मुंबईतल्या बोरीवली पश्चिम येथील स्वररंग प्रतिष्ठान, या संस्थेने आयोजित केलेला भावगंधर्व पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा ‘आशाताई आणि मी’ हा कार्यक्रम नुकताच प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर, बोरिवली येथे संपन्न झाला. यावेळी नव्वदीच्या घरात पोहोचलेले पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या उपस्थितीने रसिकांच्या तुडूंब गर्दीत अवघे सभागृह सूरसंगीताने न्हाऊन निघाले.
दिवाळीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात पं. हृदयनाथजींनी त्यांचे आणि आशाताईंचे सांगितिक व घरगुती संबंध हळुवारपणे उलगडून सांगितले.
यावेळी आशाताईंनी गायलेली अनेक गाणी मधुरा दातार यांनी अप्रतीमपणे रसिकांसमोर सादर केली. अनेक गाण्यांना वन्स मोअर..ची दाद मिळाल्याने कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.
यानिमित्ताने स्वररंग प्रतिष्ठानतर्फे पं. हृदयनाथजींचा हृद्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते प्रदीप कबरे, रंगस्वरचे संजय देसाई, श्रीकृष्ण कुलकर्णी, विजय तारी, प्रफुल्ल कारेकर, ‘गिरगाव कट्टा’चे संस्थापक अध्यक्ष प्रदीप मालणकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमातून आम्ही माहितीचा खजिना आणि आशाताईंच्या गाण्यांचा नजराणा घेऊन चाललो आहोत, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

