शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी १९ जून १९६६ रोजी मुंबईत शिवसेनेचे स्थापना केली. याच शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा ३० ऑक्टोबर १९६६ रोजी दादर येथील शिवाजीपार्क मैदानावर झाला. शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्याला शिवाजीपार्क गर्दीने ओसंडून वाहत होते. यावर्षी २० ऑक्टोबरला ठाकरेंच्या शिवसेनेचा याच मैदानावर हीरकमहोत्सवी दसरा मेळावा झाला. शिवसेनाप्रमुख आज हयात नाहीत. पण शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा अखंड चालू आहे. यावर्षीही शिवाजीपार्क मैदान गर्दीने तुडूंब भरलेले होते. चार वर्षांपूर्वी शिवसेना विधिमंडळ पक्षात तोडफोड झाली. विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली चाळीस आमदारांनी नि डझनभर खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंडाचा झेंडा फडकवला. शिंदे यांच्या बंडाला भाजपाचे भक्कम संरक्षण होते व कोणी त्याचा इन्कारही केला नाही. शिंदे यांच्या गटाला निवडणूक आयोगाने मूळ शिवसेना म्हणून मान्यता दिली व धनुष्यबाण, हे शिवसेनेचे अधिकृत चिन्हही बहाल केले. खरी शिवसेना कोणती यावर सर्वोच्च न्यायालयात चार वर्षे खटला प्रलंबित आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे अडिच वर्षांतच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. सरकार पाडल्याची बक्षिसी म्हणून भाजपाने अडिच वर्षे शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिले. २०२४पासून भाजपाने मुख्यमंत्रीपद आपल्याकडे ठेवले व उपमुख्यमंत्रीपद शिंदे यांना दिले. आज शिंदे यांच्या पक्षाकडे साठ आमदार व तेरा खासदार आहेत. यावर्षी ठाकरेंच्या पक्षाचे सहा खासदार फोडून आणण्याचा त्यांनी नवा पराक्रम केला आहे. शिवसेनाप्रमुखांनी स्थापन केलेली शिवसेना वाचविण्यासाठी व वाढविण्यासाठी उद्धव ठाकरे यांना सतत संघर्ष करावा लागत आहे.
गेल्या चार वर्षांपासून शिवसेनेचे मुंबईत दोन दसरा मेळावे होत आहेत. ठाकरेंच्या पक्षाचा शिवाजीपार्कवर तर, शिंदेंच्या पक्षाचा गोरेगाव येथील नेस्कोमध्ये. या दोन मेळाव्यांत दरवर्षी एकमेकांवर भरघोस टीका होते. एकमेकांना गद्दार कोण असे विचारले जाते. दोन्ही मेळाव्यांचे थेट प्रक्षेपण सर्व मराठी वृत्तवाहिन्यांवरून होत असते. शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतरही सुभाष देसाई, दिवाकर रावते, संजय राऊत, अनिल परब, राजन विचारे, अनंत गीते, चंद्रकांत खैरे, भास्कर जाधव, अंबादास दानवे, सुनिल प्रभू, मिलिंद नार्वेकर, आदेश बांदेकर, नितीन बानगुडे, किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव, विशाखा राऊत आणि सुषमा अंधारे अशा निष्ठावान नेत्यांची फळी ठाकरेंबरोबर आहे. शिंदेंच्या मेळाव्यात डॉ. श्रीकांत शिंदे, गजानन कीर्तिकर, रामदास कदम, प्रताप सरनाईक, गुलाबराव पाटील, नरेश म्हस्के, ज्योती वाघमारे तसेच पक्षाचे मंत्रीगण व आमदार-खासदार अशी मोठी टीम उपस्थित होती. शिंदे ठाकरेंवर टीका करताना नेहमीच तावातावाने बोलतात. शिंदेंच्या मेळाव्यात रामदास कदम यांनी मराठा नेते मनोज जरांगे यांना आव्हान देणारा बॉम्ब टाकला तर ठाकरेंच्या मेळाव्यात सुषमा अंधारे यांनी फडणवीस सरकारवरच्या अपयशावर जाब विचारणाऱ्या प्रश्नांची सबरबत्ती केली.

दोन्ही दसरा मेळाव्यांतून काय मिळाले, याचा शोध घेतला तर एकमेकांवर चिखलफेक आणि आरोपप्रत्यारोपही तेच-तेच… हेच उत्तर मिळते. ठाकरेंची शिवसेना फोडल्याशिवाय आपला महाराष्ट्रात विस्तार होणार नाही, हे भाजपाला ठाऊक होते. ठाकरे व शरद पवार या दोघांचे पक्ष फुटले (किंवा फोडले) की भाजपाला महाराष्ट्रात रान मोकळे मिळेल हे साधे गणित होते. दोन्ही पक्ष फुटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन पक्षात कुणी शरद पवारांवर टीका करीत नाही. उलट सारेजण त्यांच्याविषयी आदराने बोलतात. मात्र शिवसेनेत फूट पडल्यापासून शिंदे व ठाकरे एकमेकांना गद्दार म्हणण्यातच धन्यता मानत आहेत. तेच आरोप, तीच टीका ऐकून लोकही कंटाळले आहेत.
मुंबई ही मराठी माणसांचीच आहे व मुंबईवर पहिला हक्क मराठी माणसाचा आहे, हे शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाच्या मनावर बिंबवले आहे. पण केंद्रीय मंत्री मुंबईत येतात व महाराष्ट्र देशातील सर्वात बहुभाषिक राज्य आहे, असे सांगतात. तेव्हा व्यासपीठावर बसलेले महाराष्ट्राचे सारे नेते गप्प बसतात. त्याविषयी कुणालाच काही वाटत नाही. मुंबई महापालिकेच्या कंत्राटी मोटारी गुजरातीत नोंद केलेल्या नेमप्लेटसह धावत आहेत, याचे कुणाला आश्चर्य वाटत नाही. मुंबई महापालिकेच्या उद्यानांमध्ये गुजराती भाषेतील सूचनाफलक दिसू लागले आहेत, याबद्दल कुणाला आक्षेप नाही. मराठी माणूस किंवा मराठी अस्मिता, हा राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपाचा अजेंडा नाही. एकनाथ शिंदेही त्यावर ब्रसुद्धा काढत नाहीत.

उद्धव ठाकरे यांनी भाषणात मोदी, शाह, फडणवीस यांच्यावर यथेच्छ टीका केली. रावणाचा प्राण बेंबीत होता तसा मोदी-शाहांचा प्राण कुणा उद्योगपतीच्या बेंबीत आहे, हे सांगून टाकले. कुविख्यात लॉरेन्स बिष्णोई साबरमतीच्या जेलमध्ये फाफडा-ढोकळा खात बसला असावा, हिम्मत असेल तर फडणवीसांनी त्याला पकडून आणून दाखवावा, गद्दारांना ५० खोके व शेतकऱ्यांना ५ हजार ही सरकारची नियत आहे, एसआयआरमध्ये देशात महाराष्ट्राच्या लोकसंख्येएवढी तेरी कोटी नावे उडवली, मतचोरी होत असताना आम्ही काय षंढासारखे गप्प बसायचे का? अशा प्रश्नांचा भडिमार केला. ठाकरे यांनी शिंदे यांचा गद्दार म्हणून नेहमीप्रमाणे उल्लेख केला. शिंदे त्यांना म्हणाले- २०१९च्या निकालानंतर महाराष्ट्रातील जनतेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम तुम्ही केले, महाआघाडीसोबत जाऊन मतचोरी तुम्हीच केलीत.. ठाकरेंनी रेजीम चेंज करणारच, असा निश्चय आपल्या भाषणात बोलून दाखवला. त्यामुळे भाजपा व शिंदे गट त्यांच्यावर संतापला आहे. तुम्हाला तुमचे आमदार सांभाळता येत नाहीत आणि रेजीम चेंज करण्याची भाषा बोलत आहेत.. अशी खिल्ली भाजपाने उडवली आहे. दसरा मेळाव्यात कुणाकडेच नवा विचार नव्हता. २०१४, २०१९ व २०२४मध्ये एसआयआर नव्हता. पण त्या निवडणुकांमध्ये भाजपानेच दणदणीत विजय मिळवला आहे, हे ठाकरे विसरले का? असा प्रश्न भाजपाने विचारला आहे.
दसरा मेळाव्यावर कोट्यवधी खर्च झाला असावा. हजारो सैनिक येतात त्यांच्यासाठी बसेस, खाण्यापिण्याची व्यवस्था, मैदानाचे महागडे भाडे, भव्य व्यासपीठ, सजावट, जाहिरात, प्रसिद्धी, मंडप, खुर्च्या, सोफा, माईक सिस्टिम, पंखे, हजारो मोटारींची येजा, यावर प्रचंड खर्च होतोच. मग एवढा खर्च करून काय मिळवले? भाजपा किंवा काँग्रेस दरवर्षी खर्चिक मेळावे घेण्याच्या फंदात पडत नाहीत. दोन्ही मेळाव्यात प्रमुखांनी आपल्या पक्षाला कार्यक्रम दिला नाही. पक्षाने केलेल्या कामाचा आढावा घेतला नाही. महागाई, बेरोजगारीचा डोंब आहे, पण कुणाला आठवण नाही. जनतेच्या प्रश्नांची चर्चा नाही. हिंदुत्व ऐकायलाही आले नाही. शिवसेनाप्रमुखांच्या हयातीत दसरा मेळावा ही शान होती, मराठी माणसाला ऊर्जा मिळत असे. शिवसेनाप्रमुखांच्या भाषणाने सरकारला घाम फुटत असे. विचाराचे सोने लुटण्यासाठी वाजतगाजत गुलाल उधळत या, असे शिवसैनिकांना आवाहन केले जात असे. हल्लीच्या मेळाव्यांतून एकमेकांवर चिखलफेक व वस्त्रहरण हाच कार्यक्रम दिसत आहे.
(लेखक डॉ. सुकृत खांडेकर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

