पुण्याजवळ बारामती येथे २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह चौघांचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेने सारा महाराष्ट्र हळहळला. पाच वेळा उपमुख्यमंत्री झालेले अजितदादा हे एकमेव नेते होते. दीर्घकाळ राज्याचे अर्थमंत्री होते. तीस वर्षांहून अधिक काळ सत्तेच्या परिघात राहून त्यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले होते. शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाचा झेंडा फडकावून ४२ आमदारांसह भाजपाच्या नेतृत्त्वाखालील महायुती सरकारमध्ये सामील झाले. पण हिंदुत्ववादी पक्षाबरोबर सत्तेत काम करताना ते कधी संघ-भाजपाच्या विचारसरणीत वाहून गेले नाहीत. शाहू, फुले, आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाणांची विचारधारा त्यांनी कधी सोडली नाही. महायुतीत त्यांनी आपली ओळख वेगळी ठेवली. ते कधी भाजपाबरोबर फरफटत गेले नाहीत. आपल्या भाषणातून मोदी-शाहांच्या नावाचा त्यांनी कधी जप केला नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्त्व करताना आपले काका शरद पवारांशी त्यांनी अंतर राखले नाही. काकांविषयीचा आदर शेवटपर्यंत कायम ठेवला. उपमुख्यमंत्रीपदावर असलेल्या नेत्याचा विमान अपघातात मृत्यू झाल्यावर त्यामागे कारण काय? दोषी कोण? जबाबदार कोण? याचे उत्तर दहा महिने उलटून गेल्यावरही मिळाले नाही. विधिमंडळातही चर्चा झाली नाही. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आहेत. राष्ट्रवादी महायुतीत भागीदार आहे. अजितदादांचा पुतळा पुण्यात उभा राहिला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी त्याचे अनावरण केले. पण त्यांच्या मृत्यूच्या चौकशीत आजवर काय तपास झाला, यासंबधी कोणी काही बोलत नाही. अजितदादांचे पुतणे आमदार रोहित पवारांशिवाय सरकारला कोणीच जाब विचारत नाही.

रोहित पवार यांची राज्यात अँग्री यंगमॅन अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. ठाकरे व पवार यांचे मोठे पक्ष फोडल्यानंतर राज्यात विरोधी पक्ष कमजोर झाला आहे. सरकारला जाब विचारणारा व घाम फोडणारा विरोधी पक्षात नेता नाही. मीडियातून (एखादा अपवाद वगळता) सरकारला प्रश्न विचारले जात नाहीत. रोहित पवारांनी अजिदादांच्या मृत्यूमागे कोण आहे, याचा छडा लावण्याची प्रतिज्ञा केली आहे. दहा महिन्यांत त्यांनी सहा पत्रकार परिषदा घेतल्या. पत्रकार परिषदेत काही कथित पुराव्यांसह त्यांनी सादरीकरण केले. त्यांनी सरकारवर सतत प्रश्नांचा भडिमार चालवला आहे. अजितदादांचा विमान अपघातातील मृत्यू हा अपघात होता की घातपात, हा संभ्रभ वाढत चालला आहे. रोहित पवारांनी तपासयंत्रणांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. कुणाच्या दबावाखाली तपास चालू आहे का? कुणाला वाचविण्यासाठी काहीच घडत नाही का? उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या सहकारी नेत्यांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चौकशी सीबीआयकडे सोपवावी, अशी मागणी केली. तपास सीबीआय कडे सोपवला आहे का? नेमका तपास कोण करतंय? सीआयडी की केंद्रीय तपास यंत्रणा? जेव्हा देवेंद्र फडणवीस स्वत: अमित शाह यांना सांगतात की, चौकशी अहवाल लवकर जाहीर करावा, मग यापुढे जनतेने कोणाकडे बघायचे? राज्याच्या गृहमंत्र्यांकडे की केंद्राच्या गृहमंत्र्यांकडे?

रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत व्हीएसआर कंपनीच्या संपत्तीचा भंडाफोड केला. या कंपनीच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी व्हावी, अशी मागणी केली. एवढेच नव्हे तर या कंपनीच्या मालकांशी जवळीक असलेला मफलरमॅन म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटोच दाखवला. विमान कंपनीचे मालक जीव्हीके सिंग यांच्या मुलाच्या लग्नाला फडणवीस उपस्थित असून त्यांच्या गळ्यात मफलर आहे, असा फोटो रोहित पवारांनी सादरीकरणातून दाखवला. विमान अपघाताच्या संदर्भात आपण फडणवीस यांच्यावर कोणताही आरोप करीत नाही. पण विमान अपघातात गुंतलेल्या विमान कंपनीच्या मालकाशी त्यांचे कसे घनिष्ट संबंध आहेत, असे रोहित पवार यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. मफलरमॅन म्हणून मुख्यमंत्र्याचा फोटो दाखवायचा हे अतिशय गंभीर आहे. त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात, याची रोहित यांना जाणीवही असावी. पण काकांच्या मृत्यूचा छडा लागेपर्यंत आपण माघार घेणार नाही, अशी त्यांची जिद्द आहे.

अजितदादा मोटारीने मुंबईहून बारामतीला जाणार होते. पण दोन नेत्यांच्या फोनमुळे व त्यांच्या कामामुळे उशीर झाल्याने ते दुसऱ्या दिवशी सकाळी बारामतीला विमानाने गेले याकडे रोहित यांनी लक्ष वेधले. विमानात पुरेसे इंधन असताना जास्तीचे का भरले. ब्लॅक बॉक्स जळला हे खरे आहे का, अमेरिकन संस्था व डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हीएशन यांनी विमानात अनियमितता असल्याचे म्हटले आहे हे खरे आहे का? विमान अपघातात चार जणांचे मृत्यू झाल्यानंतर बारामती किंवा मुंबई येथे एफआयआर का नोंदवला नाही? अजितदादांच्या घराबाहेर काळी जादू झाल्याची माहिती देऊन सीआयडीने तपासच केला नाही, असा त्यांनी आरोप केला आहे. व्हीएसआर कंपनीकडे विमाने, आलिशान मोटारी, महागडी घरे आदी अमेरिका, दुबई, महाराष्ट्रात, देशात अनेक ठिकाणी अब्जावधींची मालमत्ता असल्याचा तपशील त्यांनी दिला. मग त्याची चौकशी का होत नाही? असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

पुण्यात अजितदादांच्या अर्धपुतळ्याच्या अनावरणप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या मृत्यूमागे जे दोषी असतील त्यांना फासावर लटकवले जाईल, अशी घोषणा केली. दादांच्या मृत्यूला दहा महिने होऊन गेले. या घटनेचा साधा एफआयआरच नोंदवला गेला नसेल तर तपास कशाचा होतो आहे, नेमके कोण करतो आहे, कोणत्या दिशने चालला आहे, हे कसे समजणार? विमानात बसण्याअगोदरच अजितदादांची हत्त्या झाली अशा संशय व्यक्त करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शिवाय मुंबईतील देवगिरी बंगला ते बारामती विमानतळ मार्गावरील सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध होत नाही म्हणून संशय अधिक बळावत आहे. अजित पवार यांच्या हयातीत त्यांच्यावर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप करून त्यांना जगणे मुष्किल केले गेले होते. आता मात्र त्यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करताना अमित शाह यांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. यावरून उद्धव ठाकरे यांनी अमित शाहांवर निशाणा साधला. रोहित पवार यांची वैयक्तिक पत्रकार परिषद होती, हे त्यांनीच स्पष्ट केले आहे. लोकशाहीत प्रत्येकाला वैयक्तिक मते मांडण्याचा अधिकार असतो. खुद्द मुख्यमंत्र्यांनी अमित शाहांकडे अपघाताच्या चौकशीची केली आहे, आपण अधिकृत तपास अहवालाची वाट पाहूया, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. मग पाहूया वाट!
(लेखक डॉ. सुकृत खांडेकर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

