Homeबॅक पेजत्रिसा-गायत्रीनेच केली त्यातल्यात्यात...

त्रिसा-गायत्रीनेच केली त्यातल्यात्यात चांगली कामगिरी‌!

नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत यजमान भारतीय खेळाडूंची कामगिरी काहीशी निराशाजनक झाल्यामुळे लाखो भारतीय चाहत्यांची मात्र‌ निराशा झाली. भारताचे दिग्गज खेळाडू या स्पर्धेत फारशी चमकदार कामगिरी‌ करु शकले नाहीत. महिला दुहेरीत त्रिसा जॉली, गायत्री गोपीचंद या युवा जोडीने कांस्यपदकाची कमाई करुन भारताचे एकमेव पदक जिंकण्याचा पराक्रम केला इतकेच… तब्बल १५ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर या स्पर्धेत परत एकदा महिला दुहेरीत भारताला त्रिसा, गायत्री जोडीने कांस्यपदक मिळवून‌ दिले. याअगोदर २०११ साली लंडनमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारताच्या ज्वाला गुत्ता, अश्विनी पोनप्पा जोडीने कांस्यपदक पटकावले होते. त्रिसा-गायत्री जोडीने कांस्यपदक जिंकून काहीशी धक्कादायक निकालाची नोंद केली. स्पर्धेपूर्वी या बिगरमांनाकित जोडीकडून पदकाच्या फार अपेक्षा नव्हत्या. पण या जोडीने काही शानदार विजय मिळवले.

उपउपांत्यपूर्व फेरीत त्रिसा, गायत्री जोडीने विश्व क्रमवारीत ८वे मानांकन असलेल्या जपानच्या रिन-काय जोडीचा ४४ मिनिटांच्या लढतीत सरळ २ गेममध्ये पराभव केला. तर, उपांत्यपूर्व फेरीत भारतीय जोडीने आणखी एक धक्कादायक विजय नोंदवताना चीनच्या विश्व क्रमवारीत ४थे मानांकन असलेल्या जिया यी-शू झियान जोडीला ३ गेममध्ये अटीतटीच्या लढतीत नमवले. विशेष म्हणजे पहिला गेम गमावूनदेखील पुढचे दोन गेम जिंकून भारतीय जोडीने सामन्यात जोरदार कमबॅक केले. विशेष म्हणजे उभय खेळाडूंमधील अगोदरच्या तीन लढतीत चिनी जोडीने बाजी मारली होती. नवी दिल्लीत मात्र‌ आपल्या घरच्या मैदानावर या महत्त्वाचा स्पर्धेत भारतीय जोडीने बाजी उलटवली. झियान‌ने गेल्या ऑलिंपिक स्पर्धेत महिला दुहेरीत सुवर्णपदक जिंकले होते. विश्व स्पर्धेत तिच्या नावावर ४ सुवर्णपदकाची नोंद आहे. उपांत्य फेरीत मात्र‌ त्रिसा, गायत्री जोडीला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या चीनच्या लिऊ-निंग जोडीकडून ३ गेममध्ये अटीतटीच्या लढतीत हार खावी लागली.

अनुभवात भारतीय जोडी कमी पडली. मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत आणि संयम ठेवत चिनी जोडीने बाजी मारली. भारतीय जोडीने दिलेली झुंज कौतुकास्पद होती. थोडी दैवाची साथ मिळाली असती तर त्यांचा अंतिम फेरीतील प्रवेश पक्का होता. त्रिसा, गायत्री यांची सुरूवात एकेरीतील चांगले खेळाडू म्हणून झाली. पण नंतर दोघींच्या प्रशिक्षकांच्या लक्षात आले की, दोघींना एकेरीपेक्षा दुहेरीत चांगली संधी आहे. त्रिशा मूळची बेंगळुरुची. पदुकोण अकादमीत तिने विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली या खेळाचे धडे गिरवले. गायत्री मूळची हैद्राबादची. तिचे वडील पुलेला गोपीचंद नामवंत खेळाडू. तेच तिचे मेन्टॉर आणि प्रशिक्षक होते. काही महिन्यांपूर्वी सराव करताना त्रिशाच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. तिला हातावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्यामुळे बरेच महिने ती बॅडमिंटन कोर्टपासून दूरच होती. या कठिण समयी गायत्रीने तिची साथ सोडली नाही. या दुखापतीतून सावरल्यानंतर या दोघींनी जोरदार कमबॅक केले. त्यानतंर या जोडीने मागे ‌वळून बघितलं नाही. ज्याप्रमाणे पुरुष दुहेरीत रंकी रेड्डी, चिराग शेट्टीने आंतरराष्टीय स्पर्धेत मोठे यश संपादन केले, तशीच कामगिरी भावी काळात या दोघी करुन‌ दाखवतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.

या पदकाने या दोघींना नवा आत्मविश्वास, नवी उर्जा नक्कीच दिली असेल. सिंधू, सेन, रेड्डी-शेट्टी यांना पदकाने हुलकावणी दिली. यांनी स्पर्धेत कुठले ना पदक जिंकले असते तर यजमान या नात्याने भारताला या स्पर्धेत आपली सर्वोतम कामगिरी करता आली असती. पण थोडक्यात या स्टार खेळाडूंची पदके हुकली. त्यांनी आपल्या परीने चमकदार खेळ केला खरा, पण दैवाची साथ त्यांना मिळाली नाही. त्यामुळे पदकाने अखेर त्यांना गुंगारा दिला. सिंधूला विक्रमी सहावे पदक मिळवण्याची संधी होती. पण तिला उपउपांत्यपूर्व फेरीत हार खावी लागली. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या चीनच्या होऊ यीकडून रंगतदार लढतीमध्ये सिंधू तीन गेममध्ये पराभूत झाली. निर्णायक तिसऱ्या गेममध्ये सिंधू सुरूवातीला ४-१, ७-४ अशी आघाडीवर होती. पण याच महत्त्वाचा क्षणी सिंधूने साईडलाईनला खूप चुका केल्या. तिच्या स्मॅशच्या फटक्यात जोर नव्हता. सामन्यावर तिला संयम ठेवता आला नाही. प्रतिस्पर्धी होऊने सामन्यात बऱ्याचदा दुखापतीचे कारण पुढे करुन‌ दीर्घकाळ विश्रांती घेत सिंधूची लय बिघडवण्याचा प्रयत्न केला. तिच्या या दुखापतीबाबत सामन्यानंतर सिंधूने नाराजी व्यक्त केली. खरोखर तिला दुखापत झाली होती का, असा प्रश्न तिने उपस्थित केला.

लक्ष्य सेनला दुसऱ्या फेरीत अमेरिकन गॉरेट तॉनकडून तीन गेममध्ये पराभव पत्करावा‌ लागला. पहिला गेम जिंकून लक्ष्यने सामन्यात छान सुरूवात केली. पण तोच जोम आणि जोश लक्ष्य नंतरच्या दोन गेममध्ये कायम ठेवू शकला नाही. त्यामुळे त्याला पराभव पत्करावा‌ लागला. त्यामुळे या स्पर्धेत दुसरे पदक जिंकण्याचे त्याचे स्वप्न भंग पावले. पुरुष दुहेरीत पदकाची दावेदार समजली जाणारी रंकी रेड्डी, चिराग शेट्टी जोडी उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाली. विश्व क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या चीनच्या लियांग केंग-वॉग चॉग जोडीकडून त्यांना हार खावी लागली. अवघ्या ३६ मिनिटांत चिनी जोडीने बाजी मारली. चिनी जोडीच्या आक्रमक खेळासमोर भारतीय जोडी पूर्ण निष्प्रभ ठरली. गेल्या ऑलिंपिक स्पर्धेत चिनी जोडीने रौप्यपदक जिंकले होते. चिनी जोडीने सामन्याचे अचूक आकलन करुन‌ आक्रमक रणनीती अवलंबली. भारतीय जोडीचे गुण घेण्याचे अंदाज साफ चुकले.

आतापर्यत या स्पर्धेवर चिनी खेळाडूंचा दबदबा राहिला आहे. या स्पर्धेत चीननेच सर्वाधिक २०८ पदके जिंकली आहेत. पण यंदाच्या स्पर्धेत मात्र‌ चिनी खेळाडूंची कामगिरी फारशी समाधानकारक नव्हती. ५ पैकी अवघे‌ १ जेतेपद मिळवण्यात चीनला यश आले. पुरुष दुहेरीत चीनला जेतेपद मिळाले. चीनच्या लियांग वे किंग – वंग चेंग या जोडीने पुरुष दुहेरीत बाजी मारली. फ्रांस आणि दक्षिण कोरियाने प्रत्येकी २, २ गटात बाजी मारली. फ्रांसच्या अलेक्स लेनरने पुरुष एकेरी आणि मिश्र दुहेरीत थाम‌ गिकेल, डेलफिन‌ डेलरु जोडीने जेतेपद मिळवून नवा इतिहास रचला. ही दोन्ही जेतेपद मिळवणारे हे फ्रांसचे पहिलेच खेळाडू ठरले आहेत. दक्षिण कोरियाच्या अन सन यंगने महिला एकेरीत आपले दुसरे जेतेपद पटकावले. तिने गतविजेत्या जपानच्या यागामुचीचा सहज पराभव केला. यंगने याअगोदर ऑलिंपिक स्पर्धेत, आशियाई क्रीडा स्पर्धेत तसेच आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला आहे. दक्षिण कोरियाच्याच बैक हॅना, ली शोईने महिला दुहेरीत विजेतेपद मिळवले. यंदाची ही ३०वी स्पर्धा होती. तब्बल १७ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर भारतात दुसऱ्यांदा या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले गेले. २००९मध्ये पहिल्यांदा ही स्पर्धा भारतात हैद्राबाद येथे झाली होती. भारताच्या १३ खेळाडूंनी या स्पर्धेत आतापर्यंत १६ पदके मिळवली आहेत. आता लवकरच जपानमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन खेळाडूंची कामगिरी सुधारेल अशी आशा करुया.

(लेखक सुहास जोशी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

मॅटमुळे रया गेली कबड्डीची! कांदळगावकरांची खंत!!

महाराष्ट राज्य कबड्डी असोसिएशनने नुकताच सन‌ २०२५-२६चा श्रमजीवी स्व. रमेश देवाडीकर कबड्डी कार्यकर्ता हा मानाचा पुरस्कार ६७ वर्षीय दीपक कांदळगावकर यांना देऊन कबड्डी खेळातील एका सच्च्या सेवकाचा उचित गौरव केला आहे. जवळजवळ ‌५ दशके दीपक सरांनी या खेळाची निस्पृहपणे...

यंदाच्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेतही भारताची मदार सिंधुवरच!

येत्या १७ ऑगस्टपासून नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरु होत असलेल्या ३०व्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत यजमान भारताची मोठी मदार पदकाच्यादृष्टीने माजी जग्गजेती पी. व्ही. सिंधु, माजी कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन आणि पुरुष दुहेरीत माजी कांस्यपदक विजेती जोडी...

क्रिकेट, कुस्तीसारखे खेळ वगळल्यानंतरही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची बाजी!

ग्लासगो येथे संपन्न झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंनी केलेल्या चमकदार कामगिरी‌च्या जोरावर भारताने पदकतालिकेत ऑस्टेलिया, इंग्लंड, कॅनडापाठोपाठ चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. भारताने या स्पर्धेत १३ सुवर्ण, १७ रौप्य,९ कांस्य, अशी एकूण ३९ पदकांची कमाई केली. १३पैकी ८...
Skip to content