मुंबई महापालिकेतर्फे मुंबई शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या भांडुप संकुल येथील १९१० दशलक्ष उदंचन केंद्रात दोन १२०० मिलीमीटर व्यासाच्या स्लुईस झडपा बदलण्याचे काम तसेच पिसे-पांजरापूर संकुलातील तृतीय टप्प्याच्या उदंचन केंद्रातील एक नादुरुस्त उदंचन संच काढून त्याठिकाणी राखीव उदंचन संच बसविण्याचे काम होणार असल्यामुळे मंगळवार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत संपूर्ण मुंबईत सुमारे १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.
याशिवाय, पवई येथे १८०० मिलीमीटर व्यासाच्या तानसा पूर्व व तानसा पश्चिम जलवाहिनीवरील गळती रोखण्याचे कामही त्याचदिवशी हाती घेण्यात येत असल्यामुळे मंगळवार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० वाजल्यापासून बुधवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत के/पूर्व, एस, जी/उत्तर व एच/पूर्व या विभागांमधील खालील परिसरात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
१) एस विभाग- फिल्टरपाडा एस एक्स – ०६ – (२४ तास) – जयभिम नगर, बेस्ट नगर, आरे मार्ग आणि परिसर, फिल्टरपाडा.
२) के/पूर्व विभाग- मरोळ बस बार क्षेत्र, केई ०१ – (दुपारी २ ते सायंकाळी ५.३० वाजता) – चकाला, प्रकाश वाडी, गोविंद वाडी, मालपा डोंगरी क्रमांक १ व हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजी नगर, शहीद भगतसिंग वसाहत (भाग), चरत सिंग वसाहत (भाग), मुकुंद रुग्णालय, तांत्रिक विभाग, लेलेवाडी, इंदिरा नगर, मापखान नगर, टाकपाडा, नवपाडा, विमानतळ मार्ग क्षेत्र, चिमटपाडा, सागबाग, मरोळ औद्योगिक क्षेत्र, रामकृष्ण मंदीर मार्ग, जे. बी. नगर, बगरखा मार्ग, कांती नगर.
३) के/पूर्व विभाग- सहार रोड क्षेत्र, केई ०१ – (दुपारी २ ते सायंकाळी ५.३० वाजता) – कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी ऍण्ड टी वसाहत.
४) के/पूर्व विभाग- ओम नगर क्षेत्र, केई ०२ – (पहाटे ४ ते सकाळी ८ वाजता) – ओम नगर, कांती नगर, राजस्थान सोसायटी, साईनगर (तांत्रिक क्षेत्र), सहार गाव, सुतार पाखडी (पाईपलाईन क्षेत्र).
५) के/पूर्व विभाग- एम. आय. डी. सी. व भवानी नगर केई १० – (सकाळी ११ ते दुपारी २ वाजता) – मुलगाव डोंगरी, सुभाष नगर, एम. आय. डी. सी. मार्ग क्रमांक १ ते २३, भंगारवाडी, ट्रान्स अपार्टमेंट, कोंडीविटा, महेश्वरी नगर, उपाध्याय नगर, ठाकूर चाळ, साळवे नगर, भवानी नगर, दुर्गा पाडा, मामा गॅरेज.
६) के/पूर्व विभाग– विजय नगर मरोळ क्षेत्र, केई – १०ए – (सायंकाळी ६ ते रात्री १०.०० वाजता) – विजय नगर मरोळ, मिलीट्री मार्ग, वसंत ओआसिस, गांवदेवी, मरोळ गांव, चर्च रोड, हिल व्ह्यू सोसायटी, कदमवाडी, भंडारवाडा, उत्तम ढाबा.
७) के/पूर्व विभाग– सिप्झ (२४ तास) तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळ (२४ तास)
८) एच/पूर्व विभाग- बांद्रा टर्मिनल पुरवठा क्षेत्र
९) जी / उत्तर विभाग- धारावी सायंकाळचे पाणीपुरवठा क्षेत्र – (दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत) – धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदीर मार्ग, ए. के. जी. नगर, दिलीप कदम मार्ग, कुंभारवाडा, संत गोराकुंभार मार्ग.
१०) जी / उत्तर विभाग- धारावी सकाळचे पाणीपुरवठा क्षेत्र – (पहाटे ४ ते दुपारी १२ वाजेपर्यंत) – प्रेम नगर, नाईक नगर, जास्मिन मील मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प, ९० फीट रोड, एम. जी. मार्ग, धारावी लूप मार्ग, संत रोहिदास मार्ग.
त्यामुळे या कालावधीतील पाणीकपातीपूर्वी पाण्याचा आवश्यक तितका साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

पाली जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीवरील गळती थांबवली
दरम्यान, पाली जलाशयाच्या बांद्रा रेक्लेमेशन इनलेटवर मेहबूब स्टुडिओ येथे ६०० मि.मि. व्यासाच्या जलवाहिनीची मोठी गळती होऊन वाया जाणारे हजारो लिटर पाणी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरूस्ती करून वाचवले.
पालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त ( प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या आदेशाने जल अभियंता विभागाच्या सहाय्यक अभियंता जल कामे (तातडीचा दुरुस्ती विभाग) वरळी यांनी सहाय्यक अभियंता जल कामे – परिमंडळ (प.उ.-द.) यांच्या मार्गदर्शनानुसार दुरुस्ती कामास तातडीने सुरूवात केली. सर्वच बाजूने पाणी येत असल्याने व काँक्रीट रोड असल्यामुळे गळती शोधणे अवघड जात होते. गळती शोधक पथकाने आधुनिक यंत्राच्या सहाय्याने जमिनीखालील १२ फूट खोल गळती अचूकपणे शोधली. दुरुस्ती विभागाने जेसीबीचा वापर करून खोदाईचे काम हाती घेतले. याठिकाणी महानगर टेलिफोन, टाटा, रिलायन्स, अदाणी, महानगर गॅस आदी कंपन्यांच्या उच्च दाबाच्या केबल्सचे जाळे पसरलेले आहे. त्यातून अत्यंत काळजीपूर्वक खोदाईचे काम पालिकेचा कर्मचाऱ्यांनी केले.
गळतीचे पाणी या केबल्सच्या चेंबरमध्ये जात होते. धोका टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांना विश्वासात घेऊन, आवश्यक ती पूर्ण खबरदारी घेऊन या केबल्स काही ठिकाणी कापाव्या लागल्या तर काही ठिकाणी बंद कराव्या लागल्या. दसरा सण असताना कोणत्याही प्रकारे पाणीपुरवठा खंडित न होता, वाहतूक सुरळीत ठेवून हे काम १८ तासात पूर्ण करण्यात आले.
परिसरातील व इमारतीमधील नागरिकांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही याचीही तसदी घेण्यात आली होती. प्रभावित जलवाहिनी सापडल्यावर आणि निरीक्षण केल्यावर तिच्या तळाला दोन ठिकाणी मोठी गळती निदर्शनास आली. अत्यंत कुशलतेने त्याठिकाणी प्रथम लाकडी खुट्या ठोकल्या. त्यानंतर एम. एस. पॅच वेल्डिंग व टेलपीस लावून गळती पूर्णपणे बंद केली गेली.
जल अभियंता (प्रभारी) संजय आर्ते, उप जल अभियंता राजेश ताम्हाणे, कार्यकारी अभियंता सुशील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अभियंता जल कामे (ता.दु.वि.) वरळी जीवन पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली तेजस, सहाय्यक अभियंता रमेश कुऱ्हाडे, सहाय्यक अभियंता अमित हटवार, डोनाल्ड, वैभव गावडे यांच्या मदतीने हे अत्यंत गुंतागुंतीचे व आव्हानात्मक काम पूर्ण करण्यात आले.

