खरेतर पत्रकारितेत आल्यापासून साहित्यावर काही लिखाणच केलेले नाही. लोकसत्तेने काय ते ‘लिट फेस्ट’ आयोजित केली, तेथे प्रख्यात हिंदी साहित्यिक अशोक वाजपेयी यांना बोलावले व त्यांनी साहित्यात ‘सत्याग्रह’ असावा, असे नमूद केले, मग आम्हाला राहवलेच नाही. सांगण्यासारखे नाही. परंतु आम्हालाही साहित्य विषय शिकवायला सरोजिनी वैद्य, वा ल कुलकर्णी, व दि, विजयाबाई, पुष्पाबाई, रा भा पाटणकर, इंग्रजीच्या वूड मॅडम, निस्सीम इझीकेल, गंगाधर पाटील, सदानंद रेगे, ल ग जोग, आदी दिग्गज प्राध्यापक मंडळी होती. त्यांनी शिकवलेल्या (आणि अर्थात आम्हाला समजलेल्या) साहित्य विषयाबाबत लिहिण्याची संधी वाजपेयी साहेबांनी (कारण ते सनदी अधिकारीही होते) विनसायास दिलेली असताना ती वाया दडवायची नाही, या एकाच हेतूपायी आम्ही हा अडखळत प्रयत्न करत आहोत. या अडखळत टाकलेल्या पावलांचे कौतुक करावे, असे सांगणार नाही, पण तुच्छही लेखू नका इतकीच अपेक्षा.
देशातील काही विद्वान, देशात घडणाऱ्या घटनामुळे चिंतीत आहेत तर सत्तारूढ पक्ष व त्यांच्या मित्रांना वाटते की, सर्व आलबेल आहे. असे चित्र तर सर्वत्र आहे, सर्वकालिक आहे. कारण, सत्तारूढ व विरोधक हे नेहमीच एकमेकांसमोर असतात. म्हणूनच तर ते एकमेकांनाही ओळखून असतात.
“मौत से ठन गयी
झूजनेका मेरा कोई इरादा न था..
मोड पर मिलेंगे इसका वादा न था|
रास्ता रोक कर वो खडी हो गयी
यो लगा जिंदगी से बडी हो गयी
तू दबे पाव, चोरी छिपे से न आ
सामने वार कर, फिर मुझे आजमा!” (अटल बिहारीं वाजपेयी)
अशी काहीशी परिस्थिती असतानाही अशोकजी, आपण महाराष्ट्राच्या संत परंपरेची आठवण करून देऊन देशात असहमतीचा सूर प्राचीन काळापासून सुरू होता, असेही आवर्जून सांगितलेत. इतकेच नव्हे तर प्रश्न पडण्याची व विचारण्याची प्रथाही आपल्याकडे होती, अशी पुस्ती आपण जोडलीत.
प्रशासन: पूर्ण असहमत
एका प्रश्नाच्या उत्तरात आपण असे म्हणालात की, प्रशासनात खूप काही करता येतं.. हे मात्र अजिबात पटलेले नाही. देशात व राज्यात बरेच बदल झालेले दिसतात हे मान्य. त्यात प्रशासनाचा हात असतो हेही मान्य. पण हे प्रशासन गेली 40/50 वर्षे सुस्त असलेलेच आम्ही पाहत आलो आहोत. 30 वर्षे आमदार राहिलेल्या एका ज्येष्ठ आमदाराचे उदाहरण देऊन (असे अनेक आमदार आहेत) हा मुद्दा स्पष्ट करता येतो. या आमदार महोदयांनी नळपाणी पुरवठ्याची योजना आपल्या पहिल्या टर्मच्या पहिल्या सहा महिन्यांतच मंजूर करून घेतली होती. (हा आमदार दुष्काळी भागातील होता.) दुसऱ्या टर्मच्या अखेरीस या योजनेसाठी लागणारे पाईप्स आणून टाकले गेले. (जोडले नाही, खोदकामच झालेले नव्हते.) तिसऱ्या टर्मच्या अखेरीस पाईप्स टाकण्यासाठी खोदकाम सुरू केले गेले आणि पाचव्या टर्मच्या अखेरीस पाईप लाईनचे काम पूर्ण झाले. सध्या व त्याआधीही अधूनमधून दुष्काळ असल्याने नळाला पाणी आले की नाही, हे अधिकृतरित्या सांगितले गेलेले नाही.

हे वानगीदाखल सांगितले. पण देशात वा राज्यात अशा अर्धवट राहिलेल्या शेकडोंनी योजना आहेत. आता हे साहित्यात सांगितले तर कुठल्या सरकारला आवडेल? आणि आपण सांगता की ‘सत्याग्रही’ असले पाहिजे. म्हणूनच मी आरंभीच आपणाला प्रश्न विचारला होता की, समोरचे सत्य की काटकोनातले सत्य? आणि आजकाल सत्य हा शब्द साक्षेपी झाला आहे. आपल्या किंवा पुरातन काळातील ‘अंतिम’ सत्यावर 50 वर्षांपूर्वीच ‘अंत्यसंस्कार’ केले गेले आहेत. तेव्हा सत्य हा शब्द आता कालबाह्य झाल्याचे समजायला हरकत नाही. भांडवलशाही, समाजवाद, साम्यवाद, डावे, उजवे आदी शब्द आता ‘फिजूल’ ठरत आहेत. समाजवादाचे तुकडे तुकडे होऊन तो शब्द आता जीर्ण, शीर्ण होऊन लुप्तच झाला आहे. साम्यवाद आपलेच म्हणजेच स्वतःचेच तुकडे करत आहे. भांडवलदार मात्र सर्वांना नाचवत आहेत. ‘सबसे बडा रुपय्या’ हेच खरे!
वाजपेयीजी, आपल्या ‘सत्याग्रहा’बाबत बरंच लिहिता येईल. पण त्याचा सरांश एकच असल्याने आवरते घेतो. परंतु एक शल्य आहे. हिंदी पट्ट्यातील विद्वान व साहित्यिकांबाबत. कारण ही सर्व मंडळी दिल्ली वगळता कुठेच तोंड उघडत नाहीत. मुंबई वा महाराष्ट्रात आल्यावर मात्र त्यांना कंठ फुटतो. अभिनेता नसिरउद्दीन शहा यांच्याबद्दलही असेच म्हणता येईल. नसिरभाई उत्कृष्ट अभिनेता आहेत, यात शंकाच नाही. परंतु समाज सुधारणेबाबत त्यांनी आपले विचार जरा बिहार व उत्तर प्रदेशाच्या मुस्लिम बांधवांसमोर व्यक्त करावेत इतकीच अपेक्षा! हिंदी साहित्यिकांचा आदरसत्कार मुंबईत वा महाराष्ट्रात जितका केला जातो तितका तो त्यांच्याही राज्यात केला जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. इतके असूनही ही माणसे महाराष्ट्राला ‘घोडा’ लावायला कमी करत नाही.
“न मैं चूप हूँ न गाता हूँ
समय की सर्द सासोंसे चिनारों को झूलसे डाला
मगर हिमपात को देती चुनौती एक दृपमाला
बिखरे निड
विहंसी चीड
आसू है न मुस्काने
हिमानी झिल के तटपर
अकेला गुनगुनाता हूँ|
न मैं चूप हूँ न गाता हूँ|” (अटलबिहारी वाजपेयी)
अशी जनसामान्यांची अवस्था आहे. आणखी काय लिहू? आपण जाणते आहात, काय ते समजून जा. मात्र ‘सत्याग्रही’ बनू नका, इतकंच!!
(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यविषयक अभ्यासक आहेत.)

