मध्ये मात्र अनपेक्षित कामगिरी करत 5,33,201 मते मिळवून विजय मिळवला होता. यावेळी त्यांनी बळीराम जाधव यांना धूळ चारली होती. बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना या निवडणुकीत 2,93,681 मते मिळाली होती. 2014 मध्ये मात्र काँग्रेसने या भागातून आपला उमेदवार दिला नव्हता. किंबहुना काँग्रेसने आपली शक्ती बहुजन विकास आघाडीच्या मागे उभी केली होती. 2014 च्या मोदी लाटेत या भागात ताकद असलेल्या बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारालाही किनार्याला लावले होते.
हा सर्व इतिहास नव्हे तर संदर्भ 28 मे 2018 च्या पोटनिवडणुकीच्या लढतीमागे आहे. राज्यात व केंद्रात मांडीला मांडी लावून सत्तेत बसलेल्या भाजपा-शिवसेनेत नेमके काय बिनसले. दोघांतील खुन्नस, ठस्सन पालघर पोटनिवडणुकीत कशी वाढत गेली. मैदान जिंकण्यासाठी साम-दाम-दंड भेद नीती आणि त्याहीपुढे मनीपॉवरही इथे कशी आजमावली गेली. भाजपाने चिंतामण वनगा यांचा मुलगा श्रीनिवास यांची केलेली अवहेलना शिवसेनेेने ‘कॅश’ केली होती. भाजपाने रातोरात काँग्रेसच्या राजेंद्र गावित यांना आपल्या कंपूत घेऊन त्यांची उमेदवारी घोषित केली. त्यामुळे भाजपा-शिवसेनेतील पालघरयुद्ध शिगेला पोहोचले होते. हीच युद्धनीती शिवसेना-भाजपा वेगळे लढल्यास पुन्हा पालघरच्या मैदानात पाहयला मिळणार एवढे मात्र नक्की.
आता पालघरच्या मैदानात येत्या 11 फेब्रुवारी रोजी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली बहुजन वंचित आघाडीचे वादळ घोंगावणार आहे. त्यामुळे पालघरमध्ये होणार्या तिरंगी, चौरंगी सामन्याकडे महाराष्ट्राचे नव्हे तर अवघ्या देशाचे लक्ष असणार आहे. ही लढाई स्थानिक, संस्थानिक असलेल्या बहुजन विकास आघाडीसाठीही महत्त्वपूर्ण नव्हे तर प्रतिष्ठेची असणार आहे. पोटनिवडणुकीत एकाकी लढूनही भरघोस मताधिक्य मिळवणार्या बहुजन विकास आघाडीला आगामी निवडणुकीत वंचित आघाडीचे बळ मिळाल्यास शिवसेना-भाजपा आणि काँग्रेसलाही घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या दोन दिवस आधी केवळ एक-दोन मोठ्या सभा वगळता बहुजन विकास आघाडीने पोटनिवडणुकीच्या प्रचारात हात आखडताच घेतला होता. 2018 च्या लोकसभा पोटनिवडणुकीतील लढतीमुळे भाजपा-शिवसेनेची महत्त्वाकांक्षा वाढवली आहे. भाजपाच्या विजयामुळे पारंपरिक मतदारसंघ पुन्हा ताब्यात आला असला तरी 2019 मध्ये त्यांना तो आपल्या ताब्यात ठेवण्याचे ‘शिवधनुष्य’ पेलावे लागणार आहे. शिवसेनेने तर श्रीनिवास वनगा यांना पराजयानंतर याच मतदारसंघातून त्यांना खासदार करणारच, असे वचन दिले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपा-शिवसेनेत युती झाल्यास पालघर मतदारसंघाबाबत नेमक्या काय वाटाघाटी, होणार हेही महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपाला हा मतदारसंघ सोडावा तर शिवसेनेने श्रीनिवास यांना दिलेल्या वचनाचे काय? आणि शिवसेनेला हा मतदारसंघ सोडावा तर भाजपाच्या अहंकाराचे काय? हा पेच दोन्हींकडे आहेच. स्वाभिमान दुखावलेला बहुजन विकास आघाडी व काँग्रेसची भूमिका काय असेल, यालाही महत्त्व आहेच. त्यामुळे पालघरमध्ये शिट्टी वाजणार, कमळ फुलणार की धनुष्यबाण अचूक वेध घेणार, ही चर्चा लोकसभा निवडणुकीसाठी तारिख जाहीर होण्याआधीपासूनच सुरू झाली आहे.”

