Homeपब्लिक फिगरवसुली एजंट गावात...

वसुली एजंट गावात दिसले की झोडपून काढा!

नांदेड जिल्ह्यातील शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या मृत्यूचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्रातल्या काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात मायक्रोफायनान्स कंपनीकडून हत्त्या झाल्याचा आणि पोलिसांनी कारवाई न केल्याचा आरोप केला आहे. राज्यातील मायक्रो फायनान्स कंपन्याकडे सत्ताधाऱ्यांचा पैसा आहे. या कंपन्या गरजू शेतकऱ्यांना कॅशमध्ये पैसे देतात. त्यावर १२ ते १४ टक्के व्याज आकारण्यात येते. वसुली एजंट गुंड असतात. नांदेडमधील शेतकरी शिंदे यांचा जीव या गुंडानी घेतला. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनीदेखील हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या दबावानंतर गुन्हा दाखल झाल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्यात एकीकडे शेतकरी आत्महत्त्या वाढत असताना दुसरीकडे मायक्रो फायनान्स कंपन्यांचे एजंट शेतकऱ्यांचे जीव घेत आहेत. गावात या फायनान्स कंपन्यांचे एजंट दिसले तर गावाने एकत्र येऊन त्यांना झोडपून काढा, असे आवाहनही त्शीयांनी केले.

१ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘देश बचाव, वोट बचाव’ या अभियानांतर्गत देशभरातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने या आंदोलनासाठी प्रतिनिधी नियुक्त केले असून, राज्यभरात बैठका घेऊन जनजागृती केली जात आहे. विदर्भातूनही मोठ्या संख्येने नागरिक दिल्लीला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मतचोरीच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका करताना ते म्हणाले की, मतदारांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी हे आंदोलन महत्त्वाचे आहे. दिल्लीतील व्यापाऱ्यांच्या नावाखाली आंदोलनाला विरोध करण्याचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले.

विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी जुन्या भिंतींना रंग देणे, दरवर्षी नवीन पडदे लावणे आणि इतर सजावटीच्या कामांवर मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. कंत्राटदारांचे पैसे थकीत आहेत. काही कंत्राटदार आर्थिक अडचणींमुळे आत्महत्त्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. अशा परिस्थितीत अधिवेशनाच्या नावाखाली अनावश्यक खर्च कशासाठी, असा सवाल त्यांनी केला. आहे त्या परिस्थितीत आवश्यक साफसफाई करून अधिवेशन घ्या. अनावश्यक खर्च करू नका. शेतकरी आत्महत्त्या करत असताना सरकारने त्यांच्याकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आणि अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या वक्तव्यावरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर टीका करण्यापूर्वी स्वतःच्या पूर्वीच्या वक्तव्यांचाही विचार करावा, असे म्हटले. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांच्याबाबत भाजपच्या नेत्यांनी केलेली विधाने भाजपच्या नेत्यांना आठवतात का? खरगे यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेणाऱ्यांनी यापूर्वीच्या घटनांबाबत भाजपने घेतलेली भूमिका स्पष्ट करावी, असे ते म्हणाले.

भीमाशंकर परिसरात टोरंट कंपनीच्या वीज प्रकल्पासाठी ६०० एकर जंगलतोड होणार आहे. गुजरातच्या उद्योजकांसाठी वृक्षांची कत्तल होत आहे, जंगल उद्ध्वस्त होत आहे. याला काँग्रेसचा विरोध आहे. गुजरातमधील टोरंट कंपनीच्या प्रकल्पासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर जंगलतोड करण्याची गरजच काय? पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी ओसाड जमिनीचा पर्याय का निवडला जात नाही,असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आता मुख्यमंत्री ९० हजार झाडे लावण्याचे आश्वासन देतात. पण आज तोडल्या जाणाऱ्या जुन्या जंगलाची भरपाई त्यातील जैवविविधतेची हानी ही नवीन झाडे लगेच भरू शकतील का? या भीमाशंकर परिसरात शेकरूसारख्या वन्यजीवांचा अधिवास असून अनेक नद्यांची उगमस्थानेही या भागात आहेत. जंगलतोडीमुळे पर्यावरणीय समतोल बिघडण्याची आणि त्याचे दूरगामी परिणाम होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

आहुति साप्ताहिकाच्या बोरीवली आवृत्तीचे धूमधडाक्यात प्रकाशन

महाराष्ट्रातल्या अंबरनाथ येथून प्रसिद्ध होणाऱ्या आहुति साप्ताहिकाच्या बोरीवली आवृत्तीचे नुकतेच नाटककार जयवंत दळवी लघु नाट्यगृह, प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या अस्मिता मराठीची, गौरव कर्तृत्वाचा, या शीर्षकाखाली 'प्रतिभावंतांचा सन्मान सोहळा' या सोहळ्यात रसिक श्रोते आणि वाचकांच्या टाळ्यांच्या कडकडाटात प्रकाशन...

स्वाती मोहिते यांना केशवसृष्टी पुरस्कार

प्रत्येक दिव्यांग मुलाला सहानुभूती नको, सन्मान द्या, त्यांच्यातल्या त्रुटी नाही तर क्षमता ओळखा आणि त्यांना समाजातल्या मुख्य प्रवाहात घेऊन या, अशा शब्दांत सतराव्या केशवसृष्टी पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या स्वाती मोहिते यांनी सल्ला दिला. सतरावा केशवसृष्टी पुरस्कार सोहळा शनिवारी सायंकाळी बोरिवली येथील...

५ टक्के महिलांच्या स्तनात आढळल्या लक्षणीय गाठी!

एम्पथी फाउंडेशनच्या सहकार्याने महाराष्ट्रात राबवण्यात आलेल्या ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात १२ महिन्यांच्या कालावधीत १,०१,२००हून अधिक महिलांची तपासणी करण्यात आली असून १ लाख महिलांच्या सुरुवातीच्या उद्दिष्टाला पार करण्यात आले आहे. या तपासणीदरम्यान ४,९००हून अधिक महिलांमध्ये (४.९ टक्के) वैद्यकीयदृष्ट्या...
Skip to content