Homeब्लॅक अँड व्हाईटठसकेबाज लावणीला समृद्ध...

ठसकेबाज लावणीला समृद्ध करणाऱ्या सम्राज्ञीचा अस्त!

महाराष्ट्राच्या लोककलेला आपल्या अभिनयाचा साज चढविणाऱ्या, लावणीच्या ठसकेबाज अदाकारीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या आणि मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीत आपल्या असामान्य प्रतिभेचा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री तथा लावणीसम्राज्ञी मधु कांबीकर यांनी आज वयाच्या ७३व्या वर्षी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी लोककलेच्या अवकाशातील एक तेजस्वी तारा निखळला असून, लावणीच्या परंपरेतील एका समर्थ कलावंताच्या प्रदीर्घ कलापर्वाचा अस्त झाला आहे.

२८ जुलै १९५३ रोजी महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माळेगाव खुर्द या छोट्याशा गावात मधु वामन जाधव ऊर्फ मधु कांबीकर यांचा जन्म झाला. ग्रामीण मातीचा गंध, लोकपरंपरेचा वारसा आणि उपजत कलागुण यांची शिदोरी घेऊन सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे पुणे-मुंबईपासून थेट अमेरिका, दुबई, अबुधाबी आणि मॉरिशसपर्यंत पोहोचला. हा प्रवास केवळ भौगोलिक अंतर पार करणारा नव्हता, तर महाराष्ट्राच्या लोककलेचा लौकिक सातासमुद्रापार पोहोचविणारा होता. कोल्हाटी समाजाच्या समृद्ध कलापरंपरेचा वारसा लाभलेल्या मधुबाईंनी अगदी लहान वयातच रंगमंचावर पाऊल ठेवले. ज्या लोककलेच्या वातावरणात त्यांचे बालपण घडले, त्याच कलेला त्यांनी आपल्या प्रतिभेच्या बळावर नववैभव प्राप्त करून दिले. लावणी आणि तमाशा या महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलांना केवळ मनोरंजनाचे माध्यम न मानता, त्यातील अभिनय, भावाभिव्यक्ती, नृत्य आणि सांस्कृतिक मूल्ये आपल्या कलाविष्कारातून रसिकांसमोर आणली.

त्यांचे प्राथमिक शिक्षण आपल्या जन्मगावी झाले. त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील कांबी या गावी त्यांचे बालपण आणि पुढचे शिक्षण झाले. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी पुण्यात बाळासाहेब गोखले यांच्याकडे कथक नृत्याचे धडे घेतले. पुढे वयाच्या चौदाव्या वर्षापासून लावणीसम्राज्ञी लक्ष्मीबाई कोल्हापूरकर आणि ढोलकीसम्राट पांडुरंग घोटकर यांच्याकडून त्यांनी लावणीच्या परंपरेचे प्रशिक्षण घेतले. गुरूंकडून मिळालेली शिस्त, परंपरेची जाण आणि स्वतःच्या अंगभूत प्रतिभेची जोड यांतून त्यांच्या कलेला एक स्वतंत्र ओळख प्राप्त झाली. लोककलेच्या मुशीत घडलेली त्यांची कला पुढे नाटक आणि चित्रपटांच्या व्यापक विश्वात विस्तारली. ‘सखी माझी लावणी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी लावणीच्या परंपरेचा ठेवा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमामुळे त्यांना देश-विदेशांत आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. त्यांच्या लावणीतील ठसका, नृत्यातील सहजता आणि अभिनयातील जिवंतपणा यामुळे रसिकांच्या मनात त्यांनी अढळ स्थान निर्माण केले.

‘पुत्रकामेष्टी’, ‘पेईंग गेस्ट’, ‘चंद्र जिथे उगवत नाही’, ‘आकाश पेलताना’, ‘फुलवंती’ अशा विविध नाटकांतून त्यांनी रंगभूमीवर आपल्या अभिनयाची छाप उमटविली. त्यानंतर ‘सतीची पुण्याई’, ‘दगा’ आणि ‘लक्ष्मी’ यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. स्नेहलता दसनूरकर यांच्या कादंबरीवर आधारित ‘शापित’ या चित्रपटातील बिजली ही व्यक्तिरेखा त्यांनी आपल्या प्रभावी अभिनयातून जिवंत केली. या भूमिकेसाठी त्यांना शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. या सन्मानाने त्यांच्या अभिनयक्षमतेवर यशाची मोहोर उमटली. पुढे अनेक पुरस्कारांनी त्यांच्या कलाप्रवासाचा गौरव झाला. ज्येष्ठ अभिनेते निळू फुले, डॉ. श्रीराम लागू, प्रभाकर पणशीकर, दादा कोंडके आणि राजदत्त यासारख्या दिग्गज कलावंतांचा सहवास व मार्गदर्शन त्यांना लाभले. या मान्यवरांच्या सान्निध्यात त्यांच्या अभिनयकलेला अधिक समृद्ध होण्याची संधी मिळाली. मात्र, स्वतःच्या कर्तृत्वावर, मेहनतीवर आणि कलेवरील निष्ठेवर त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आपना उत्सव, हा देश पातळीवरचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित असलेल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राजशिष्टाचार बाजूला ठेवून पारंपरिक पद्धतीने नऊवारी साडी नेसलेल्या मधुबाईंसोबत फुगडी खेळून रसिकांना अचंबित केले होते.

‘रघु मैना’, ‘हेच माझे माहेर’, ‘होता विदूषक’, ‘झपाटलेला’, ‘रावसाहेब’, ‘आई कुलस्वामिनी तुळजाभवानी’, ‘संघर्ष जीवनाचा’, ‘राजा पंढरीचा’, ‘सवाल माझ्या प्रेमाचा’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘मुंबईचा डबेवाला’, ‘अशी असावी सासू’ आणि ‘पैज लग्नाची’ अशा अनेक चित्रपटांतील त्यांच्या भूमिका गाजल्या. साद नावाच्या एका गुजराती चित्रपटासाठी त्यांना गुजरात राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्राप्त झाला. चित्रपटांबरोबरच ‘भाकरी आणि फूल’, ‘श्रावणधारा’ आणि ‘मुक्ती’ यांसारख्या दूरदर्शन मालिकांमधूनही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. लोकनाट्य, रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन अशा मनोरंजनाच्या विविध माध्यमांत त्यांनी आपल्या कलेचे रंग भरले. मात्र, आयुष्यभर रंगमंचावर आपल्या अदाकारीने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या कलावंताच्या आयुष्यात नियतीने कठीण वळण आणले. नोव्हेंबर २०१६मध्ये लावणीच्या एका कार्यक्रमानंतर त्यांना पक्षाघाताचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांचे आयुष्य अंथरुणाला खिळून गेले. अनेक वर्षे त्यांनी या आजाराशी झुंज दिली. ज्या पावलांनी रंगमंचावर ठेका धरला, ज्या देहबोलीने लावणीला सौंदर्य प्राप्त करून दिले आणि ज्या आवाजाने अभिनयातील भावविश्व खुलविले, त्या कलावंताला आयुष्याच्या उत्तरार्धात आरोग्याच्या कठीण संघर्षाला सामोरे जावे लागले. अखेर १० वर्षांनंतर आज, १२ ऑक्टोबर २०२६ रोजी पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या निधनाने केवळ एका अभिनेत्रीचे निधन झालेले नाही, तर लोककलेच्या परंपरेशी नाळ जोडून ठेवणाऱ्या एका महत्त्वपूर्ण कलावंताचा प्रवास संपला आहे. मधु कांबीकर यांचे आयुष्य म्हणजे संघर्षातून फुललेल्या कलेची, परंपरेतून घडलेल्या प्रतिभेची आणि जिद्दीने उभ्या केलेल्या कर्तृत्वाची प्रेरणादायी गाथा आहे. त्यांच्या पावलांतील लावणीचा ठेका थांबला असेल; मात्र त्यांच्या अभिनयातील जिवंतपणा, त्यांच्या कलेतील अस्सलपणा आणि त्यांनी समृद्ध केलेली लोकपरंपरा कायम रसिकांच्या स्मरणात राहील. काळाच्या पडद्याआड गेलेल्या या कलावंताचे कलावैभव मात्र महाराष्ट्राच्या सांस्कृतिक स्मृतिपटलावर अजरामर राहील. लावणीच्या रंगमंचावरील त्यांची अदाकारी काळाच्या ओघात विरून जाणार नाही; कारण काही कलावंत काळाच्या मर्यादा ओलांडून आपल्या कलेतून सदैव जिवंत राहतात. मधु कांबीकर त्यांपैकीच एक!

(लेखक खंडूराज शं. गायकवाड ज्येष्ठ पत्रकार आणि लोककलेचे अभ्यासक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

मी गुलाबी.. तू गुलाबी.. जग गुलाबी.. अजितदादांचा नवा फंडा!

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार अलीकडे वरचेवर गुलाबी जॅकेटमध्ये दिसतात. आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण शेकडो प्रकाराचे रंग बघत असतो. हे रंग आपल्या जीवनात एक नवीन भूमिका बजावत असतात. आपल्या मूडवर या रंगाचा बहुतांशी परिणाम होतो. इतकेच नव्हे, तर रंगाचा आपल्या...

महाराष्ट्रातले ज्येष्ठ लोककलावंत मानधनासाठी आसुसलेलेच!

राज्यात एकीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजनांसारख्या विविध योजनांचा बोलबाला सुरू असताना राज्यातील ज्येष्ठ वयोवृद्ध कलावंत आणि साहित्यिकांचे दरमहा मिळणारे दोन महिन्यांचे मानधन त्यांच्या बँकेतच जमा झाले नसल्याने अनेक ज्येष्ठ लोककलावंतांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही सरकारचे...

हलगी-ढोलकीच्या जुगलबंदीने रंगला ढोलकी तमाशा महोत्सव

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने 26 मार्च ते 31 मार्च 2024 यादरम्यान नवी मुंबईतील जुईनगर नाट्यगृहात आयोजित केलेल्या "ढोलकी तमाशा महोत्सवा"मध्ये हलगी-ढोलकीची जुगलबंदी बघायला मिळाली. पारंपरिक गण, गवळण, बतावणी, रंगबाजी, शृंगाराच्या  लावण्या, सवाल-जवाब, शिलकार, फार्सा, वगनाट्य आणि शेवटीची भैरवीसुद्धा भरगच्च गर्दीने भरलेल्या नाट्यगृहातील कलारसिकांना...
Skip to content