Details
भाजपच्या राजकारणात जगताप यांचे काय?
15-Mar-2019
| 0
”
विजय भोसले, मुख्य वार्ताहर, केसरी
bhosale.vijay53@ gmail.com
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून विलास मडिगेरी यांच्या नावावर राजकारण झाले. मात्र, या राजकारणात भाजपचे वरिष्ठ पातळीवरील नेते, त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील पदाधिकारी यांनी ज्या पद्धतीने मडिगेरींच्या नावाला अंतस्थ पाठिंबा देऊन भाजपमधील भल्याभल्यांना एव्हढेच नव्हे तर निष्ठावंत, निष्ठावंत म्हणून जप करणाऱ्यांनाही चपराक देऊन मडिगेरी यांनाच या पदावर बसविले. विशेष म्हणजे महापालिकेच्या ३६ वर्षांच्या इतिहासात प्रथमच ब्राह्मण स्थायी समितीचा अध्यक्ष झाला. यालाही मोठे महत्त्व आहे. एकंदरीतच मडिगेरी यांच्या निवडीने भाजपमध्ये अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्या तरी भाजपच्या राजकारणात लक्ष्मण जगताप यांचे काय हे येणारा काळच ठरवेल.
तीन महिन्यांपासूनच मडिगेरी यांनी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्री यांना विश्वास दिला होता. त्यांनीही तुम्ही निर्धास्त राहा असे सांगितल्यामुळे मडिगेरी यांनी कुठेही धावाधाव केली नाही. उलट आ. जगताप यांना शिंदे यांनी शेवटपर्यंत सोडले नाही. अधिवेशनाच्या काळातही मुंबईत त्यांची पाठ सोडली नाही. एव्हढेच काय सलग चार दिवस मडिगेरी यांनी आमदार जगताप यांना मोबाईलवरून एसएमएसद्वारा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, जगताप यांनी त्यांच्याशी संपर्कही साधला नाही. मात्र, भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांना बंड करण्यास भाग पाडले. उमेदवारी बदलेल असा फाजील आत्मविश्वास अनेकांना होता. मात्र, उमेदवारी बदलली नाही. शिंदे व त्यांच्या काही समर्थकांनी नागपूर गाठले. मुख्यमंत्र्यांनी समजूत काढून माघार घ्या आणि पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणा असे बजावले. एव्हढेच नव्हे तर, पदाधिकाऱ्यांचीही चांगलीच कानउघाडणी केली. तर, दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी मडिगेरी यांना चिंता करण्याचे कारण नाही. निवडणूक व्यवस्थित होईल असा मेसेजदेखील पाठवला होता.
पक्षश्रेष्ठींनी अर्ज दाखल करण्याच्या वेळी पक्षाचे निरीक्षक सुजितसिंह ठाकूर यांना पाठवून पक्षनेते एकनाथ पवार व स्थानिक नेत्यांना योग्य त्या सूचना देऊन पक्षादेश बजावला. निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून मडिगेरी यांनी ऐनवेळेस पक्षादेश पोस्टाद्वारे, ई मेल, व्हॉट्सअॅप, प्रत्यक्ष पालिका कर्मचाऱ्यांद्वारे बजावला. ही सर्व खबरदारी घेतल्यामुळे मडिगेरी निश्चिंत होते. दुसऱ्या दिवशी, मतदानाच्या दिवशी ठरल्याप्रमाणे माघारनाट्य झाले आणि अखेर शिंदे यांनी माघार घेतली. राष्ट्रवादीचे मयूर कलाटे यांनी उमेदवारी अर्ज ठेवल्यामुळे मतदान झाले. मडिगेरी यांना १२ तर कलाटे यांना ४ मते मिळाली. मडिगेरी विजयी झाले.
मडिगेरी यांना जगताप यांनी मदत केली हा जो प्रचार केला जात आहे. तो पूर्णत: चुकीचा असून जगताप यांना अर्ज दाखल करण्यापूर्वी दोन तास अगोदर मडिगेरी यांचे नाव समजले. जगताप यांनी मडिगेरी यांच्याशी संपर्क न साधल्यामुळे भाऊ, तुम्ही नाराज आहात का? तुम्ही जर मला माघार घ्या असे सांगत असाल तर मी माघार घेईन असेही मडिगेरी यांनी जगताप यांना सांगितले. मी जरी अध्यक्ष झालो तरी तुम्ही माझे नेते आहात हे तुम्हाला नंतर समजेलच असा विश्वासही त्यांनी दिला. मात्र, काहींनी पक्षश्रेष्ठींकडून शिंदे यांचे नाव आले होते असा प्रचारही केला. वास्तविकत: या संदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधला असता मडिगेरी यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. उमेदवारी दाखल करण्यावेळी काहीही घडू शकते. त्यामुळे, अर्ज दाखल करतानाच स्थानिक पक्षश्रेष्ठींना मडिगेरी यांचे नाव उमेदवारी अर्जावर लिहिण्याच्या सूचना एकनाथ पवार यांना दिल्या होत्या. एकंदरीत या राजकारणात काहीजण पोळी भाजण्याचा प्रयत्न करत होते. तर, काही जण बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. शिंदे यांची लढण्याची तयारी नसताना त्यांना भरीस घातले. दुसऱ्या बाजूला उमेदवार आपणच आहोत याची खात्री असताना जो संयम मडिगेरी यांनी दाखविला तो संयमच अखेर कामी आला. हे असले तरी शेवटी भाजपमध्ये पक्षनिष्ठा हेच महत्त्वाचे असते हे यावरून सिद्ध झाले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात आ. जगताप, आ. लांडगे यांनी एकहाती सत्ता आणली असली तरी, भाजपने मात्र, या दोन्ही स्थानिक नेत्यांना समान अंतरावर ठेवून गेली चार वर्षे राजकीय खेळी खेळल्या. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सदाशिव खाडे यांना प्राधिकरणाचे अध्यक्ष केले. तर, भाजपचे युवा नेते अमित गोरखे यांच्या गळ्यात अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या अध्यक्षपदाची माळ घातली आणि दुसरा दणका या स्थानिक नेत्यांना दिला. आ. जगताप यांना राज्यमंत्रीपद देण्याबाबत भाजपमध्ये निर्णय झाला होता. मात्र, मध्यंतरी शिवसेना आणि भाजपमध्ये तू तू.. मै मै.. सुरू होती. त्यामुळे जगताप यांच्या निवडीला खो बसला. मात्र, ज्या अनधिकृत बांधकामांच्या मुद्दयावरून आमदार जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून भाजपची वाट धरली. त्यानंतरही चार वर्षे अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सुटला असे वारंवार सरकारकडून आश्वासने देऊन या दोन्ही स्थानिक नेत्यांना अडचणीत आणले. नुकत्याच झालेल्या चार दिवसांच्या अंदाजपत्रकीय अधिवेशनात सरकारने अनधिकृत बांधकामांच्या शास्तीकराविषयी जो अध्यादेश काढला, त्यात ६०० चौरस फुटांपर्यंतच शास्तीकर माफ असाच उल्लेख होता. एक हजार चौरस फुटांपर्यंत शास्तीकर माफ केला जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र, अधिवेशनातील गोंधळामुळे ही बाब कोणाच्याच लक्षात आली नाही. त्यामुळे आमदार जगताप यांनी सलग चार दिवस मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना जनतेला दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली आणि एक हजार चौरस फुटांपर्यंत शास्तीकर माफ करण्याचा दुरूस्ती अध्यादेश मुख्यमंत्र्यांकडून करून घेतला. तसे पत्र देऊन त्यांनी जगताप यांना या संदर्भात खूष करण्याचा प्रयत्न झाला.
जगताप यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची असल्याने भाजपनेदेखील शेवटपर्यंत हा मतदारसंघ भाजपला सोडा असा आग्रह लावून धरला. मात्र, शिवसेना हा मतदारसंघ सोडण्यास राजी नाही. मात्र, आता जगताप यांची खरी परीक्षा आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत युतीचे प्रामाणिक काम करून उमेदवार निवडून आणल्यास त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जगताप यांना उमेदवारी देऊन पुन्हा राज्यात भाजपची सत्ता आल्यास जगताप यांना मंत्रीपदाचे गिफ्ट देण्याचे भाजपच्या नेत्यांनी ठरविले आहे. हे असले तरी राजकारणात शेवटपर्यंत काहीही उलथापालथ होऊ शकते. १९८६ पासून ते आजपर्यंत जगताप यांना नशिबाने साथ दिली असल्याने ते सत्तेत राहिले आहेत. यापुढेही त्यांचे नशीब बलवत्तर असेल तर निश्चित सत्तेत राहतील.”

