सरत्या २०२० वर्षाच्या अखेरीच्या चार दिवसात, ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात, एक फलक झळकला होता. त्यावर वेळ कमी करत जणारे एक घडाळ्य चमकत होते. नव्या वर्षाचा पहिला क्षण उगवायला आता किती दिवस, किती तास, किती मिनिटे व किती सेकंद बाकी उरले आहेत, हे ते घडळ्याळ पाहणाऱ्या लोकांना सांगत होते. खरेतर हे दृष्य अनेक शहरांत दिसले असेल. कारण पाश्चात्य नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष, हा मावळत्या वर्षाच्या अखेरच्या क्षणापासून सुरू करायचा असतो! त्यामुळे ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री बारा वाजता, म्हणजेच घडाळ्यात शून्य वेळ दिसते तेव्हा, नव्या, १ जानेवारी २०२१चा शुभारंभ होत असतो. त्या क्षणी मग विद्युत रोषणाई तर झळकतच असते, पण विविध शोभेच्या फटाक्यांची आतषबाजीही जोरदारपणाने केली जाते. लोक एकमेकांना मिठ्या मारून, हस्तांदोलने करून, नव्याच्या आगमानाची खुषखबर देत असतात. एकूण मोठा कल्लोळ करून आनंद साजरा होत असतो. पण यंदाच्या मावळत्या २०२० वर्षाच्या असंख्य वैशिष्ट्यात याही एक नव्याची भर पडलेली आहे. नव्या वर्षाच्या स्वागताचा जल्लोष करण्यासाठी, मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी, मध्यरात्र उलटून जाईपर्यंतची जागरणे व जागण्यासाठी सोयीचे ठरणारे पेयपान वा अपेयपान, यावेळी मान्य नव्हते. २०२० वर्षाने सतत सोबत बाळगलेल्या विषाणूचाच तो आदेश होता.
कोरोनाचे संकट आता मावळते आहे अशा कल्पनेत जगभरची जनता ३१ डिसेंबरच्या उत्साहाला, आनंदाचे आणखी चार घोडे जोडण्याच्या मनःस्थितीत असतानाच, डिसेंबरच्या मध्यावर कोरोनाचा एक नवा अधिक भीतीदायक चेहरा पुढे आला. या बदलणाऱ्या नव्या, इंग्लीश कोरोनामुळे, जगभर नव्याने निर्बंध लावावे लागले. प्रवास बंद झाले. विमाने थांबवली गेली. अनेक युरोपीय देशांत रस्तेही निर्मुष्य केले गेले. टाळेबंदी वाढवली गेली. सहाजिकच १३० कोटींच्या आपल्या भारत देशाने, नव्याने बदलणाऱ्या विषाणूचा उपद्रव वाढू नये, यासाठी काही खबरदाऱ्याही वाढवल्या. ३१ डिसेंबरच्या उत्सवी आनंदाच्या फुग्याला निर्बधांची टाचणी लागली. रात्रीचा जल्ल्लोष कुठेही होऊ नये, यासाठी मुंबईसह सर्व महानगरांत रात्रीच्या संचारबंद्या लागू झाल्या. मुंबई मनपाने विशेष बंदोबस्त केला. कारण या शहराची ख्यातीच, “सतत जागे राहणारे शहर”, अशीच आहे. त्यामुळे नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई महानगरी रात्रभर जागीच राहणार, यात कोणालाही शंका नव्हती. संचारबंदी लागल्यावर रात्री बार व हॉटेले लवकर बंद होणार होती, तर मग जनता आपापल्या घरांच्या इमारतींच्या गच्च्यांवर पार्टी करू शकेल, हे ध्यानात घेऊन मुंबई महापालिकेने आणि पोलिसांनी ड्रोन उपकरणाची विशेष गस्तही घातली. आता पुढच्या एक-दोन दिवसांत या गस्तींचे फलित काय निघाले, कोणाला कुठे कुठे अटकाव झाला, कोण पकडले गेले याच्या खमंग बातम्या आपण वाचूच!!
नव्याच्या स्वागतातील सावधतेची ही पताका येणाऱ्या २०२१च्या पोटात काय दडले आहे, याची चाहूल नक्कीच देते आहे! मावळत्या २०२० वर्षाचे सारे ३६५ दिवस, आपण असेच चिंतेत ढकलले होते. कोरोनाचे संकट घेऊनच काल मावळलेले वर्ष उगवले होते आणि त्याच्या सरत्या प्रत्येक दिवसागणिक ते संकट अधिक गंभीर होताना दिसत होते. जगभरात लाखो लोकं या विषाणूचे बळी ठरले. पण वाचलेल्या, बचावलेल्या करोडो लोकांची आयुष्येही विषाणूने लादलेल्या निर्बांधांमध्येच भरडली गेली. तसे या २०२१बाबतीत नक्कीच होणार नाही अशी आशा मात्र बाळगायला हरकत नाही. सर्व जगावर आर्थिक संकट घोंघावत होते तसेच ते भारतावरही होतेच. मावळत्या वर्षातील तीन आठवड्यांचा अतिकडक लॉकडाऊन आपण अनुभवला. त्यानंतरही पुढचे दोन महिनेही थोड्या कमी कडक बंदीचा, पण वाईट परिणामांची तीव्रता वाढवणाराच लॉकडाऊनही आपण भोगला. मार्च २३पासून सुरू झालेला लॉकडाऊन कधी संपणार या चिंतेने घरापासून, गावांपासून, शेकडो हजारो किलोमीटर दूर असणारा आणि हातावर पोट घेऊन जगणारा वर्ग हैराण झाला. घाबरलाही.
एप्रिलपासून अचानक, देशभराच्या महानगरांमधून जनांचे प्रवाह, गावखेड्याकडे, वाहू लागले. मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, कोलकाता इकडून बिहारी, ओरिया, राजस्थानी, उत्तर प्रदेशीय असा मजूर वर्ग घराच्या कुटंबाच्या ओढीने निघाला. महानगरात पोट भरणे त्याला नजीकच्या भविष्यात शक्य दिसत नव्हते. तत्पूर्वी केंद्र आणि राज्य सरकारांनी सर्वच प्रवासाची आधुनिक साधने कुलूपबंद करून टाकलेली होती. त्यामुळे स्वतःच्या दोन पायांवरच भरवसा ठेवणे मजुरांना भाग पडले. लाखो विस्थापितांच्या देशभरातील त्या धडपडीच्या परिणामीच मग महानगरांमधून मजुरांच्या प्रदेशांकडे जाणाऱ्या विशेष रेल्वेगाड्या सुरू झाल्या. चालणाऱ्यांच्या तांड्यांना लगाम बसला. पण तरी त्या दुःखद प्रसंगाचे वाईट परिणाम दिसतच राहिले. शेकडो मजुरांनी वाटेवरच प्राण सोडले होते. नेमके किती व कोण कोण गेले, याचा अधिकृत आकडा सरकारकडे नाही, असे नंतर संसदेत सांगितलेही गेले. त्या साऱ्या कटू व कठोर लॉकडाऊनमुळे देशातील कोरोनाचा विस्तार व प्रसार मर्यादित राहिला.
लाखो लोकांचे जीव विषाणूपासून वाचले, हे खरे. पण खाजगी व लहान उद्योगातील कर्मचारी, कामगारांवर पुढच्या तीन महिन्यांत मोठे आर्थिक संकट कोसळले. पगार येणे थांबले तरी होते वा त्यात मोठी कपात तरी झाली होती. नोकऱ्या धोक्यात आल्या. कारण त्या देणारे उद्योग, व्यवसाय आर्थिक रेट्यात बंद पडले होते. देशाच्या अर्थव्यवस्थेचे वीस लाख कोटी रुपयांचे नुकसान या वर्षात झाले होते. २०२० संपतासंपता अर्थव्यवस्थेने थोडी उभारी घेतलेली आहे. बाजारात खरेदी करणाऱ्यांचे लोंढे पुन्हा दिसू लागले आहेत. व्यापार पुन्हा फुलतो आहे. पण तरी प्रवासाची साधने सरकारने आजही पूर्णत्वाने सुरू केलेली नाहीत. मुंबई महानगराच्या परिसरातील अन्य चार महापालिकांच्या क्षेत्रात म्हणजेच, ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यांमध्ये राहणारा लाखोंचा कामगारवर्ग आजही लोकल प्रवासाला मुकलेलाच आहे. आता नव्या वर्षाच्या पहिल्या काही दिवसांतच लोकल प्रवास सुरळीत व्हावा अशीच इच्छा, मागणी आपण नव्या वर्षाकडे करू शकतो. हे घडायला आता हरकतही दिसत नाही. कारण कोरोनाचा धोका पुष्कळच उणावलेला आहे. तीन महिन्यांपूर्वी दररोज वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या लाखांच्या जवळ पोहोचली होती. आज त्याच्या एक पंचमांशाहून कमी इतकी दररोज वाढणारी रुग्णसंख्या आहे. सध्याची वाढ १७ हजारांच्या खाली आली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, केरळ व तामिळनाडू या काही राज्यांमध्ये ही संख्या थोडी वाढतानाही, कधीकधी दिसते आहे. पण देशाचे सर्वसाधारण चित्र, कोरोना आटोक्यात असल्याचेच आहे. कोरोनामुळे ज्यांना जीवन संपवावे लागले, त्या सर्वांप्रती आदर ठेवूनच, हे नोंदवावेच लागेल की सध्याची कोरोना मृत्यूसंख्याही वाहन अपघातात दररोज दगावणाऱ्यांपेक्षा कमी झालेली आहे. दृदरोग व अन्य आजारांनी यापेक्षा अधिक लोक आजही दररोज दगावत असतात. तेव्हा आता ,“भीती झटका व पुढे चला”, हेच लोकांनी ठरवावे लागेल.
आणखी एक भीती कोरोनासबोतच गेल्या वर्षभरात भारतीय मनाला ग्रासून राहिली आहे. ती म्हणजे, “नैऋत्य सीमा धगधगत ठेवणारा चीन आपल्यावर पुन्हा आक्रमण तर करणार नाही ना” हीच. चीनमधील सध्याची अंतर्गत स्थितीही तिथले सत्ताधीश क्षी जिनपिंग यांना फार अनुकूल नाही. त्यावर मात करण्यासाठी ते भारताबरोबरची कुरापत अधिक वाढवू शकतात. पण भारत आता वीस वर्षांपूर्वीचा राहिलेला नाही. १९६२चा तर नाहीच नाही, हे भारतीय जवावांनी अन् भारतीय नेतृत्त्वाने याआधीही दाखवून दिले आहे. डोकलाम आणि गलवानचे संघर्ष चिन्यांच्या मनात दहशत निर्माण करणारे ठरले आहेत, असे लष्करी नीतीतील तज्ज्ञ सांगतात. २०२१च्या पोटात चीनबरोबरचा संघर्ष असलाच तरी तो मर्यादित स्वरूपाचा राहील आणि चीनच्या आगळिकीला समर्थ उत्तर देणाऱ्या भारताबरोबर अनेक पाश्चात्य व पौर्वात्य देश उभे असलेले दिसतील. गेली काही वर्षे भारताने चीनविरोधात एक लष्करी ताकद उभी करण्याचा प्रयोगही घडवला आहे. ऑस्ट्रेलिया, जपान आणि इंग्लीश नौदलांसोबत भारताने सागरी कवायती घडवून एक ताकद दाखवली आहे. आता अमेरिकाही या कवायतींमध्ये भारतीय नौदलाबरोबर दिसली आहे. चीनची छाती दडपून टाकणारीच ही कृती आहे. त्याचा सुयोग्य परिणाम दिसेल व नैऋत्य सीमा २०२२१मध्ये शांत झालेली दिसेल अशीही आशा नव्या वर्षाकडून आपण करायला हवी.
विषाणूपासून वाचण्याची जी त्रिसूत्री आपल्याला २०२०ने शिकवली तीच २०२१मध्येही आपल्याला सोबत घ्यावीच लागेल. नव्हे ती एक चागंली व आरोग्यदायी जीवनशैली म्हणून जर जनतेने स्वीकारली तर भारतातील आरोग्याचे मान अधिक चांगले राहील. स्वच्छ पाणी, स्वच्छतेच्या चांगल्या सवयी आणि मुखपट्टी, हात धुणे, समाजिक अंतर यामुळे देशाचेच आरोग्य सुधारून २०२१मध्ये जीवन अधिक सुसह्य अधिक स्वागतार्ह व्हावे. नव्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशातली मोठ्या जनसमुदायापर्यंत कोरोना विषाणूवरील लस पोहोचल आणि त्या भयापासून आपण सारे मुक्त होऊ. त्यानंतरचे वर्ष हे अधिक आर्थिक प्रगतीचे होईल अशी आशा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आर्थिक विकासाचा दर गेल्या वर्षात उणे झाला होता. तो वर्षअखेरीकडे अधिक राज्यात परतला आहे. काहींच्या मते २०२१चा विकासवृद्धीचा दर चार टक्के राहील. पण अन्य काही अभ्यासक सांगत आहेत की हा दर नक्कीच पुन्हा सात ते आठ टक्क्यांच्या घरात परतेल. तसे झाले तर देशाचे अर्थमान चांगले सुधारलेले दिसेल. म्हणूनच नव्या संधी, नव्या आशा आणि नव्या अपेक्षा घेऊन येणाऱ्या या नव्या वर्षाचे स्वागत आपण चांगल्या व स्वच्छ मनाने करूया!! कोणत्याही संकटाची भीती पोटात न ठेवला, पण योग्य काळजी घेत, आपण पुढे जाऊया. भविष्य नक्कीच आपले आहे. प्रगतीचे नवे सोपान आपल्या प्रत्येकाच्या पावलांची वाट पाहत आहेत!

